राज्यभरातील तंत्रनिकेतनच्या (पॉलिटेक्निक) सर्व तांत्रिक कर्मचाऱ्यांनी दीड महिन्यापासून काम बंद केल्याने व त्यांची दखल न घेताच कारवाई करण्याची भूमिका तंत्रशिक्षण विभागाने घेतल्याने निर्माण झालेल्या कोंडीच्या पाश्र्वभूमीवर आता प्राचार्यानीच या कर्मचाऱ्यांची बाजू घेतल्याने नवा घोळ निर्माण झाला आहे.

पदनाम व जबाबदाऱ्या निश्चित करा, अशी स्पष्ट भूमिका घेत या तांत्रिक कर्मचाऱ्यांनी काम न करण्याचा पवित्रा घेतला आहे. त्यावर वेतन रोखण्याची भूमिका तंत्रशिक्षण विभागाने घेतली आहे. या कोंडीत सर्व तंत्रनिकेतनमधील प्रात्यक्षिके खोळंबली आहेत. विद्यार्थ्यांना केवळ वर्गात शिकवले जात असून त्यांना तंत्रकौशल्ये शिकविणाऱ्या कर्मशाळा ठप्प पडल्या आहेत. तांत्रिक कर्मचारी म्हणजे जोडारी, सुतारी, संधाता, लोहार, कातारी, साचेकार, अशा स्वरूपात विविध विषयातील कौशल्ये विद्यार्थ्यांंना कर्मशाळेत शिकविणारे कर्मचारी होत. एकूण १५ प्रकारची कामे हे तांत्रिक  कर्मचारी करतात. त्यांच्या मते ते एकाच वेळी ज्ञानदानाचे, पर्यवेक्षकांचे व कौशल्यविकासाचे म्हणजे शिक्षक, पर्यवेक्षक व निदेशक, अशा तीनही पदांची जबाबदारी पार पाडतात. तंत्रशिक्षण संचालनालयाने शासकीय व अशासकीय अनुदानित पदविका अभ्यासक्रमाच्या पदांचा फे रआढावा घेणे २०१२ पासून सुरू केले. कार्यशाळेतील जोडारी व लोहार, अशा कर्मचाऱ्यांचे पदनाम बदलून ‘वर्कशॉप इन्स्ट्रक्टर’ असे करण्याचे निश्चित झाले. मात्र, पुढे याच मुद्यावरून प्रशासकीय न्यायाधिकरणात गेलेल्या कर्मचारी संघटनेने ‘मॅट’च्या निकालाचा संदर्भ देत तांत्रिक कर्मचारी करीत असलेली कामे त्यांची नसून ती कर्मशाळा पर्यवेक्षकाची असल्याचे स्पष्ट केले. शासकीय तंत्रनिकेतन कर्मशाळा कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष पी.एम.डिमेलो (ठाणे) यांनी यासंदर्भात स्पष्ट केले की, ‘मॅट’ने कर्मशाळा कर्मचाऱ्यांनी शिकविण्याचे काम न करता कर्मशाळा अधीक्षकांना मदत करावी, असे स्पष्ट केले आहे. शासनाच्या धोरणानुसार विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिके शिकविण्याचे काम कर्मशाळा अधीक्षकाचे आहे. मॅटच्या निवाडय़ानंतर त्याच निर्णयाचा आम्ही अंमल करीत आहोत, पण वेतन थांबविणे बेकायदेशीर आहे. मार्ग न निघाल्याने विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे, हे शासनाने लक्षात घ्यावे, असे डिमेलो यांनी स्पष्ट केले.

यासंदर्भात तंत्रशिक्षण विभागाने एक परिपत्रक काढून भूमिका मांडली. तंत्रशिक्षण विभागाच्या पदनाम निश्चितीनुसार विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिकांसाठी मार्गदर्शन करणे, ती पूर्ण करणे व अहवाल सादर करण्याचे काम तांत्रिक कर्मचाऱ्यांनाच करावयाचे आहे, त्यामुळे इतर जबाबदाऱ्यांसोबतच प्रात्यक्षिके घेणे आवश्यक आहे, असे स्पष्ट करून त्यांनी काम टाळल्यास शिस्तभंगाची कारवाईचा इशारा तंत्रशिक्षण सहसंचालक डॉ.डि.रा.नंदनवार यांनी दिला. कर्मशाळा अधीक्षकांच्या जबाबदारीची कामे न करण्यावर तांत्रिक कर्मचारी ठाम आहेत, तर कर्मशाळा अधीक्षक एकाच वेळी आठ विभागात ही जबाबदारी पाडू शकत नसल्याने कोंडी झाली आहे. आता कर्मचारी व अधिकारी आपापल्या भूमिकेवर ठाम असतांनाच या तंत्रनिकेतनचे प्राचार्य मात्र कर्मचाऱ्यांच्या भूमिकेला उचलून धरत आहेत. तंत्रज्ञान कौशल्य विकासाचे व विद्यार्थ्यांना अडचणीतून दूर करण्याचे काम हेच कर्मचारी करीत असल्याने त्यांना योग्य मोबदला मिळावा. आयटीआयतील निर्देशकांना देय असणारी वेतनश्रेणी याही कर्मचाऱ्यांना मिळावी, त्यांना प्रोत्साहित करावे, पदनामात जातीवाचक (लोहार वगैरे) उल्लेख न ठेवता पदनामात बदल करून हा प्रश्न मार्गी लावावा, अशी प्राचार्याची भूमिका आहे. येथील आचार्य श्रीमन्नारायण तंत्रनिकेतनचे प्राचार्य मोहन शिरभाते यांनी या आशयाचे पत्र तंत्रशिक्षण विभागाला दिल्याचे मान्य केले. ‘मॅट’च्या निर्णयाने तसे स्पष्ट झाले आहे. कर्मशाळेत काम करणाऱ्या या कर्मचाऱ्यांची भूमिका समजून घेतली पाहिजे, असेही ते म्हणाले. मात्र, याबाबतीत तंत्रशिक्षणाचे वरिष्ठ अधिकारी ऐकायलाही तयार नसल्याने प्रात्यक्षिकादी शिक्षणात पडल्याने विद्यार्थ्यांंचे नुकसान होत आहे. या संदर्भात बैठकच न घेण्याची भूमिका मात्र अनाकलनीय ठरली आहे.