विश्वास पवार

सातारा शहराची दोन दशकांहून अधिक काळ प्रलंबित असलेली हद्दवाढीची अधिसूचना अखेर प्रसिद्ध झाली आणि त्याचे श्रेय घेण्यावरून लगेचच राजकीय वातावरण तापले. अधिसूचनेची प्रत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्याकडे सुपूर्द के ल्याने राजकीय चर्चा सुरू झालीच, पण स्वपक्षीयांना डावलल्याने राष्ट्रवादी काँग्रेसची मंडळीही नाराज झाली.

sunil tatkare on raj thackeray support,
“रायगडमध्ये मनसेची मोठी ताकद, त्यामुळे…”; राज ठाकरेंच्या पाठिंब्यानंतर सुनील तटकरे यांची प्रतिक्रिया
Raj thackeray, Mahayuti, MNS,
मनसेच्या पाठिंब्याने महायुतीचा फायदा किती ?
Leaders of Mahayuti gathered in Kolhapur Determination of sanjay Mandaliks victory
कोल्हापुरात महायुतीचे नेते एकवटले; मंडलिक यांच्या विजयाचा निर्धार
amar kale wardha marathi news, ramdas tadas marathi news
वर्ध्यात राष्ट्रवादीच्याच दोघांमध्ये लढत ?

राज्य शासनाने सातारा शहराच्या हद्दवाढीचा निर्णय घेतल्याने साताऱ्याच्या उपनगरांना पालिकेची सेवा-सुविधा मिळण्याचा मार्ग मोकळा झाला. सातारा पालिकेच्या प्रस्तावित हद्दवाढीमुळे पालिकेचे क्षेत्र ८.७ चौरस किलोमीटरवरून सुमारे १२ चौरस किलोमीटर इतके होणार आहे. पालिका हद्दीतील शहराची लोकसंख्या २०११च्या जनगणनेनुसार एक लाख २९ हजार असून, त्यात हद्दवाढीमुळे आणखी सव्वा लाखांहून अधिक लोकसंख्येची भर पडणार आहे. हद्दवाढीमुळे शेजारची उपनगरे साताऱ्यात आल्याने शहर विकासाला चालना मिळेल.

सातारा शहर हद्दीलगत असणाऱ्या उपनगरांतील नागरिक आपल्या दैनंदिन व्यवहाराकरिता सातारा शहरात येतात. या लोकसंख्येचा फार मोठा बोजा पालिकेवर पडत होता. आता हद्दवाढ झाल्याने नगर परिषदेच्या विस्ताराला वाव मिळणार आहे. नव्याने लोकसंख्या आणि परिसराचा समावेश नगर परिषदेत झाल्याने या भागातील सर्व नागरिकांना मूलभूत सोयी सुविधा पालिकेला पुरवाव्या लागणार आहेत. ग्रामपंचायत हद्दीत आणि त्रिशंकू भागातील कचऱ्याचा प्रश्न मार्गी लागणार आहे. रस्ते, गटार, पाणी, दिवाबत्ती आदी मूलभूत सुविधांसह आता जुने आणि नवे भाग यांच्या सर्वागीण विकासाकरिता नियोजनबद्ध प्रयत्न केले जातील.

सातारा शहरातून जाणाऱ्या पुणे-बंगळूरु महामार्गाच्या पश्चिमेकडील भाग आणि त्या क्षेत्रातील त्रिशंकू भाग व ग्रामपंचायती नव्या हद्दवाढीत समाविष्ट करण्यात आल्या आहेत. पूर्वी अजिंक्यतारा किल्ला पालिकेच्या हद्दीबाहेर होता. आता संपूर्ण किल्ला, तसेच महादरे गावचा यवतेश्वर डोंगराच्या हद्दीपर्यंत सर्व भाग पालिका हद्दीत येणार आहे. करंजे, खेड, दरे खुर्द, कोडोली, गोडोली अशा परिसराचा सातारा पालिकेच्या हद्दीत समावेश झाला आहे. खेड आणि कोडोली परिसरातील महामार्गाच्या पश्चिमेकडील क्षेत्राचा समावेश झाला आहे.

हद्दवाढीमुळे सातारा शहर साडेतीन ते चार लाख लोकसंख्येचे होणार आहे. एवढय़ा लोकसंख्येला सुविधा देण्याचे आव्हान पालिका प्रशासनासमोर असणार आहे. नव्याने समाविष्ट होणाऱ्या भागामुळे २० नगरसेवक वाढतील आणि ही संख्या ६० होईल.

हद्दवाढीमुळे साताऱ्याचे राजकारणही तापले आहे. करोना संसर्गामुळे चर्चा बंद आणि पत्रकबाजी सुरू आहे. हद्दवाढीचे श्रेय घेण्यावरून राजघराण्यातील दोन्ही राजांमध्ये एकाच पक्षात (भाजप) असतानाही श्रेयासाठी चढाओढ सुरू आहे. खासदार उदयनराजे म्हणतात, हद्दवाढीसाठी मी प्रयत्न केले, तर अजित पवारांनी हद्दवाढीची प्रत भाजप आमदार शिवेंद्रसिंहराजे यांच्याकडे दिली. यावेळी राष्ट्रवादी पक्ष, जिल्ह्य़ाचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील, खासदार श्रीनिवास पाटील अथवा राष्ट्रवादीचे पदाधिकारी उपस्थित नव्हते. यामुळे राष्ट्रवादीचेकार्यकर्ते नाराज आहेत.

सातारा नगरपालिका, लोकसभा अथवा विधानसभा निवडणूक जवळ आली की राजघराणे एकत्र येते आणि निवडणूक जिंकते. त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस आणि कार्यकर्ते दुय्यम ठरतात. त्यामुळे पक्षनेतृत्वाविषयी नाराजी आहे. शिवेंद्रसिंहराजे यांचे कार्यकर्ते अजित पवार आणि शिवेंद्रसिंहराजे यांच्या मैत्रीचे, सहकार्याचे समाज माध्यमातून कौतुक करताना दिसत आहेत.

शहराची हद्दवाढ १९७७ पासून प्रलंबित होती. १९९७-९८ मध्ये नव्याने हद्दवाढीचा प्रस्ताव शासनाकडे सादर करण्यात आला होता. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सहकार्यामुळे हद्दवाढीचा प्रस्ताव अंतिम टप्प्यात पोहोचला होता. याचे श्रेय मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि फडणवीस यांना आहे.

उदयनराजे भोसले, खासदार

सातारा शहरालगतचा त्रिशंकू भाग नागरी सुविधांपासून वंचित होता. अजिंक्यतारा किल्ला पालिकेच्या हद्दीबाहेर होता. हद्दवाढीमुळे शेजारची उपनगरे साताऱ्यात येणार असल्यामुळे विकासाला चालना मिळणार आहे.

– शिवेंद्रसिंहराजे भोसले, आमदार, सातारा

सातारच्या हद्दवाढीच्या १९९७-९८ पासून भिजत पडलेल्या प्रश्नाला सर्वप्रथम वाचा फोडण्याचे काम सातारचे खासदार उदयनराजे भोसले यांनी केले. त्याला यश आले असून एक चांगला निर्णय झाला आहे. शहराचा नियोजनबद्ध विकास करण्यासाठी सर्वाच्या सहकार्याने उपाय योजले जातील.

– माधवी कदम, नगराध्यक्षा, सातारा

नव्याने समाविष्ट होणाऱ्या भागातून पालिकेला लगेच कर घेता येणार नाही. शासनाच्या नियमानुसार सुरुवातीला तेथे सुविधा पुरवाव्या लागतात. त्यानंतर पाच वर्षांत नव्या भागात टप्प्याटप्प्याने कर वाढविले जातील. हद्दवाढीसाठी आवश्यक असणारी प्रक्रिया राबविण्यास सुरुवात करण्यात येईल.

– अभिजित बापट, मुख्याधिकारी, सातारा