News Flash

प्रदूषणकारी कारखान्यावर अखेर कारवाई

तारापूर औद्योगिक क्षेत्रातील साळवी केमिकल इंडस्ट्रीजमध्ये वर्षभरापासून काही अपघात घडले होते.

कंपनीतील सांडपाणी प्रक्रिया केंद्राचे नूतनीकरण आणि अद्ययावत करण्याच्या सूचनांचे पालन न करणे तसेच आवश्यक प्रदूषण नियंत्रण सामग्रीचा वापर करत नसल्याचे आढळल्याने तारापूर औद्योगिक वसाहतीतील साळवी केमिकल या कारखान्याला उत्पादन बंद करण्याचे आदेश महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने दिले आहेत. या कारखान्याला प्रदूषण नियंत्रण उपकरणांमध्ये बदल करून त्यांचा स्तर उंचाविण्याच्या सूचना दिल्या होत्या. तोवर कंपनीतील उत्पादन बंद ठेवण्याचे निर्देश दिले होते. मात्र त्याचे पालन झाले नसल्याचे उघडकीस आले. तसेच याकडे प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या स्थानिक अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केल्याबाबतचे वृत्त ‘लोकसत्ता’मध्ये प्रसिद्ध झाले होते. त्याची दखल घेत १२ तासांत उत्पादन बंद करण्याचे आदेश दिले.

तारापूर औद्योगिक क्षेत्रातील साळवी केमिकल इंडस्ट्रीजमध्ये वर्षभरापासून काही अपघात घडले होते. तसेच या कारखान्यातून प्रदूषण होत असल्याच्या नागरिकांच्या तक्रारी प्राप्त झाल्यानंतरदेखील प्रदूषण नियंत्रण मंडळ दुर्लक्ष करत असल्याचा आरोप केले जात होते. ३० जुलै २०१९ रोजी प्रदूषण नियंत्रण उपाययोजना करण्याबाबत प्रादेशिक अधिकारी ठाणे यांच्या दालनात चर्चादेखील झाली होती. संबंधित उपाययोजनेत सुधारणा करेपर्यंत उत्पादन स्वयंस्फूर्तीने बंद ठेवण्याचे निर्देश देण्यात आले होते. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या तारापूर येथील अधिकाऱ्यांनी ७ ऑगस्ट २०१९ रोजी कारखान्यांची तपासणी केली असता प्रदूषण नियंत्रण व्यवस्थेमध्ये आवश्यक सुधारणा करण्यात आली नव्हती. तसेच कंपनीमधील प्रदूषण नियंत्रण उपकरणे पाहणीदरम्यान सुरू नसल्याचे आदळून आले होते. असे असताना या कंपनीविरुद्ध कोणतीही ठोस कारवाई करण्यात आली नसल्याचे एका अपघटनाच्या नंतर उघडकीस आले. या कारखान्यांत झालेले अपघात याबाबत २५ सप्टेंबर रोजी ‘लोकसत्ता’ सहदैनिकात वृत्त प्रसिद्ध होताच प्रादेशिक अधिकारी डी. बी. पाटील यांनी काही तासांतच कारखाना बंद करण्याचे आदेश दिले.

महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाने बुधवारी २५ सप्टेंबर रोजी साळवी केमिकल कारखान्याला तातडीने दिलेल्या कारखाना बंदीच्या आदेशात सांडपाणी प्रक्रिया केंद्र बंद, प्रदूषण नियंत्रणात ठेवणारी उपकरणे नादुरुस्त अशा अनेक कारणांमुळे कारखाना बंद करण्याबाबत आदेश दिले आहेत. यातच तातडीने उत्पादन प्रक्रिया थांबवणे तसेच ७२ तासांत विद्युतपुरवठा व पाणी बंद करण्यात येणार असल्याचे म्हटले आहे. प्रादेशिक अधिकारी ठाणे यांनी कारखानदाराला दिलेल्या नोटिशीची माहिती व छायांकित प्रत मिळावी यासाठी तारापूर येथील प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या कार्यालयात चार ते पाच वेळा प्रयत्न केले असतानादेखील बंदीच्या आदेशाची प्रत देण्यास नकार दिला. या कंपनीत गेल्या वर्षभरात अनेक अपघात झाले आहेत. या प्रदूषणकारी उद्योगाला अधिकारी पाठीशी घालण्याचा प्रयत्न करीत असेल तर याबाबत चौकशी करून दोषी आढळल्यास कारवाई करण्यात येईल, असे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे मुख्य वैज्ञानिक अधिकारी डॉ. अमर सुपाते यांनी सांगितले.

आजवरचे अपघात

  •  २५ जानेवारी २०१९ रोजी पहाटे ३.४५ वाजता तांत्रिक बिघाडामुळे स्फोट झाला. यावेळी तेथे कामावर उपस्थित असलेल्या वैभव अहिर याच्या डोळ्याला दुखापत होऊन गंभीर जखमी झाले होते अन् इतर सहा कामगारांनादेखील दुखापत झाली होती.
  •  ५ ऑगस्ट २०१९ रोजी सकाळच्या वेळी घातक रासायनिक वायूची बाधा झाल्याने राहुल कुमार कामगार जमिनीवर पडून तडफडू लागला होता. कारखान्यात ठेकेदार पद्धतीने काम करणारा कामगार असल्याने ठेकेदार कारखान्यात येईपर्यंत कामगाराला कारखान्याबाहेर रस्त्यावर टाकण्यात आल्याची घटना घडली होती.
  •  २७ ऑगस्ट २०१९ रोजी अपघात घडला असून राजेंद्र सरोदे हा कामगार गंभीर जखमी झाला आहे. रासायनिक विषारी वायूची अभिक्रिया होऊन राजेंद्र यांचे गुप्तांग व पाय गंभीरपणे भाजले आहेत. आजही त्यांच्यावर बोईसर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
  • १७ सप्टेंबर २०१९ रोजी साळवी केमिकल कारखान्यात बेकायदेशीरपणे उत्पादन प्रक्रिया सुरू असताना रिअ‍ॅक्टरमध्ये स्फोट.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 27, 2019 2:53 am

Web Title: pollution company action akp 94
Next Stories
1 Video : ‘येवले चहा’वरील कारवाईबाबत संचालकांनी दिलं स्पष्टीकरण
2 स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर यांचा राजीनामा
3 गणेश नाईकांमुळे नवी मुंबईत मंदा म्हात्रेंचा पत्ता कट होण्याची शक्यता
Just Now!
X