|| वसंत मुंडे

बेरजेच्या राजकारणातून काँग्रेसचे संजय दौंड यांना उमेदवारी

बीड : सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे हे परळी विधानसभा मतदारसंघातून निवडून गेल्यानंतर रिक्त झालेल्या विधान परिषदेतील जागेवर काँग्रेसचे नेते संजय पंडितराव दौंड यांना संधी मिळाली आहे. त्यांची उमेदवारी ही परळी विधानसभा निवडणुकीत संजय दौंड यांच्यासह त्यांचे वडील माजी राज्यमंत्री पंडितराव दौंड यांनी केलेल्या मदतीची परतफेड आणि मतदारसंघात राजकीय गणिते पक्की केल्याचे मानले जात आहे. बीडमध्ये पक्ष संघटन वाढीसाठी राष्ट्रवादीने पद्धतशीरपणे प्रयत्न सुरू केले आहेत.

दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्यापासून दूर झाल्यानंतर सुरुवातीपासून साथ देणारे बन्सीधर शिरसाट यांच्या सुनेला जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद तर संजय दौंड यांना विधान परिषदेची उमेदवारी देऊन धनंजय मुंडे यांनी नव्या राजकीय समीकरणांची जुळवाजुळव केली आहे. परळी मतदारसंघात गोपीनाथ मुंडे आणि दौंड कुटुंब कट्टर विरोधक राहिले आहेत.  ३५ वषार्ंनंतर मुंडे कुटुंबातीलच एकाच्या सहकार्यानेच दौंड कुटुंबासाठीही आमदारकीची दारे खुली झाली हे विशेष.

गोपीनाथ मुंडे यांचा परळी मतदारसंघात ४० वर्षांपासून प्रभाव राहिला आहे. या मतदारसंघाचे पहिले आमदार रघुनाथराव मुंडे यांच्या निधनानंतर त्यांच्याकडेच वकिली व्यवसाय करणारे पंडितराव दौंड यांनी काँग्रेसच्या उमेदवारीवर १९८६ मध्ये  गोपीनाथ मुंडे यांचा पराभव केला होता. शरद पवार यांच्या मंत्रिमंडळात त्यांनी मंत्री म्हणूनही काही काळ काम केले. त्यानंतरच्या दोन निवडणुकांत मुंडे यांनी दौंड यांचा पराभव केला. स्थानिक राजकारणात मुंडे आणि दौंड हे कट्टर राजकीय विरोधक म्हणून कायम राहिले.

स्थानिक राजकारणात संजय दौंड सक्रिय

पंडितराव दौंड यांचा मुलगा संजय दौंड यांनी कृषीची पदवी घेतल्यानंतर  पहिल्यांदा घाटनांदूर जिल्हा परिषद गटातून सक्रिय राजकारणात प्रवेश केला. मुंडे उपमुख्यमंत्री असताना धनंजय मुंडे यांनी १९९७ ला पट्टीवडगाव गटातून संजय दौंड यांचा पराभव करून राजकारणाला सुरुवात केली. तेव्हापासून धनंजय आणि संजय यांच्यात राजकीय कट्टरता वाढत राहिली.

मात्र, धनंजय मुंडे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर आघाडीमुळे त्यांच्यात काहीशी जवळीक आली, तरी ती प्रासंगिकच राहिली होती. विधानसभा निवडणुकीत धनंजय मुंडे यांनी काँग्रेसचे दौंड पिता-पुत्र यांना सोबत घेऊन मतदारसंघात राजकीय बांधणी मजबूत केली.  संजय दौंड हे प्रयोगशील शेतकरी असून स्थानिक राजकारणात सक्रिय असतात. ग्रामीण भागातून येणाऱ्या लोकांसाठी वैद्यकीय उपचार सेवा मिळवून देण्यासाठी ते पुढे येतात. त्यांच्या पत्नी आशा दौंड या जिल्हा परिषद सदस्या आहेत.

परळी मतदारसंघात मुंडे यांच्यानंतर पंडितराव दौंड यांचा प्रभाव मानला जातो. मात्र दिवंगत मुंडे यांनी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांशी असलेल्या मत्रीतून सातत्याने दौंड यांना राजकीय पातळीवर संधी मिळू नये, यासाठी प्रयत्न केले.

पंकजा मुंडे यांचा पराभव करून धनंजय यांनी आता परळी मतदारसंघात राजकीय बांधणी मजबूत करण्यासाठी सुरुवातीपासून वडील पंडितराव मुंडे यांना साथ देणारे मजूर संघाचे अध्यक्ष बन्सीधर शिरसाट यांची सून शिवकन्या शिरसाट यांना जिल्हा परिषदेचे अध्यक्ष केले, तर  विधानसभेत साथ देणारे काँग्रेसचे संजय दौंड यांना विधान परिषदेवर उमेदवारी देऊन मतदारसंघात आपली पकड मजबूत करण्याचा प्रयत्न केल्याचे मानले जाते.