महाराष्ट्र राज्य शासन कर्नाटकच्या तुलनेत उद्योजकांना भरभक्कम सवलती देत आहे. तथापि, राज्यातील उद्योजकांना कर्नाटकात नेण्यामागे राजकारण आहे, अशी टीका उद्योगमंत्री नारायण राणे यांनी येथे रविवारी पत्रकारांशी बोलताना केली. याचवेळी कर्नाटकात उद्योग स्थलांतरित करणाऱ्या उद्योजकांना उद्देशून त्यांनी कर्नाटक हे काय थंड हवेचे ठिकाण आहे का? असा खोचक प्रश्न उपस्थित केला. याचवेळी त्यांनी राजकीय भूमिका मंगळवारीच जाहीर करू असे सांगत अधिक संवाद करण्याचे टाळले.
कोल्हापूर, सांगली जिल्ह्यातील उद्योजक राज्य सरकार पुरेशा सोई-सुविधा देत नसल्याचे कारण पुढे करीत उद्योग कर्नाटकात स्थलांतर करण्याच्या प्रयत्नात आहेत. कर्नाटक शासनानेही या उद्योजकांना सवलतीची खैरात करण्याचे ठरवले आहे. या पाश्र्वभूमीवर उपस्थित केलेल्या प्रश्नावर उद्योगमंत्री राणे यांनी कर्नाटक शासनावर प्रहार केला.
राजकीय हालचालीबाबत विचारणा केली असता राणे म्हणाले, मी मराठा असून निर्णयासाठी कधीच थांबत नाही. शब्द पाळावे असे मराठय़ांचे घोषवाक्य आहे. त्यामुळे दोन दिवस प्रतीक्षा करा, जे काय सांगायचे ते मी मंगळवारी सांगेन. सिंधुदुर्गात मी बोलेन तेच चालते असे सांगत ‘सावंतवाडीपुरता मर्यादित आमदार’ असा उल्लेख करत केसरकर यांच्यावर नाव न घेता बोलणे टाळले.