लोकनेते गोपीनाथ मुंडे यांचा आकस्मिक मृत्यू सांगलीकरांना चटका लावणारा ठरला आहे. त्यांच्या अकाली निधनाने सांगली जिल्ह्यातील भाजपमध्ये अस्वस्थता पसरली असून, भाजपमध्ये बहुजनांचा चेहरा हरपल्याची भावना व्यक्त होत आहे. मुंडे यांच्या निधनानंतर भाजपतील बेरजेचे राजकारण आगामी विधानसभा निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर कोणत्या टप्प्यावर जाऊन पोहोचते हे येणारा काळच सांगणार आहे.
सांगली जिल्ह्यातील विविध घटनांचे साक्षीदार म्हणून गोपीनाथ मुंडे यांची ओळख अवघ्या जिल्ह्याला आहे. कसबे डिग्रजमध्ये शेतकऱ्यांवर झालेला लाठीहल्ला असो वा मिरजेत गणेशोत्सवाच्या कालावधीत झालेली दंगल असो अथवा आसंगी तुर्क येथील सामूहिक जळीत प्रकरण असो, मुंडे धावत आले नाहीत असे कधी घडलेले नाही. जिल्ह्याच्या दुष्काळी भागाचा पाणीप्रश्न असो अथवा सांगलीच्या शेरीनालाचा प्रश्न असो, मुंडे यांनी प्रश्न हाती घेतला की त्यासाठी जिवापाड प्रयत्न करणार हे ठरलेलेच असायचे. त्यामुळे सांगलीला आपली मानणारा एक लोकनेता हरपल्याची सामान्य माणसाची प्रतिक्रिया खूपच बोलकी म्हणावी लागेल.
पश्चिम महाराष्ट्र हा काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. गावच्या ग्रामपंचायतीपासून मिनी मंत्रालय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जिल्हा परिषदपर्यंत  बहुसंख्य सत्तास्थाने आघाडीच्या ताब्यात असताना नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपला मिळालेले अभूतपूर्व यश हे मुंडे यांच्या बेरजेच्या राजकारणाचे फलित म्हणावे लागेल. कसबे डिग्रज येथे शेतकऱ्यांवर अन्याय होताच आ. संभाजी पवार यांच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन सर्वात अगोदर मुंडेच या ठिकाणी हजर झाले होते. त्यानंतर आघाडीच्या बालेकिल्ल्याला सर करण्यासाठी मुंडे यांनी आपले राजकीय कसब पणाला लावले. जिल्ह्यातील तीन विधानसभा मतदारसंघांत भाजपला मिळालेल्या यशापाठीमागे मुंडे यांची दूरदृष्टीच कारणीभूत होती.
जिल्ह्यात असलेले तीनही आमदार संभाजी पवार, सुरेश खाडे, प्रकाश शेंडगे हे भाजपमधील गोपीनाथ मुंडे यांच्या गटाचे म्हणून ओळखले जातात. तोंडावर आलेल्या विधानसभा निवडणुकीसाठी नव्याने राजकीय समीकरणे अपेक्षित आहेत. लोकसभा निवडणुकीत भाजपला मिळालेले मताधिक्य पाहता या निवडणुकीत महायुतीच्या माध्यमातून परिवर्तनाची लढाई होण्याची चिन्हे दिसत असताना मुंडे यांची राजकीय पटलावरून झालेली एक्झिट चटका लावणारी आहे. जतचे विलासराव जगताप, कवठेमहांकाळचे अजित घोरपडे, सांगलीचे दिनकर पाटील आदी मंडळी निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर मुंडे यांच्या संपर्कात होते. आता पुन्हा नव्याने राजकीय मांडणी होणार की काय, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
मुंडे यांनी राजकारणाची बेरीज करीत असताना भाजपमधील पूर्वासुरीच्या नेतृत्वाला पटवून देण्याबरोबरच कार्यकर्त्यांना सन्मान मिळवून देण्यासाठी स्वत:चे राजकीय वजन नेहमीच वापरले. त्याचा लाभ सामान्य कार्यकर्त्यांना झालाच, पण प्रस्थापितांना राजकीय जागा दाखवण्यासाठीही झाला. गोपीनाथ मुंडे यांच्या अचानक जाण्याने सांगलीच्या राजकारणात अस्वस्थता निर्माण होणे स्वाभाविकच म्हणायला हवे.