शेतक -यांच्या जीवनात नवसंजीवनी निर्माण करणारी सहकार चळवळ मोडीत काढण्याचे राजकारण करणा-या खासदार राजू शेट्टी यांचा पराभव करून सहकार चळवळ वाचविण्यासाठी ही निवडणूक महत्त्वाची आहे, असे प्रतिपादन राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष, आमदार के. पी. पाटील यांनी केले. आळते (ता. हातकणंगले) येथे राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते. जिल्हा परिषद सदस्य अरुण इंगवले अध्यक्षस्थानी होते.    
मेळाव्यात अनेक कार्यकर्त्यांनी माजी खासदार निवेदिता माने व जिल्हा परिषदेचे सदस्य धैर्यशील माने यांनी गेल्या पाच वर्षांत कार्यकर्त्यांना विश्वासात घेतले नसल्याने नाराजी व्यक्त केली. त्यावर पक्षनिरीक्षक चंद्रकांत वागळे यांनी कार्यकर्त्यांच्या नाराजीचा अहवाल ग्रामविकासमंत्री जयंत पाटील यांच्याकडे देणार असल्याचे सांगितले. राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष किरण इंगवले यांनी स्वागत केले. या वेळी अनिल कांबळे, दीपक वाडकर, प्रा. बी. के. चव्हाण, जिल्हा परिषद माजी अध्यक्ष नाना गाठ, इचलकरंजीचे शहराध्यक्ष मदन कारंडे यांची भाषणे झाली. मेळाव्यास कृष्णात पवार, डी. एम. माळी, वसंत बोंगाळे, वसंतराव चव्हाण, राजू शिंदे, डी. जे. पाटील, शिवाजीराजे भोसले, संतोष माने उपस्थित होते.