चिपळूण येथे भरत असलेल्या ८६ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या विविध कार्यक्रमांमध्ये सुमारे डझनभर आमदार, खासदार आणि मंत्रिगण हजेरी लावणार असल्यामुळे साहित्याच्या मांडवात राजकारण्यांची भाऊगर्दी झाली आहे.
येत्या ११ ते १३ जानेवारीदरम्यान होत असलेल्या या संमेलनाचे उद्घाटन केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार करणार असून स्वागताध्यक्ष सुनील तटकरे, विधान परिषदेचे उपसभापती वसंत डावखरे, पालकमंत्री भास्कर जाधव, उत्पादन शुल्कमंत्री गणेश नाईक, राज्यमंत्री सचिन अहिर यांच्यासह आमदार उदय सामंत अशी राष्ट्रवादी काँग्रेसच्या मातबरांची फौज हजेरी लावणार आहे. याव्यतिरिक्त हुसेन दलवाई व नीलेश राणे हे काँग्रेसचे खासदार आणि सदानंद चव्हाण हे सेनेचे आमदारही सहभागी होणार आहेत. याव्यतिरिक्त संमेलनात होणाऱ्या निरनिराळ्या परिसंवादांमध्ये विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते विनोद तावडे, आमदार प्रमोद जठार, देवेन्द्र फडणवीस, माजी खासदार सूर्यकांता पाटील इत्यादींची उपस्थिती राहणार आहे. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत १३ जानेवारी रोजी होणाऱ्या संमेलनाच्या समारोपाला गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांच्यासह उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उद्योगमंत्री नारायण राणेही उपस्थित राहणार आहेत.
अशा प्रकारे संमेलनाचे तिन्ही दिवस राजकीय नेतेमंडळी, त्यांच्याबरोबर येणारे कार्यकर्ते आणि सुरक्षेचा फौजफाटा सर्वत्र व्यापून राहणार आहे.
 नाही म्हणायला दोन कविसंमेलने आणि सांस्कृतिक कार्यक्रम मात्र या भाऊगर्दीतून बचावले आहेत. तसेच ‘आमच्या रेषा बोलतात भाषा’ हा एकमेव वेगळ्या धर्तीचा कार्यक्रम होईल, अशी अपेक्षा आहे. ज्येष्ठ व्यंगचित्रकार शि. द. फडणीस, मंगेश तेंडुलकर, अच्युत पालव, रविमुकुल इत्यादी मान्यवर त्यामध्ये सहभागी होणार आहेत.

आपले सबंध जीवन राजकारणाने ग्रासलेले आहे. मग साहित्यातही ते येणारच. साहित्य संमेलन हे राजकारण्यांशी भांडण्याचे ठिकाण नाही. त्यांच्याशी निवडणुकीत मतदानाद्वारे भांडता येऊ शकेल.
– नागनाथ कोत्तापल्ले
(नियोजित संमेलनाध्यक्ष, रविवारी पुण्यातील एका कार्यक्रमात बोलताना)