पूर्व विदर्भात गेल्या सहा वर्षांत नरभक्षक ठरवून ठार मारण्यात आलेले दोन्ही वाघ राजकारण्यांच्या दबावाचा बळी ठरले आहेत. उल्लेखनीय म्हणजे या वाघांना ठार मारा असा आग्रह भाजपच्या स्थानिक आमदारांनी धरला होता व आता भाजपच्याच खासदार मनेका गांधी या वाघाच्या मृत्यूवरून वनखात्याला अडचणीत आणण्यासाठी सक्रिय झाल्या आहेत.
चार दिवसापूर्वी पूर्व विदर्भातील गोंदिया व भंडारा जिल्हय़ाच्या सीमेवर धुडगूस घालत पाच महिलांचे बळी घेणाऱ्या वाघिणीला गोळय़ा घालून ठार करण्यात आले. या वाघिणीला ठार मारण्याचे आदेश वन्यजीव विभागाचे प्रधान मुख्य वनसंरक्षक एस.डब्लू.एच. नकवी यांनी दिले होते. या वाघिणीला ठार मारण्यासाठी सुसज्ज बंदूका घेतलेले अनेक पोलीस जवान या भागात तैनात करण्यात आले होते. महिलांचे बळी घेणाऱ्या या वाघिणीला ठार मारा असा आग्रह या भागातील भाजपच्या आमदारांनी वनखात्याकडे धरला होता. त्यात आमदार नाना पटोले सर्वात आघाडीवर होते. प्रारंभी वनखात्याचे अधिकारी वाघाला ठार मारण्याचा आदेश जारी करण्यासाठी तयार नव्हते. मात्र, स्थानिक आमदारांनी दबावाचे राजकारण सुरू केल्यानंतर वनाधिकाऱ्यांसमोर कोणताही पर्याय शिल्लक राहिला नाही. पूर्व विदर्भात नरभक्षक ठरवून वाघाला ठार करण्याची ही दुसरी घटना आहे. याआधी या जिल्हय़ात ३१ ऑक्टोंबर २००७ ला नागभीड तालुक्यातील तळोधी परिसरात ९ व्यक्तींचे बळी घेणाऱ्या वाघाला गोळी घालून ठार करण्यात आले होते. या वाघाच्या मृत्यूचे आदेश तेव्हाचे वन्यजीव विभागाचे प्रधान मुख्य वनसंरक्षक मुजूमदार यांनी जारी केले होते. वाघांना ठार मारण्याच्या या दोन्ही प्रकरणात नक्षलवाद्यांच्या बिमोडासाठी प्रशिक्षित करण्यात आलेल्या जवानांनी प्रमुख भूमिका बजावली. २००७ मध्ये तळोधी परिसरात धुमाकूळ घालणाऱ्या वाघाला ठार करा, अशी मागणी भाजपच्या आमदार शोभा फडणवीस व अतुल देशकर यांनी लावून धरली होती.
 फडणवीस यांनी तर तेव्हा ठार मारण्याचे आदेश जारी केले नाही तर उपोषण करू, अशी धमकी वनखात्यातील अधिकाऱ्यांना दिली होती. तेव्हाही या खात्याचे अधिकारी ठार मारण्याचे आदेश जारी करण्यासाठी तयार नव्हते. राजकीय पातळीवरून दबाव आल्यामुळे अखेर अधिकाऱ्यांना हा आदेश तेव्हा द्यावा लागला होता. या दोन्ही प्रकरणात वाघ राजकारण्यांच्या दबावाचा बळी पडले.
आता गोंदियातील वाघिणीच्या मृत्यूनंतर भाजपच्या खासदार व प्रसिद्ध पर्यावरणवादी नेत्या मनेका गांधी यांनी या मुद्यावरून वनखात्याला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.
मनेका गांधी यांच्या पुढाकारानेच या वाघिणीच्या मृत्यूची तक्रार नेदरलँडच्या आंतरराष्ट्रीय न्यायालयाकडे करण्यात आली आहे. या तक्रारीचा पाठपुरावा करू असे मनेका गांधी यांनी जाहीर केले आहे. वन्यजीवप्रेमी म्हणून त्यांची ही भूमिका योग्य असली तरी या वाघांना ठार करण्याचा आग्रह त्यांच्याच पक्षाच्या स्थानिक नेत्यांनी धरला होता याकडेही वन्यजीवप्रेमी आता लक्ष वेधत आहेत. वन्यजीवांच्या संरक्षणाच्या मुद्यावर जनजागृती करण्याआधी मनेका गांधी यांनी आधी पक्षातील नेत्यांमध्ये जागृती करावी, असा सूर आता व्यक्त होऊ लागला आहे.