निवडणूक निकालाची प्रतीक्षा उद्या संपणार आहे. जिंतूर, पाथरी, गंगाखेड व परभणी या मतदारसंघांची मतमोजणी सकाळी आठला सुरू होईल. १४ टेबलवर ४०० कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे. एकूण ८१ उमेदवारांच्या भवितव्याचा फैसला होणार असून पुढील राजकीय समीकरणांची नांदीही या निकालात दडली आहे.
जिल्ह्यात गेल्या ३० वर्षांपासून चच्रेच्या केंद्रस्थानी असलेल्या माजी मंत्री सुरेश वरपुडकर, रामप्रसाद बोर्डीकर यांच्या भवितव्याचा फैसला होणार आहे. लोकसभेच्या पराभवानंतर विधानसभेसाठी कौल घेत असलेल्या विजय भांबळे यांच्यासाठीही ही निवडणूक निर्णायक आहे. ‘लक्ष्मीदर्शना’साठी सर्वदूर ख्याती पोहोचलेल्या गंगाखेडचा निकाल काय, या बाबतही मोठे कुतूहल आहे. परभणी हा शिवसेनेचा बालेकिल्ला राहिला आहे. या वेळी युती तुटल्याने भाजपनेही निवडणूक रंगतदार केली. ‘एमआयएम’च्या प्रवेशाने चुरस आणखी वाढली. प्रत्येक मतदारसंघात लढतींचे स्वरूप बहुरंगी असेच राहिले. त्यामुळेच निकालाची  मोठी अनिश्चितता आहे. या निकालानंतर जिल्ह्याच्या राजकीय समीकरणांतही मोठे फेरबदल होतील, अशी स्थिती आहे.
परभणी मतदारसंघाची मतमोजणी कृषी विद्यापीठातील अभियांत्रिकी महाविद्यालय, जिंतूरची औद्योगिक प्रशिक्षण संस्था, पाथरी येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्था, गंगाखेडची संत जनाबाई महाविद्यालयात होणार आहे. परभणीत २८७ मतदान केंद्रे असल्याने २१ फेऱ्या, जिंतूर ३५६ केंद्रे व २६ फेऱ्या, पाथरी ३४४ केंद्रे २५ फेऱ्या, तर गंगाखेड ३६१ केंद्रे व २६ फेऱ्यांत मतमोजणी होईल.
उस्मानाबादेत तिरंगी लढती;
५६ उमेदवार, ४ भाग्यवान
वार्ताहर, उस्मानाबाद
जिल्ह्यातील उमरगा, तुळजापूर, उस्मानाबाद व परंडा मतदारसंघांमधील ५६ उमेदवारांच्या भवितव्याचा उद्या फैसला होणार आहे. सर्वच ठिकाणी तिरंगी लढतींमध्ये आता चौघे भाग्यवान कोण, याची सर्वाना उत्सुकता आहे.
चारही मतदारसंघांत चुरशीच्या लढती झाल्या. उस्मानाबाद मतदारसंघात शिवसेना, राष्ट्रवादी व भाजपमुळे तिरंगी, तुळजापूरमध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजप व शिवसेनेमुळे चौरंगी, उमरगा शिवसेना, भाजप व काँग्रेसमुळे तिरंगी, तर परंडा मतदारसंघात राष्ट्रवादी, शिवसेना व रासप अशी तिरंगी लढत झाली. प्रशासनाने मतमोजणीची तयारी पूर्ण केली असून, प्रत्येक मतदारसंघात मतमोजणीसाठी १४ टेबलची व्यवस्था केली आहे. प्रत्येक उमेदवाराचे दोन प्रतिनिधी मतमोजणीच्या ठिकाणी उपस्थित राहू शकतात.
अनुसूचित जाती-जमातीसाठी राखीव उमरगा मतदारसंघातील मतमोजणी अंतुबळी पंतगे सभागृह येथे होणार आहे. मतमोजणीदरम्यान २१ फेऱ्या अपेक्षित असून त्यासाठी १४ टेबल व पोस्टल मतमोजणीसाठी दोन स्वतंत्र टेबलची व्यवस्था आहे. तुळजापूर मतदारसंघाची स्पोर्ट्स हॉल, तुळजाभवानी अभियांत्रिकी महाविद्यालय येथे असून, २७ फेऱ्या अपेक्षित आहेत. उस्मानाबाद मतदारसंघाची मतमोजणी शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय येथे होणार असून २५ फेऱ्या अपेक्षित आहेत. परंडा मतदारसंघाची मतमोजणी गव्हर्नमेंट रेसिडेंट स्कूल फॉर एससी व नवबुद्धा स्टुडंन्ट भूम, परंडा रस्ता, गोलेगाव येथे होईल. २५ फेऱ्या अपेक्षित आहेत. मतमोजणी केंद्राच्या २०० मीटर परिसरात फौजदारी प्रक्रिया संहितेचे कलम १४४ अन्वये बंदी आदेश जारी केले आहेत.
७० हजार मतांची ‘गाठ’ आवश्यक!
वार्ताहर, बीड
या वेळी सर्वच पक्ष स्वतंत्र लढल्याने बहुतांशी ठिकाणी तिरंगी-चौरंगी लढतींचे चित्र निर्माण झाले. यात मागील तुलनेत मतदान तीन टक्क्यांनी वाढल्याने निकाल काय लागतो? याची धाकधूक वाढली आहे. उद्या दुपारी बारापर्यंत निकालाचे चित्र स्पष्ट होणार असून वाढलेल्या मतांच्या टक्क्याची धास्ती आणि निकालाची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
लोकसभा पोटनिवडणुकीसह विधानसभेच्या ६ मतदारसंघांतील निकाल आता टप्प्यात आला आहे. कुर्ला रस्त्यावर प्रशासनाने एकाच ठिकाणी मतमोजणीची तयारी केली असून, अडीच हजार अधिकारी-कर्मचारी मतमोजणीस सज्ज आहेत. दोन हजार पोलिसांचा ताफा तनात असेल. सकाळी आठ वाजता मतमोजणी सुरू होईल. दुपारी तीननंतर सर्वच चित्र स्पष्ट होईल. उमेदवारांच्या संख्येवर मतमोजणीच्या फेऱ्या निश्चित केल्या आहेत. लोकसभा पोटनिवडणुकीत १२ उमेदवार असल्याने त्यांची स्वतंत्र मतमोजणी होणार आहे. गेवराईत ११ उमेदवार असल्याने ३८ फेऱ्या, आष्टीत १२ उमेदवार असल्याने ४२ फेऱ्या, परळी १८ उमेदवार असल्याने ३२ फेऱ्या, बीडमध्ये २५ उमेदवार असल्याने ३५, केजमध्ये १९ उमेदवार असल्याने ३७ फेऱ्या, तर माजलगावमध्ये ३४ उमेदवार असल्याने ३६ फेऱ्या होतील.
सर्वच मतदारसंघांत सव्वादोन ते अडीच लाख मतदान झाल्यामुळे उमेदवाराला निवडून येण्यास ७० हजार मतांची ‘गाठ’ बांधावी लागणार आहे. सर्वच पक्ष स्वतंत्र लढल्याने मतविभागणीमुळे विजयी उमेदवाराचे मताधिक्य तुलनेने कमी असण्याची शक्यता आहे. त्यामुळे मतदानानंतर बांधलेले अंदाजही गडबडू शकतात. वाढलेल्या मतांचा फटका सत्ताधारी पक्षाच्या उमेदवारांना बसण्याची शक्यता व्यक्त होत असल्याने नेते, कार्यकर्त्यांची झोप उडाली आहे.
४६ भाग्यवानांकडे मराठवाडय़ाचे लक्ष
प्रतिनिधी, औरंगाबाद
मराठवाडय़ातील ४६ मतदारसंघांमध्ये चुरशीने झालेल्या मतदानामुळे सर्वत्र निकालाची मोठी उत्सुकता आहे.
औरंगाबाद जिल्ह्य़ात ९ जागांसाठी १५६, नांदेड ९ जागा १६४ उमेदवार, बीड ६ जागा १०९ उमेदवार, परभणी ४ जागा ८१ उमेदवार, लातूर ६ जागा ९० उमेदवार, जालना ५ जागा ७७ उमेदवार, उस्मानाबाद ४ जागा ५६ उमेदवार, तर हिंगोली ३ जागा ४३ उमेदवार रिंगणात आहेत. मराठवाडय़ात बहुतेक ठिकाणी तिरंगी-चौरंगी वा बहुरंगी लढती झाल्या. अनेक ठिकाणी ६५ ते ७० टक्के मतदान झाले. भाजप-शिवसेनेची २५ वर्षांची (१९९५ ते १९९९ मध्ये सत्ता) विरोधी युती, तसेच काँग्रेस-राष्ट्रवादीची १५ वर्षांची सत्तेच्या माध्यमातून असलेली आघाडी यंदा फिसकटल्याने हे सर्वच पक्ष एकमेकांविरोधात उभे ठाकले होते. या शिवाय मनसे, तसेच एमआयएमनेही काही ठिकाणी तगडे उमेदवार दिल्याने या लढतींची धार अधिकच तीव्र झाल्याचे चित्र होते. त्यामुळेच आता निकालाची सगळीकडे मोठी उत्सुकता आहे.
राजेंद्र दर्डा (काँग्रेस, औरंगाबाद पूर्व), अब्दुल सत्तार (काँग्रेस, सिल्लोड), जयदत्त क्षीरसागर (राष्ट्रवादी, बीड), सुरेश धस (राष्ट्रवादी, आष्टी), राजेश टोपे (राष्ट्रवादी, घनसावंगी), अमित देशमुख (काँग्रेस, लातूर शहर), डी. पी. सावंत (काँग्रेस, नांदेड उत्तर) या मंत्र्यांसह अमिता चव्हाण (काँग्रेस, भोकर), पंकजा मुंडे (भाजप, परळी) आदी प्रमुख उमेदवारांचे राजकीय भवितव्य निकालातून स्पष्ट होणार आहे.
औरंगाबाद जिल्ह्य़ातील १५६ उमेदवारांमधून भावी ९ आमदार कोण, याचा फैसला मतदारांनी मतदान यंत्रांतून दिला. तो कोणता त्याचा ‘उलगडा’ उद्या (रविवारी) होणार आहे. हे ९ भाग्यवान कोण, याकडे मतदारांसह सर्वाचे लक्ष लागले आहे. या ९ पैकी बहुतेक मतदारसंघांत तिरंगी-चौरंगी वा बहुरंगी लढती झाल्याने निकालाची उत्सुकता चांगलीच चाळवली गेली आहे. त्यामुळे प्रत्यक्ष निकाल काय लागतो, ते जाणून घेण्याचा उत्साह शिगेला पोहोचला आहे. दुपारी दोनपर्यंत सर्व निकाल लागतील, या दृष्टीने यंत्रणेने जय्यत तयारी केली आहे.