News Flash

महाराष्ट्र केसरीच्या मैदानात, खोतकर-दानवेंचा राजकीय आखाडा

निमंत्रण पत्रिकेत दानवे पिता-पुत्रांची नावं वगळली

शिवसेनेचे राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी जालन्यात महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचं यशस्वीपणे आयोजन करुन दाखवत, जिल्ह्याच्या राजकारणात आपलं वजन दाखवून दिलं. स्पर्धेच्या उद्घाटनासाठी खोतकर यांनी राजकारणातील सर्वपक्षीय मान्यवर व्यक्ती, सेलिब्रेटी, खेळाडू यांना जालन्यात आणलं. मात्र या आयोजनादरम्यान जालन्यामध्ये खोतकर विरुद्ध दानवे या शीतयुद्धाची चर्चा रंगताना दिसते आहे. कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रिकेतून खोतकर यांनी दानवे पिता-पुत्रांचं नाव वगळून आपले इरादे स्पष्ट केले आहेत.

स्पर्धेच्या निमंत्रण पत्रिकेवर नजर टाकली असता, संयोजक अर्जुन खोतकर यांनी राष्ट्रवादीचे माजी आमदार चंद्रकांत दानवे, राजेश टोपे, सिल्लोडचे काँग्रेस आमदार अब्दुल सत्तार, बबन लोणीकर, हरिभाऊ बागडे यांची नावं पत्रिकेवर टाकली. याचसोबत जिल्ह्यातील अन्य मान्यवर व्यक्तींनाही खोतकर यांनी निमंत्रण पत्रिकेवर स्थान दिलं आहे. मात्र जालन्याचे खासदार रावसाहेब दानवे आणि त्यांचा मुलगा आमदार संतोष दानवे यांना या यादीमध्ये स्थान न देऊन खोतकरांनी आगामी निवडणुकीसाठी दानवेंविरोधात शड्डू ठोकला आहे. यामुळे जिल्ह्याच्या राजकारणात गेल्या काही महिन्यांपासून सुरु असलेला दानवे-खोतकर वाद अधिकच शिगेला गेल्याचं दिसून येतंय.

आगामी लोकसभा निवडणुकीत युती होवो अथवा न होवो रावसाहेब दानवेंच्या विरोधात जालन्यातून निवडणूक लढवणार असल्याचे अर्जून खोतकर यांनी आधीच जाहीर केले आहे. नुकत्याच झालेल्या पाच पैकी तीन राज्यात भाजपची सत्ता गेली. परिणामी स्वबळाची भाषा करणाऱ्या भाजपने शिवसेनेशी युती करण्याचे प्रयत्न युध्दपातळीवर सुरू झाले आहेत.  भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमीत शहा यांनीच मुंबईत तसे संकेतही दिले. तर प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी देखील शिवसेनेशी युती होणार असल्याचा राग आळवायला सुरूवात केली आहे. पण त्याचा काहीही परिणाम अर्जून खोतकर यांच्या निवडणूक लढवण्याच्या निर्णयावर झालेला नाही हे त्यांनी निमंत्रण पत्रिकेतून दानवे पिता-पुत्रांचे नाव वगळून दाखवून दिले आहे. त्यामुळे आगामी काळात रावसाहेब दानवे खोतकरांनी खेळलेल्या चालीला कसं उत्तर देतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 21, 2018 6:56 pm

Web Title: political tussle arises in jalna between raosaheb danve and arjun khotkar at maharashtra kesri wrestling competition
टॅग : Bjp,Jalna
Next Stories
1 एक जानेवारीला भीमा-कोरेगावला जाणारच – प्रकाश आंबेडकर
2 जर्मनीची कॅथरीना झाली नगरची सून…
3 शिवसेनाप्रमुखांच्या स्मारकासाठी 14 कोटींचे मुद्रांक शुल्क माफ
Just Now!
X