|| सतीश कामत

राहुल पंडित यांचा चेंडू पक्षश्रेष्ठींच्या कोर्टात

रत्नागिरीचे नगराध्यक्ष राहुल पंडित यांच्या राजीनाम्यावरून शिवसेनेत उलटसुलट प्रवाद असतानाच शहरातील जागृत देवस्थान भरीबुवाच्या मंदिरात दोन वर्षांपूर्वी घेतलेल्या शपथेनुसार पंडितांनी शुक्रवारी पदाचा राजीनामा देत आता याबाबतच्या निर्णयाचा चेंडू पक्षश्रेष्ठींच्या कोर्टात टोलवला आहे.

दोन वर्षांपूर्वी झालेल्या नगराध्यक्षपदाच्या थेट निवडणुकीत पंडित बहुमताने निवडून आले. त्यावेळी सेनेचे तालुकाध्यक्ष बंडय़ा साळवीही या पदासाठी इच्छुक होते. तत्कालीन राजकीय-सामाजिक परिस्थिती लक्षात घेऊन पक्षश्रेष्ठींनी पंडितांच्या उमेदवारीला हिरवा कंदिल दाखवला. पण त्यापूर्वी साळवी यांची समजूत काढण्यासाठी या पदाची मुदत पाच वष्रे असली तरी पंडितांनी दोन वर्षांनी स्वेच्छेने राजीनामा द्यावा आणि त्या जागी साळवी यांची निवड करावी, असा तोडगा काढण्यात आला. पंडितांनी नंतर भूमिका बदलू नये म्हणून शहरातील जागृत देवस्थान, अशी ख्याती असलेल्या श्री भैरीबुवाच्या मंदिरात जाऊन त्यांच्याकडून तशी शपथही घेण्यात आली. त्यानुसार पंडितांची मुदत या महिन्यात संपत असल्यामुळे त्यांनी भरीबुवापुढे आणि पक्षश्रेष्ठींकडेही राजीनामा सादर करत याबाबतच्या उत्सुकतेला त्यांनी अर्धविराम दिला. अर्धविराम अशासाठी की, तो जिल्हाधिकाऱ्यांकडे दिला असता तर परतीचे दोर कापले जाऊन त्यावर नियमानुसार लगेच कार्यवाही होऊ शकली असती. म्हणूनच तसे न करता, एकीकडे वचनाला जागल्याचे पुण्य मिळवत, पक्षश्रेष्ठींची इच्छा असेल तर पुन्हा त्या पदावर आरूढ होण्याचा मार्गही खुला ठेवण्याची राजकीय हुशारी दाखवली आहे.

मध्यंतरी या बाबतच्या संभाव्य पर्यायांवर शिवसेनेत चर्चा चालू असताना असे लक्षात आले होते की, पंडितांनी खरोखरच नियमानुसार राजीनामा दिला तर याबाबतचा कायदा पाहता या पदासाठी पुन्हा निवडणूक घ्यावी लागेल. त्यामध्ये सेनेने बंडय़ा साळवी यांना उमेदवारी दिली आणि समोरून माजी नगराध्यक्ष उमेश शेटय़े यांच्यासारखा तगडा उमेदवार भाजपच्या पाठिंब्यावर रिंगणात उतरला तर कडवे आव्हान उभे राहू शकते. त्यापेक्षा पंडितांनी थेट राजीनामा न देता काही काळासाठी  ‘स्वेच्छा रजेवर’ जावे आणि त्यांच्या जागी साळवी यांची ‘प्रभारी नियुक्ती’ करावी, असा विनोदी पर्यायही पुढे आला होता. पण तो पंडितांनाच मान्य नव्हता आणि त्यांनी राजीनामा देऊन तो संपुष्टात आणला आहे. तसे करताना, आपण अत्यंत समाधानाने हा राजीनामा देत असून कोणाबद्दलही काही तक्रार नसल्याची त्यांची भावना आहे.

या संदर्भात खासदार विनायक राऊत यांच्याशी संपर्क साधला असता, या विषयावर अजून काहीही निर्णय झालेला नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. आमदार उदय सामंत यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. पण नगराध्यक्षपदी पंडितनिवडून यावेत, म्हणून सर्व ताकद त्यांच्या पाठीशी उभी केलेल्या आमदारांशी पंडितांचे आता पूर्वीइतके सख्य राहिलेले नाही, हे उघड गुपित आहे. अशा परिस्थितीत त्यांचा कल कोणाच्या बाजूने असणार, हे सहज समजू शकते. जिल्ह्य़ाचे पालकमंत्री रवींद्र वायकर यांच्याशीही आमदार सामंतांचे सूर कधीच फारसे जुळलेले नाहीत. त्यामुळेच की काय, शहरातील नियोजित तारांगणाचे भूमीपूजन सेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले. त्या कार्यक्रमात बोलताना, लोकांच्या टीकेकडे लक्ष न देता तुम्ही तुमचे चांगले काम चालू ठेवा, असा सल्ला पालकमंत्र्यांनी पंडितांना दिला होता. जिल्हा प्रमुख राजेंद्र महाडिक यांचेही महत्त्व संघटनेत काही नवी पदे प्रथमच निर्माण करून कमी केल्याची त्यांच्या समर्थकांची भावना आहे, तर एकेकाळी शहरातील पक्षसंघटनेवर पकड असलेले पक्षाचे आमदार राजन साळवी यांना, आमदार सामंतांच्या पक्षप्रवेशानंतर, शहराच्या विषयांमध्ये लक्ष न घालण्याची ‘सूचना’ देण्यात आली आहे.

शिवसेनेची अडचण : अशा परिस्थितीत सध्याचे राजकीय वातावरण आणि येऊ घातलेल्या सार्वत्रिक निवडणुका लक्षात घेता सेनेच्या नेत्यांना ही अनिश्चितता फार काळ ठेवणे परवडणारे नाही. पंडितांचा राजीनामा मंजूर केला तर नगराध्यक्षपदाच्या पोटनिवडणुकीला सामोरे जाण्याचा धोका पत्करावा लागणार आहे आणि त्यात विरोधी उमेदवार विजयी झाला तर चिपळूण नगर परिषदेसारखी परिस्थिती निर्माण होणार आहे. राजीनामा फेटाळला तर निवडणुकांच्या तोंडावर पक्षातील काही प्रमुख शिलेदार नाराज असणे परवडणारे नाही. पण ‘आदेशावर चालणारा पक्ष’ अशी शिवसेनेची ख्याती आहे. त्याची कसोटी या निमित्ताने या पक्षाच्या बालेकिल्ल्यात लागणार आहे.