धर्म ही आपली वैयक्तिक बाब आहे, त्यामुळे त्याचे राजकारण करणं चुकीचं आहे असं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटलं आहे. शेकापचे आमदार बाळाराम पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून यावेळी शरद पवार यांनी कमोठ्यात उपस्थिती लावली. यावेळी बोलताना धर्माचं राजकारण करणं चुकीचं असल्याचं त्यांनी म्हटलं. भाजपा सरकारकडून धार्मिक राजकारण केले जात असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला.

‘धर्म ही आपली वैयक्तिक बाब आहे, त्यामुळे त्याचे राजकारण करणे चुकीचे आहे. सरकारकडून धार्मिक राजकारण केले जात आहे. विकासाचा मुद्दा पुढे करून निवडणुकीत विजयी झाले होते. मात्र विकास कुठे झालाच नाही’, असं शरद पवार यांनी म्हटलं आहे. यावेळी २०१९ निवडणुकीच्या अनुषंगाने शेकाप राष्ट्रवादी कॉग्रेसचे मनोमिलन पहायला मिळाले.

रायगड जिल्ह्यात शेतकरी कामगार पक्षाची राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर मैत्री आहे. दोन्ही पक्ष जिल्हा परिषदेत सत्तेत आहेत. अगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकसुद्धा दोन्ही पक्ष एकत्रित लढणार आहेत. राज्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादीची आघाडी जवळपास निश्चित झालेली आहे. शेतकरी कामगार पक्ष सुद्धा त्यामध्ये असणार आहे. वास्तविक पाहता हे तीनही पक्ष रायगडात एकत्र असल्याचे विधानपरिषदेच्या कोकण शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत दिसून आले होते.