राज्य सरकारकडे विशेष उपाययोजना करण्याची मागणी

हेमेंद्र पाटील, लोकसत्ता

बोईसर : आशिया खंडातील सर्वात मोठी औद्योगिक वसाहत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तारापूर औद्योगिक क्षेत्राला वाढत्या प्रदूषणामुळे देशातील सर्वाधिक प्रदूषित औद्योगिक वसाहत अशी ओळखही मिळू लागली आहे.  या पट्टय़ातील कारखान्यांचे घातक रासायनिक सांडपाणी नाल्यात सोडले जात असल्याने औद्योगिक परिसराभोवतालच्या शेतजमिनी नापीक झाल्या असून नैसर्गिक नालेही पूर्णपणे प्रदूषित झाले आहेत.

तारापूरमधील रासायनिक कारखान्यांमुळे पाणी, जमीन व हवेचे प्रदूषण मोठय़ा प्रमाणात होत असून रासायनिक कारखान्यातून निघणारे घातक रासायनिक सांडपाणी प्रक्रिया न करताच चोरटय़ा पद्धतीने नाल्यात सोडून दिले जात असल्याचे अनेकदा उघडकीस आले आहे.

केंद्र सरकारने जाहीर केलेल्या प्रदूषणकारी औद्योगिक वसाहतीत महाराष्ट्राच्या तारापूरचा पहिला क्रमांक आहे. तारापूर औद्योगिक क्षेत्रात महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या नोंदणी नुसार १०३५ कारखाने असून सुमारे २०० कारखाने हे परवानगीविना सुरू आहेत. या ठिकाणी असलेल्या रासायनिक कारखान्यातून निघणारे घातक टाकावू रसायन हे प्रक्रिया करण्यासाठी मुंबई कचरा व्यवस्थापन विभागाकडे पाठवणे बंधनकारक असताना देखील काही कारखानदार चोरटय़ा पध्दतीने रात्रीच्या वेळी नाल्यात रसायन सोडुन देत असल्याचे दिसून आले आहे. रासायनिक सांडपाणी नाल्यात सोडले जात असल्याने याभागात असलेल्या कुपनलिका देखील प्रदूषित झाल्या आहेत. नैसर्गिक नाले, खाडी, समुद्रकिनारेदेखील मोठय़ा प्रमाणात प्रदूषित असून पास्थळ येथून जाणारा नैसर्गिक नाला हा खाडीला जाऊन मिळतो मात्र त्यामध्ये औद्योगिक क्षेत्रातील रासायनिक पाणी वाहत असताना दिसते. रासायनिक कारखान्यातून रात्रीच्या वेळी मोठय़ा प्रमाणात विषारी वायू सोडला जातो. यामुळे या संपूर्ण भागात श्वस घेण्यासाठी देखील काहीवेळा त्रास होतो. विविध रासायनिक प्रक्रिया करताना त्याची अभिक्रिया होऊन निघणारे वायू रात्रीच्या वेळीच सोडले जातात. याचे प्रमाण प्रामुख्याने २३२ पीएम २.५ मायक्रोन हा उच्च स्थर असल्याचे अनेकदा गुगल अँपवरून समोर आले आहे. यातच महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे कार्यालय असलेल्या ठिकाणी लावण्यात आलेले वायू प्रदूषणमापक यंत्र गेल्या आठ वर्षांपासून बंदच आहे.

राष्ट्रीय हरित लवादाच्या आदेशाचे उल्लंघन

तारापूर औद्योगिक क्षेत्रातील कारखान्यांना सुमारे ४३ एमएलडी पाण्याचा पुरवठा केला जातो. मात्र रासायनिक सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी सामूहिक सांडपाणी प्रक्रिया केंद्राची क्षमता ही फक्त २५ एमएलडी असल्याने उर्वरित घातक रासायनिक सांडपाणी प्रक्रिया न करताच समुद्रात सोडले जात असे. परिणामी याचा विपरीत परिणाम मासेमारीवर झाला. यामुळे राष्ट्रीय हरित लवादाने औद्योगिक क्षेत्रातील कारखान्याना पुरवठा केल्या जाणाऱ्या पाण्यामध्ये ४० टक्के कपात करण्याचे आदेश दिले होते. मात्र त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे.