प्रशासनाच्या अतिरेकी र्निबधामुळे सिंहस्थातील पहिल्या पर्वणीत भाविकांना रामकुंडात स्नान करण्यापासून रोखण्यात आले असताना त्याची पर्वा न करता सर्वच राजकीय पक्षांच्या लोकप्रतिनिधींनी मात्र रामकुंडात डुबकी मारत ‘पवित्र’ होण्याची संधी साधली. विशेष म्हणजे पालकमंत्री तथा कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन, आ. देवयानी फरांदे, मनसेचे महापौर अशोक मुर्तडक आदींनीही आखाडय़ांचे शाही स्नान पूर्ण होण्याआधीच यथेच्छ डुंबण्याचा आनंद घेतला. राजकारण्यांच्या या वर्तणुकीबद्दल भाविकांनी नाराजीचा सूर व्यक्त केला.
नाशिक आणि त्र्यंबकेश्वरमधील अनुक्रमे रामकुंड व कुशावर्त येथे पर्वणीत स्नान करणे भाविक पवित्र मानतात, परंतु सुरक्षेचे कारण पुढे करीत पोलीस प्रशासनाने या दोन्ही कुंडांमध्ये पर्वणीच्या दिवशी स्नान करण्यापासून भाविकांना रोखण्याचे नियोजन करण्यात आले. रामकुंडात भाविकांना स्नान करण्यापासून रोखण्यात आले असताना दुसरीकडे सर्वपक्षीय राजकीय मंडळी रामकुंडात डुंबत असल्याचे दिसून आले. माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत त्यांचे शागीर्द आ. जयंत जाधव, शिवसेनेचे सहकार राज्यमंत्री दादा भुसे, महानगरप्रमुख अजय बोरस्ते, मनसेचे महापौर मुर्तडक, भाजपचे पालकमंत्री तथा कुंभमेळा मंत्री महाजन, आ. फरांदे या सर्वानी स्नानाचा मनसोक्त आनंद घेतला. सर्व आखाडय़ांचे शाही स्नान पूर्ण झाल्याशिवाय रामकुंडात इतरांना स्नान करू दिले जात नाही, असा नियम आजपर्यंत पाळण्यात आलेला आहे. परंतु पालकमंत्र्यांसह सर्व राजकीय मंडळी स्नानाचा आनंद घेत असताना आखाडय़ांचे शाही स्नान पूर्ण झालेले नव्हते. त्यामुळे साधू, महंत एकीकडे शाही स्नान करीत असताना दुसरीकडे राजकीय मंडळी कुंडात आपली राजकीय छबी टिपण्याची संधी छायाचित्रकारांना देत होते. पर्वणीच्या आदल्या दिवसापासून पोलिसांच्या र्निबधाचा जाच सहन करणाऱ्या भाविकांनी राजकारण्यांच्या या वृत्तीविषयी तीव्र रोष व्यक्त केला आहे.