26 January 2021

News Flash

फडणवीस, राज ठाकरेंच्या सुरक्षेत कपात; शरद पवारांनी गृहमंत्र्यांना केला फोन

काय म्हणाले शरद पवार?

विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह राज्यातील अनेक नेत्यांची सुरक्षा कमी करण्याचा निर्णय ठाकरे सरकारने घेतला आहे. सुरक्षेत कपात करण्यावरून ठाकरे सरकारवर टीकाही होऊ लागली आहे. यावरून राजकीय वातावरण तापलेलं असतानाच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी स्वतःची सुरक्षा कमी करण्यासंदर्भात राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांना फोन केला. स्वतः देशमुख यांनी याची माहिती दिली.

शरद पवार पत्र लिहून सुरक्षा कमी करण्याची मागणी करणार असल्याचं वृत्त आहे. गृहमंत्री अनिल देशमुख यासंदर्भात बोलताना म्हणाले,”गरज नसल्यास माझी सुरक्षा कमी करण्यात यावी, असं पवार यांनी फोन करून सांगितलं. मात्र, एखाद्या व्यक्तीच्या जिवाला किती धोका आहे? यावरून सुरक्षा ठरवली जाते. नुकत्याच एका समितीच्या अहवालावरून अनेक नेत्यांची सुरक्षा कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. विरोधी पक्षाचा आहे म्हणून सुरक्षा कमी केलेली नाही. समितीच्या अहवालानुसार हा निर्णय घेण्यात आला आहे,” असं देशमुख यांनी सांगितलं.

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या सुरक्षेत कपात करण्याबरोबरच ताफ्यातील बुलेटप्रुफ गाडीही काढून घेतली जाणार आहे. फडणवीस यांच्यासह मनसे अध्यक्ष राज ठाकरे, भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर, भाजपाचे आमदार प्रसाद लाड यांच्या सुरक्षेत कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. राज ठाकरे यांना झेड श्रेणीची सुरक्षा आहे. त्याऐवजी आता वाय प्लस सुरक्षा देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

हे तर सूडाचे राजकारण- भाजपा

ठाकरे सरकारच्या निर्णयावर भाजपाकडून टीका करण्यात आली आहे. भाजपाचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी या निर्णयावरून ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे. “विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या सुरक्षेत मोठी कपात, ताफ्यातील बुलेटप्रूफ गाडी काढली जाणार, त्याशिवाय भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील व प्रविण दरेकर यांच्याही सुरक्षा व्यवस्थेत मोठ्या प्रमाणात कपात सरकारचा निर्णय म्हणजे हे कोत्या मनोवृत्तीचे, सूडाचे राजकारण आहे,” असं म्हणत उपाध्ये यांनी टीकास्त्र डागलं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 10, 2021 4:17 pm

Web Title: political leaders security reduce by maharashtra govt sharad pawar calls home minister bmh 90
Next Stories
1 पीडित कुटुंबाच्या सांत्वनासाठी शब्दही नव्हते, केवळ हात जोडून उभा राहिलो – मुख्यमंत्री
2 खरं तर केसच उगवू देणार नव्हतो; रावसाहेब दानवेंचा सत्तारांना टोला
3 त्यांचा काय उद्देश आहे, मला माहिती नाही; दानवेंनी ठाकरे सरकारच्या निर्णयावर उपस्थित केली शंका
Just Now!
X