पंचायती, नगरपालिकांमध्ये राष्ट्रवादी तर गावपातळीवर भाजप

पंकजा मुंडे यांनी जिल्हा परिषद सत्तांतरात राष्ट्रवादीच्या प्रमुख तीन नेत्यांना आपल्या बाजूने घेत जुळवलेल्या नव्या राजकीय समीकरणामुळे ग्रामपंचायत निवडणुकीत सर्वाधिक तब्बल साडेचारशे ग्रामपंचायती भाजपच्या खात्यावर जमा झाल्या. गावपातळीवर शिवसेना, शिवसंग्राम ला मिळालेले हे यश आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसाठी भाजपलाच बळ देणारे ठरणार आहे. त्यामुळे नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत चांगले यश मिळालेली राष्ट्रवादी काँग्रेस गावपातळीवरील निवडणुकीत मात्र पिछाडीवर गेली असून काँग्रेसला तर दोन अंकी आकडाही पार करता आला नाही.

बीड जिल्ह्यातील राजकीय परिस्थिती कायम अस्थिर ठेवण्यात मतदारांचा चाणाक्षपणा सातत्याने दिसून आला आहे. तीन वर्षांपूर्वी झालेल्या विधानसभा व लोकसभा निवडणुकीत भाजपला एकतर्फी साथ मिळाली. लोकसभेला खासदार डॉ.प्रीतम मुंडे देशात विक्रमी मतांनी विजयी झाल्या. विधानसभेच्या सहापकी पाच मतदारसंघात भाजपचे आमदार मोठय़ा मताधिक्याने निवडून आले.

पंकजा मुंडे यांच्याकडे पालकमंत्री पदाची धुरा आल्यानंतर मागील तीन वर्षांत सार्वजनिक विकासाला गती देण्यासाठी त्यांनी मोठय़ा प्रमाणात विकास निधी खेचून आणला तरी नगरपंचायत, नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत मात्र भाजपला दारुण पराभवाचा सामना करावा लागला. मंत्री मुंडे यांच्या मतदारसंघातील परळी नगरपालिका, जिल्हा परिषद व पंचायत समितीत एकतर्फी विजय मिळवून राष्ट्रवादी काँग्रेसचे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी आपले वर्चस्व निर्माण करून जिल्हा परिषदेची सत्ता कायम ठेवण्याचा प्रयत्न चालवला होता. मात्र पंकजा मुंडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी मंत्री सुरेश धस यांना थेट भाजप घेऊन तर माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर, अक्षय मुंदडा यांची अप्रत्यक्ष मदत घेऊन जिल्हा परिषदेची सत्ता राष्ट्रवादीकडून खेचून घेत नवी राजकीय समीकरणे उदयाला आणली.

परिणामी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत चांगले यश मिळालेले असतानाही राजकीय डावपेचात पंकजा यांनी राष्ट्रवादीला धक्का दिला.

  • राष्ट्रवादीअंतर्गत गटबाजी उफाळून आल्यानंतर याचा फायदा घेत पंकजा यांनी विधानसभेच्या सर्व मतदारसंघांत भाजपची ताकद वाढवण्यात यश मिळवले. परिणामी नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत साडेसहाशेपकी तब्बल भाजप व मित्रपक्ष शिवसेना आणि शिवसंग्राम यांच्या मिळून सर्वाधिक साडेचारशे ग्रामपंचायती भाजपच्या खात्यावर जमा झाल्या आहेत.
  • परळी तालुक्यातील ७४ पकी ४२ तर अंबाजोगाई तालुक्यातील ७१ पकी ४१ ग्रामपंचायती भाजपकडे आल्याने ग्रामीण भागात भाजपलाच जनसमर्थन असल्याचे स्पष्ट झाले आहे. तर आष्टी मतदारसंघात सुरेश धस भाजपबरोबर आल्यामुळे धस गटाच्या आणि विद्यमान आमदार भीमराव धोंडे यांच्या तिन्ही तालुक्यांतील १६७ पकी तब्बल १२५ ग्रामपंचायती भाजपच्या खात्यावर जमा झाल्या आहेत. तर गेवराईत विद्यमान आमदार लक्ष्मण पवार यांच्या नेतृत्वाखाली भाजपला ७८ पकी १५ आणि शिवसेनेचे माजी मंत्री बदामराव पंडित यांना ३५ ग्रामपंचायती मिळाल्याने भाजपचेच बळ वाढले आहे. तर माजलगाव मतदारसंघातही विद्यमान आमदार आर.टी.देशमुख, स्थानिक आघाडय़ांचे नेते यांच्या नेतृत्वाखालील एकूण ९८ पकी ४८ ग्रामपंचायती भाजपकडे आल्याचा दावा करण्यात आला आहे. तर केज मतदारसंघातही रमेश आडसकर, विद्यमान आमदार संगीता ठोंबरे यांच्या नेतृत्वाखाली १३७ पकी ८७ ग्रामपंचायतीवर भाजपचा झेंडा फडकल्याचा दावा आहे. विधानसभेच्या बीड मतदारसंघात भाजपने २६ तर आमदार विनायक मेटे यांच्या शिवसंग्रामने चाळीस जागा जिंकल्या.
  • जिल्हा परिषदेत शिवसेना, शिवसंग्राम भाजपबरोबर असल्याने बदलत्या राजकीय समीकरणामुळे ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपला चांगले यश मिळाल्यामुळे आगामी सार्वत्रिक निवडणुकीत भाजपचा मार्ग गावपातळीवर सुकर होईल, असे मानले जात आहे.