अलीकडे गणेशोत्सवात फटाके उडवण्याचे प्रमाण कमी झाले असले तरी यंदाच्या गणेशोत्सवात राजकीय फटाक्यांची जुगलबंदी सुरू आहे. गणेशोत्सव देखाव्यांच्या उद्घाटनाची संधी घेत विरोधकांना लक्ष्य करण्याची जणू स्पर्धाच सुरू झाली आहे. मदार महादेवराव महाडिक यांनी त्यांचे प्रतिस्पर्धी गृहराज्यमंत्री सतेज पाटील आपले मोदक पळवत असल्याची टीका केली आहे. तर ‘खासदार मी होणार’ असे म्हणत धनंजय महाडिक यांनी विद्यमान खासदार सदाशिवराव मंडलिक यांच्या निष्क्रियतेवर वाक्बाण सोडले आहे. आपल्या सर्वच हालचाली काँग्रेस पक्ष मजबुतीसाठी असतात, असे सांगत सतेज पाटील यांनी काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना अशा तळय़ातमळय़ात करणा-या महाडिक काका-पुतण्यांवर पलटवार केला आहे. या जुगलबंदीत उडी घेत शिवसेनेचे आमदार राजेश क्षीरसागर यांनी धनंजयना हाती धनुष्यबाण घेण्याचे आवाहन करीत संघर्षांची फुलझडी पेटविली आहे.    
कोल्हापूर जिल्हय़ामध्ये लोकसभा निवडणुकीचे वारे वेगाने वाहात आहे. गणेशोत्सवामध्ये देखाव्यांच्या उद्घाटनाचे निमित्त साधत राजकीय लाटेवर स्वार होण्याचा पराक्रम राजकीय मंडळींकडून होताना दिसत आहे. शिवाजी चौकातील २१ फुटी महागणपती हे करवीरनगरीतील गणेशोत्सवाचे वैशिष्टय़ असते. याच गणपतीला साक्षी ठेवून आमदार महाडिक यांचे पुतणे, भीमा सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष धनंजय महाडिक यांनी गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांच्यावर स्वैर टीका केली. मात्र इतरांवर टीका करताना आपल्या त्रुटी महाडिक काका-पुतणे लक्षात घेणार का हा महत्त्वाचा प्रश्न आहे. धनंजय महाडिक यांना लोकसभेची उमेदवारी काँग्रेस व राष्ट्रवादीने दिलीच पाहिजे, अशी भीमगर्जना करीत आमदार महाडिक यांनी या उमेदवारीसाठी कोणाच्याही दारात जाणार नाही असे स्पष्ट केले आहे. धनंजय महाडिक यांचे नाव सध्या कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात आघाडीवर आहे. पण उमेदवारीसाठी कोणाकडे जाणार नाही हे म्हणणे निवडणुकीच्या काळात वृथा अभिमान बाळगण्यासारखे आहे. महाडिकांचे नाणे खणखणीत आहे, ते कोणत्याही बाजूला पडले तरी नजरेस छापच पडेल असा अभिमान बाळगणा-या महाडिकांनी आपले नाणे जनतेत खणखणते का, आपली जनतेवर खरोखरीच छाप पडते का याचेही आत्मचिंतन करण्याची गरज आहे.
महाडिक काका-पुतणे सध्यातरी काँग्रेस पक्षाशी जोडले गेले आहेत. तथापि धनंजय महाडिक यांना राष्ट्रवादीची उमेदवारी मिळणार असल्याने काँग्रेसच्या लोकांकडून त्यांना कितपत साथ मिळणार याचे उत्तर सध्यातरी अनुत्तरित आहे. हा मतदारसंघ काँग्रेस पक्षाकडे आला तर धनंजय महाडिक यांना उमेदवारी मिळेल याची खात्री ठामपणे देता येत नाही. याचीच शंका जाणवत असल्याने महाडिक शिवसेनेकडून उमेदवारी घेण्याची शक्यताही नाकारता येत नाही. आमदार राजेश क्षीरसागर यांनी शिवाजी चौकातील गणेशोत्सव कार्यक्रमात विरोधक निवडणुकीत महाडिकांच्या विरोधात एकवटतात असे म्हणत महाडिकांच्या दुख-या नसेवर बोट ठेवले होते. शिवाय इतर विचार न करता युतीचा विचार करावा, पुढचा खासदार युतीचाच असणार आहे असे सांगून क्षीरसागर यांनी धनंजयना शिवसेनेच्या गोटात येण्याचे आवाहन केले आहे. हा संदर्भ पाहता धनंजय महाडिक यांना काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना अशा तिहेरी पातळींवर उमेदवारीची कसरत करावी लागत असल्याचे दिसत आहे. याच कार्यक्रमात आमदार महाडिक यांना त्यांचे सुपुत्र अमल महाडिक यांना जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदासाठी आणल्या जात असलेल्या अडथळय़ांवरून संताप व्यक्त केला. आपला मुलगा मोठा होऊ नये यासाठी कारस्थाने रचली जात असल्याचे त्यांना खेदाने म्हणावे लागले. सध्या जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी खासदार सदाशिवराव मंडलिक यांचे सुपुत्र संजय मंडलिक आहेत. त्यांचा कालावधी संपून तीन महिने लोटले तरी त्यांना बदलले गेले नाही. याचा रागच महाडिक बोलून दाखवत असताना दुसरीकडे पुंगाव (ता.राधानगरी) येथील गणेशोत्सवाच्या कार्यक्रमात धनंजय महाडिक यांनी खासदार मंडलिक यांच्यावर टिकास्त्र सोडले. खासदार फंडाशिवाय मंडलिकांकडून काहीच पदरात पडले नाही, असे उल्लेख करीत आपण खासदार असतो तर १ हजार कोटी रुपयांचा निधी आणला असता, असे त्यांनी सांगितले.मात्र आमदार महाडिक यांनी शासनाच्या कोणत्या योजना, निधी खेचून आणला, त्यासाठी सभागृहात किती आवाज उठविला याविषयी मात्र धनंजय बोलण्यास धजावत नाहीत.     माझे मोदक पळविले जातात असे आमदार महाडिक यांनी त्यांच्या राजकीय मार्गात अडथळे निर्माण करणारे गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांना टीकेचे लक्ष्य केले. पण सतेज पाटील यांनी गणेशोत्सवासारख्या मंगलमय कार्यक्रमातून व्यक्तिद्वेष केला जाऊ नये. आपण करतो ते काँग्रेस पक्षाच्या भल्यासाठी, असे सांगत आपली विधायक भूमिका मांडण्याचा प्रयत्न केला. पण अशी वक्तव्ये करताना त्यांनी अण्णा गोळे तालीम, नाथा गोळे तालमीच्या गणेशोत्सवाच्या मंचाचाच वापर केला. एकंदरीतच गणेशोत्सवाचे निमित्त साधत जिल्हय़ातील प्रमुख राजकीयांकडून राजकीय टीकाटिप्पणी होऊ लागली आहे. गणेशोत्सवात भिन्न विचारांच्या मंडळींनी एकत्र येऊन समाजहित साधावे या संकल्पनेला तडा चालला आहे. राजकीय फुलझडय़ांमुळे लोकांची करमणूक मात्र होऊ लागली आहे.