सिंधुदुर्ग जिल्ह्य़ात गौण खनिज उत्पादनाच्या विक्रीच्या दरामुळे जनतेत संभ्रम निर्माण झाला असताना वाळू व्यावसायिकांच्या दराचा गोंधळ राजकीय पटलावर आला आहे. त्यामुळे प्रशासनाची नेमकी भूमिका काय राहणार आहे, त्याकडे सर्वाचे लक्ष वेधले आहे.
गौण खनिज उत्पादन करूनही विक्रीचा दराची मुजोरी प्रशासन खोडून काढू शकत नाही. त्यामुळे सर्वसामान्य जनतेला वाळू, चिरा, काळा दगड, खडी महागाईनेच घ्यावी लागत असल्याच्या तक्रारी आहे. हे सर्व व्यवसाय राजकीय आश्रयाखाली गेल्याने कोण कोणालाही विचारत नाही.
कुडाळ व कणकवली तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून वाळू व्यावसायिक आणि वाळूचे प्रति ब्रास दरावरून राजकीय वातावरण तापले आहे. कुडाळमध्ये वाळूचे डंपर्स अडविणाऱ्यांविरोधात कायदेशीर गुन्हाही दाखल झाला आहे. सुमारे २३ जणांविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
गोवा राज्यात वाळू, चिरा, काळा दगड, विटा, खडीची मोठी मागणी आहे, तेथे सिंधुदुर्गापेक्षा दर जास्त मिळत असल्याने डंपर्सचालक डंपर्समध्ये जास्त वाळू भरत आहेत. त्याच्या तक्रारीही करण्यात आल्या आहेत. तसेच गोवा राज्यात महाराष्ट्रातील तेरेखोल खाडीतील बेकायदेशीर उत्खनन करून ती विक्रीसाठी सिंधुदुर्गात आणली जात आहे. त्यामुळे सध्या व्यावसायिक तणावाखाली आहे.
सिंधुदुर्ग जिल्हा प्रशासनाने लिलाव घेतलेले वाळूचे साठे उत्खनन केले जात आहेत. हे लिलाव ज्यांनी घेतले त्यांनी लावलेला दरही स्थानिक राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना मान्य नाही. त्यामुळेच डंपर्स अडविण्यात आले. पण हा दर लोकांना परवडेल असा करण्यासाठी प्रशासनाने पावले टाकण्याची मागणी आहे.
वाळूवरून मात्र राजकीय तणाव असल्याचे चित्र सिंधुदुर्ग जिल्ह्य़ात पाहायला मिळत आहे.