उद्ध्वस्त झालेल्या कारखान्याला नोटीस; वीज, पाणीपुरवठा बंद करण्याचाही इशारा

हेमेंद्र पाटील, लोकसत्ता

बोईसर :नियमांना बगल देत घातक रासायनिक उत्पादन घेणाऱ्या कारखान्यात स्फोट झाल्याने हा कारखाना उद्ध्वस्त झाला. मात्र आता या उद्ध्वस्त कारखान्यालाच प्रदूषण नियंत्रण मंडळाने बंद करण्याची नोटीस बजावली आहे. या कारखान्याचा वीजपुरवठा व पाणीपुरवठा बंद करण्याचा इशाराही देण्यात आला आहे.

तारापूर औद्योगिक क्षेत्रात असलेल्या ए. एन. के फार्मा या कारखान्यात शनिवारी भीषण स्फोट झाला. या स्फोटात हा संपूर्ण कारखाना उद्वस्थ झाला आहे. या अपघातानंतर अनेक विभागाचे अधिकारी एकमेकांकडे बोटे दाखवत जबाबदारी झटकत आहेत. महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाचे प्रादेशिक अधिकारी डी. बी पाटील यांनी स्फोट झाल्याचा ठपका ठेवत या कारखान्याला कारखाना बंद करण्याची नोटीस पाठवली. महाराष्ट्र औद्य्ोगिक विकास मंडळाचा पाणीपुरवठा विभाग आणि वीजवितरण मंडळाला त्यांचे पत्र देत पाणीपुरवठा व विद्युतपुरवठा बंद करण्यासाठी सांगण्यात आले आहे. महत्त्वाचे म्हणजे कारखानाच उद्ध्वस्त झाला असताना पुढे कसले उत्पादन घेतले जाईल हा मोठा प्रश्न उपस्थित होत आहे. यामुळे प्रदुषण नियंत्रण मंडळाने दिलेली नोटीस हास्यास्पद असल्याने याबाबत अनेक सवाल उपस्थित केले जात आहेत.

प्रदूषण नियंत्रण मंडळाने या कारखान्याला बजावलेल्या नोटिसीनुसार १७ मार्च २०१७ ते ८ ऑक्टोबर २०१८पर्यंत अतिशर्तीवर कारखान्याला परवानगी देण्यात आली होती. नोटिसीमध्ये त्यानंतर घेतलेल्या परवानगीचा कुठेही उल्लेख नसल्याने प्रदुषण नियंत्रण मंडळाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. यातच जर कारखानदारांने कारखान्यांचे नवीन बांधकाम केल्यानंतर बांधकाम पूर्ण नसताना तसेच भोगवटा प्रमाणपत्र नसताना महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने कोणत्या नियमानुसार कारखान्याला परवानगी दिली याबाबत कोणताही अधिकारी बोलण्यास तयार नाही.

मालकावर उपचार

महाराष्ट्र औद्य्ोगिक विकास महामंडळाने स्फोट झालेल्या ए. एन. के फार्मा कारखान्याला नोटीस बजावली असली तरी प्रत्यक्षात कारखान्याच्या मालकाला नोटीस देऊ शकले नाही. स्फोटात गंभीर जखमी असलेल्या कारखान्यांच्या मालकावर मुंबई येथे खासगी रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.