औरंगाबाद महानगरपालिकेचे आयुक्त प्रकाश महाजन यांच्याविरोधातील अविश्वास ठराव मंगळवारी पालिका सभागृहात मंजूर करण्यात आला. या ठरावाच्या समर्थनार्थ एकूण ९५ मते पडली तर ठरावाच्या विरोधात १३ जणांनी मतदान केले. उर्वरित पाच नगरसेवक यावेळी गैरजहर होते. विशेष गोष्ट म्हणजे आयुक्तांविरोधातील अविश्वास ठराव मंजूर करण्यासाठी शिवसेना-भाजप आणि एमआयममध्ये एकी दिसून आली. दरम्यान, काँग्रेस आणि राष्ट्रवादीने या ठरावाच्या विरोधात मतदान केले.
महाजन यांच्याविरोधात अविश्वास ठराव मंजूर करण्यासाठी सर्व पक्षांनी आपापली ताकद पणाला लावली होती. शिवसेनेकडून नगरसेवकांसाठी व्हीप जारी करण्यात आला होता. दरम्यान, हा ठराव मंजूर व्हावा या साठी पालकमंत्री रामदास कदम यांनी थेट पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची परवानगी घेतली होती. मात्र, या निर्णयावर खासदार चंद्रकांत खैरे नाराज असल्याची चर्चा होती. यापूर्वीच या विषयावर माझी भूमिका जाहीर केली होती. आता हा विषय पालकमंत्री महोदयांच्या देखरेखीखाली सुरू आहे. तेव्हा यात मी न बोललेलेच बरे, असे सांगत खैरे यांनी कदम यांच्याविषयीची नाराजी बोलून दाखविली होती. त्यामुळे आयुक्तांवरील अविश्वासानिमित्त पालकमंत्री विरुद्ध खैरे वादात कोणाची सरशी होणार, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते.