थंड हवेचे ठिकाण म्हणून ओळख असलेल्या लोणावळा शहरातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. लोणावळा शहराची सत्ता काबीज करण्यासाठी भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना व काँग्रेस यांनी कंबर कसली आहे.

लोणावळा शहरात गेल्या दशकभरापासून कोणत्याही राजकीय पक्षाची एकहाती सत्ता नाही. त्यामुळे शहराचा पायाभूत विकास खुंटला आहे. सर्वाना बरोबर घेऊन जाताना करावी लागणारी रस्सीखेच सर्वश्रुत असल्याने शहरातील विकासकामांना खीळ बसली आहे. ही परिस्थिती लक्षात घेऊन सर्व राजकीय पक्षांनी तगडे उमेदवार िरगणात उतरवत एकहाती सत्ता मिळविण्यासाठी या वेळी कंबर कसली आहे. तरी जेवढय़ा जागा आहेत तेवढे उमेदवार देण्यात सर्वच राजकीय पक्ष अपयशी ठरले आहेत. त्यामुळे नेत्यांनी कितीही वल्गना केल्या तरी लोणावळ्यात कोणत्याही एका राजकीय पक्षाची एकहाती सत्ता येणे अवघड असल्याने सर्वाच्या नजरा नगराध्यक्ष कोणाचा होणार याकडे लागल्या आहेत.

लोणावळ्याचे नगराध्यक्षपद हे सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी राखीव आहे. या जागेसाठी भारतीय जनता पक्षाने माजी नगराध्यक्ष सुरेखा जाधव यांना उमेदवारी दिली आली असून राष्ट्रवादी काँग्रेसने नगराध्यक्ष अमित गवळी यांची पत्नी शालिनी यांना तर काँग्रेसने तालुका काँग्रेसचे अध्यक्ष डॉ. किरण गायकवाड यांची पत्नी शुभांगी यांना संधी दिली आहे. शिवसेनेने काँग्रेसच्या नगरसेविका व दिवंगत नगराध्यक्ष राजू चौधरी यांची पत्नी शादान यांना शिवसेनेत प्रवेश देऊन नगराध्यक्षपदाची उमेदवारी दिली आहे. बसपाने संध्या भोसेकर यांना उमेदवारी दिली आहे तर अपक्ष उमेदवार वैशाली पोटफोडे यांना मनसेने पुरस्कृत केले आहे. सहा उमेदवार नगराध्यक्षपदाच्या िरगणात आहेत. खरी लढत भाजपच्या सुरेखा जाधव, राष्ट्रवादीच्या शालिनी गवळी, काँग्रेसच्या शुभांगी गायकवाड आणि शिवसेनेच्या शादान चौधरी यांच्यात रंगणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नगराध्यक्ष अमित गवळी यांनी गेल्या अडीच वर्षांच्या काळात केलेली विकासकामे व आगामी विकासकामे यांचा समावेश वचननाम्यात केला आहे.

काँग्रेसने लोणावळ्याचा पर्यटनात्मक विकास डोळ्यासमोर ठेवून जाहीरनामा बनविला आहे. भाजप व शिवसेनेने आगामी काळात शहराचा विकास कसा करणार याचा समावेश करून वचननामे तयार केले आहेत.

लोणावळा शहरात १२ प्रभागांतून नगरसेवकपदाच्या २५ जागांसाठी १११ उमेदवार आपले भाग्य अजमावत आहेत.

भाजपच्या बालेकिल्ल्यात..

भांगरवाडी प्रभाग क्र. ५ मध्ये सर्वसाधारण महिला जागेसाठी भाजपाच्या शहराध्यक्ष अपर्णा बुटाला, राष्ट्रवादीकडून माजी नगरसेवक मनोज लऊळकर यांची आई विमल लऊळकर, शिवसेनेच्या मयुरी हिरवे व भाजपाच्या पुणे जिल्हा युवती अध्यक्षा अश्विनी जगदाळे यांनी बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी भरल्याने चौरंगी सामना रंगणार आहे. सर्वसाधारण जागेसाठी भाजपाकडून माजी कार्याध्यक्ष देविदास कडू, शिवसेनेकडून शिक्षण मंडळाचे उपसभापती व भाजपाचे पदाधिकारी प्रदीप थत्ते यांच्यासह भाजपाचे स्वीकृत नगरसेवक दत्तात्रय येवले यांनी अपक्ष म्हणून तर सचिन तळेकर यांनी काँग्रेस पुरस्कृत उमेदवारी घेतली आहे. भाजपाचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या भांगरवाडीत कडू, येवले व थत्ते हे तीनही भाजपा विचारांचे उमेदवार असल्याने त्यांच्यातील कोणी सरस ठरणार की तळेकर बाजी मारणार याकडे लक्ष लागले आहे.

प्रतिष्ठेची लढत

  • जुना खंडाळा प्रभाग क्र. १० मधील नागरिकांचा मागासप्रवर्ग या जागेकरिता विद्यमान नगराध्यक्षांनी अचानक उमेदवारी मागे घेतल्याने चौरंगी लढत होणार असून येथे विद्यमान उपनगराध्यक्ष भाजपाचे भरत हारपुडे, शिवसेनेचे गणेश इरले, काँग्रेसचे धनंजय काळोखे व अपक्ष मधुकर साळुंखे हे िरगणात उतरले आहेत.
  • सर्वसाधारण महिला जागेवर तिरंगी लढत होत असून काँग्रेसने माजी नगरसेवक विलास बडेकर यांची पत्नी शांता यांना तर शिवसेनेने सुनील इंगूळकर यांची पत्नी सारिका यांना उमेदवारी दिली आहे. विद्यमान नगरसेवक विठ्ठल कडू यांची पत्नी अंजनी यांनी राष्ट्रवादी पुरस्कृत उमेदवारी घेतली आहे.
  • अतिशय अटितटीची व प्रतिष्ठेची अशी ही लढत होणार आहे. लोणावळा शहराचे गावठाण असलेल्या प्रभाग क्र. ११ मधील अनुसूचित जाती जागेकरिता सात जण निवडणूक िरगणात उतरले आहेत.
  • त्यात नगरसेवक गिरीश कांबळे, राष्ट्रवादी सेवादलाचे प्रदेशाध्यक्ष दीपक मानकर, भाजपा कार्ड कमिटीचे अध्यक्ष सुभाष सोनवणे, काँग्रेसचे संजय घोणे, मानव अधिकार संघटनेचे निरंजन कांबळे, प्रफुल्ल काकडे, माजी नगराध्यक्ष बलराज रिले यांचा समावेश आहे.
  • सर्वसाधारण महिला जागेसाठीही सहा महिला निवडणूक िरगणात आहेत. शिवसेनेच्या नगरसेविका सौम्या शेट्टी यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज भरला असून काँग्रेसच्या महिला शहराध्यक्षा संध्या खंडेलवाल, राष्ट्रवादीच्या उज्ज्वला चव्हाण, मीना गवळी अनिता जाधव उषा जाधव या येथून निवडणूक लढवत आहेत.