28 January 2020

News Flash

मोहिते-पाटील अन् राष्ट्रवादीत कुरघोडीचे राजकारण

मोहिते-पाटील यांनी भाजपच्या मदतीने बाजी उलटवली आहे.

अकलूजमध्ये सहकारमहर्षी शंकरराव मोहिते-पाटील यांच्या १०२ व्या जयंती सोहळ्यानिमित्त आयोजित शेतकरी मेळाव्यासह अन्य विविध कार्यक्रमांसाठी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे आले होते.

|| एजाज हुसेन मुजावर

सोलापूर :  जिल्ह्य़ात सध्या जवळपास सर्व प्रमुख राजकीय पक्षांमध्ये गोंधळाचे वातावरण दिसत असून यात दोन्ही काँग्रेससह शिवसेनेत बेशिस्तीचे चित्र आहे. जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीला बहुमत मिळणे स्वाभाविक असताना भाजप पुरस्कृत समविचारी आघाडीने वर्चस्व मिळविले आहे. यात मोहिते-पाटील विरुद्ध पवार काका-पुतण्यांमधील संघर्ष पेटला आहे. गेल्या दहा वर्षांत राष्ट्रवादीअंतर्गत गटबाजीच्या राजकारणात मोहिते-पाटील गटाला कधी छुप्या तर उघडपणे डावलण्याचे कारस्थान घडले असताना आता मोहिते-पाटील यांनी भाजपच्या मदतीने बाजी उलटवली आहे.

अकलूजमध्ये सहकारमहर्षी शंकरराव मोहिते-पाटील यांच्या १०२ व्या जयंती सोहळ्यानिमित्त आयोजित शेतकरी मेळाव्यासह अन्य विविध कार्यक्रमांसाठी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे आले होते. यावेळी मोहिते-पाटील कुटुंबीयांनी भाजपचे शक्तिप्रदर्शन घडवून आणताना जिल्हा परिषदेतील सत्तासंघर्षांवरून राष्ट्रवादीची खिल्ली उडविण्यात आली.

सोलापूर जिल्ह्य़ात एकेकाळी मोहिते-पाटील गटाच्या हाती असलेली सत्तेची सूत्रे गेल्या दहा वर्षांत हळूहळू निसटत गेली आणि राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार व पुतणे अजित पवार यांच्या मर्जीतील दुसऱ्या फळीला ताकद देण्यात आली. मोहिते-पाटील गटाची जेवढी होईल तेवढी कोंडी आणि चक्क मानहानी करण्याचा प्रयत्न केला होता. यापूर्वी २०१२ साली माढय़ाच्या शिंदे बंधुंच्या अंमलाखाली जिल्हा परिषदेचा कारभार सुरू झाला तेव्हा सभापती निवडीच्यावेळी मोहिते-पाटील गटाचे शहाजीराजे ऊर्फ बाबाराजे देशमुख यांना राष्ट्रवादीची अधिकृत उमेदवारी देऊन उघडपणे पराभव केला गेला.

परंतु पक्षादेश डावलून बंडखोराला सभापतिपदी निवडून देणाऱ्या राष्ट्रवादीच्या संबंधित बहुसंख्य सदस्यांवर कोणतीही कारवाई झाली नव्हती. त्यानंतर गेल्या २०१७ मध्ये जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीचे सर्वाधिक सदस्य असतानाही पक्षाने स्वत:चा उमेदवार उभा न करता त्यावेळचे भाजपपुरस्कृत महाआघाडीच्या तंबूत गेलेले संजय शिंदे यांच्या गळ्यात अध्यक्षपदाची माळ घालण्यात आली होती. शिंदे हे पवार गटाचे असूनही त्यांना भाजपपुरस्कृत महाआघाडीच्या दरवाजातून जिल्हा परिषद अध्यक्ष करण्यात आले होते. मोहिते-पाटील यांना सत्तेपासून दूर ठेवण्याचा हाच यामागचा हेतू होता. या सर्व घडामोडींच्या पश्चात अजित पवार यांनी सोलापुरात आले तेव्हा त्यांनी पक्षातील बंडखोरीबद्दल ‘थंड’ भूमिका घेतली होती.

अशा पद्धतीने राष्ट्रवादीला एकदा भाजप पुरस्कृत महाआघाडीचा मुखवटा लावण्यात आल्यानंतर पुढे सोलापूर जिल्हा स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद निवडणुकीत राष्ट्रवादीचे अधिकृत उमेदवार दीपक साळुंखे हे पवारनिष्ठ असूनही त्यांना दुसऱ्या पवारनिष्ठ मंडळींनी उघडपणे भूमिका घेत पराभूत केले होते. म्हणजे राष्ट्रवादीत उघडपणे बंडाळी माजली असताना त्यावर पक्षश्रेष्ठींनी गांभीर्याने दखल न घेता सर्वस्वी मौन बाळगणे पसंत केले होते. कोणावरही पक्षशिस्त भंगाची कारवाई करण्याचा प्रश्नच नव्हता. कारण हे सारे राजकारण पक्षश्रेष्ठींच्या संरक्षणाखालीच खेळले जात होते.

या पार्श्वभूमीवर अलीकडे राष्ट्रवादीशी फारकत घेऊन थेट भाजपमध्ये दाखल झाल्यानंतर मोहिते-पाटील कुटुंबीयांनी बदलत्या परिस्थितीत राष्ट्रवादीचा वचपा काढण्याचा प्रयत्न केला असून त्या दृष्टिकोनातून जिल्हा परिषदेतील सत्तांतराकडे पाहिले जाते. या साऱ्या घडामोडीत अकलुजमध्ये मोहिते-पाटील यांनी राष्ट्रवादीला प्रत्युत्तर देताना दिलेले म्हणणे तेवढेच दखलपात्र ठरले आहे. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी एका रात्रीत पक्षाच्या विरोधात भूमिका घेऊन भाजपच्या वळचणीला गेले आणि भल्या सकाळी भाजपचे देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. ही उघडपणे पक्षविरोधी कृत्य करूनही अजित पवार हेच पुन्हा उपमुख्यमंत्री कसे झाले? त्यांच्यावर पक्षविरोधी कारवाई केल्याबद्दल कारवाई का झाली नाही, असा सवाल विजयसिंह मोहिते-पाटील यांचे बंधू जयसिंह मोहिते-पाटील यांनी उपस्थित केला. तसेच यापूर्वी जिल्हा परिषदेत पक्षविरोधी झालेल्या कारवायांबद्दल संबंधितांनावर कारवाई का झाली नाही? विधान परिषद निवडणुकीत पक्षाचे बहुमत असतानाही पक्षाचे उमेदवार दीपक साळुंखे यांचा पराभव करणाऱ्यांवर कारवाई का झाली नाही? अलीकडे विधानसभा निवडणुकीत सांगोल्यात पक्षाचे माजी जिल्हाध्यक्ष दीपक साळुंखे यांनी उघडपणे पक्षाच्या विरोधात भूमिका घेत शिवसेनेला पाठिंबा दिला असताना त्यांना पुन्हा पक्षात कसे पावन करून घेतले गेले, याची उत्तरे अगोदर मिळावीत आणि मग माळशिरस भागातील जिल्हा परिषद सदस्यांवर कारवाई करावी, अशा कारवाईला घाबरणारे आम्ही काही लेचेपेचे नाही, असे प्रतिआव्हान मोहिेते-पाटील यांनी दिले आहे.

वादाचे कारण काय?

३१ डिसेंबर रोजी सोलापूर जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत स्पष्ट बहुमत असूनही महाविकास आघाडीला सत्ता राखता आली नाही. तर भाजप पुरस्कृत समविचारी आघाडीने बहुमताचा आकडा पार करीत अध्यक्ष व उपाध्यक्षपद बळकावले. यात सर्वाधिक सदस्य संख्या असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसला नामुष्की पत्करावी लागली. पक्षविरोधी कारवाया केल्याचा ठपका ठेवत माळशिरस तालक्यातील मोहिते-पाटील गटाच्या सहा सदस्यांचे सदस्यत्व रद्द होण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे दाद मागण्यात आली आहे. तत्पूर्वी, संबधित सहा सदस्यांना पक्षातून निलंबितही करण्यात आले आहे. यात मोहिते-पाटील कुटुंबीयांतील दोघा सदस्यांचा समावेश आहे. या निलंबन कारवाईचे पडसाद उमटले असून या कारवाईला मोहिते-पाटील कुटुंबीयांनी चोख उत्तर देताना, राष्ट्रवादीला प्रतिआव्हान दिले आहे. त्यामुळे या राजकीय घडामोडी सोलापूर जिल्ह्य़ासह पश्चिम महाराष्ट्रात गाजत आहेत.

 

First Published on January 15, 2020 1:12 am

Web Title: politics party ncp bjp akp 94
Next Stories
1 जमिनी घेताना आदिवासींची फसवणूक
2 प्रदूषण नियंत्रण मंडळाचे ‘वरातीमागून घोडे’
3 ‘शिवाजी महाराजांची कुणाशीही तुलना अशक्य’ -फडणवीस
Just Now!
X