19 October 2019

News Flash

पापलेट किनारीच गावला

१० नॉटिकल मैल अंतरावर मासेमारी करणाऱ्यांना सुगीचे दिवस

१० नॉटिकल मैल अंतरावर मासेमारी करणाऱ्यांना सुगीचे दिवस

नीरज राऊत, पालघर

इतर प्रसंगी खोल समुद्रात मिळणारा मांसाहारी मंडळींचा आवडीचा ‘पापलेट’ हा मासा यंदा किनाऱ्याजवळ मिळू लागला आहे. त्यामुळे दिवसभरात मासेमारी करणारे लहान मच्छीमार मात्र खुशीत आहेत.

सरासरी आठशे ते हजार रुपये किलो इतका दर असलेला पापलेट हा मासा २० नॉटिकल मैलाच्या पलीकडे व बहुतांश वेळ ४० ते ६० नॉटिकल मैल या क्षेत्रांत पकडला जात असतो. मात्र यंदाच्या हंगामात हा मासा किनाऱ्यापासून १० ते १५ नॉटिकल मैल अंतरावर मासेमारी करणाऱ्या बोटींना तसेच बाल-काव पद्धतीने (डोलनेट) मासेमारी करणाऱ्यांना सहजगत व मोठय़ा प्रमाणात उपलब्ध होत असल्याचे दिसून आले आहे. यामुळे दोन वा तीन सिलिंडरच्या बोटी असलेल्या लहान मच्छीमारांना सुगीचे दिवस आले आहेत.

पापलेटची मासेमारी विशिष्ट आसाची जाळी घेऊन या भागातील मच्छीमार दालदा पद्धतीने करत असतात. मात्र समुद्राच्या भूगर्भात झालेल्या काही विशिष्ट बदलांमुळे वा अलीकडच्या काळात नद्यांना मोठय़ा प्रमाणात पूर येत असल्याने आणि जमिनीवरून समुद्रात मिसळणाऱ्या पावसाच्या पाण्यासोबत येणाऱ्या मासे मटकावण्यासाठी हे पापलेट आकर्षित होत असल्याची शक्यता मच्छीमार बांधव व्यक्त करीत आहेत.

एकीकडे मोठय़ा बोटींना दहा-बारा दिवसाच्या मासेमारीच्या नंतर जेमतेम शंभर ते सव्वाशे किलो पापलेट मासा मिळत असताना कोकण किनारपट्टीजवळ एक दिवसाची मासेमारी करणाऱ्याा लहान बोटींना अनेक ठिकाणी सातशे ते आठशे किलो पापलेट मिळत असल्याची माहिती पुढे आली आहे. इतकेच नव्हे तर ‘रापण’ पद्धतीने किनाऱ्यालगत जाळी मारून  मासेमारी करणाऱ्या मच्छीमारांनाही पापलेट मासे जाळ्याला लागत नसल्याचे प्रकार घडल्याची माहिती सातपाटी येथील मच्छीमार अनिल चौधरी यांनी दिली.

खोल समुद्रातील मासेमारी धोक्यात

गणपतीनंतर मासेमारीकरिता खोल समुद्रात गेलेल्या अनेक बोटी या आठ ते बारा दिवसांच्या मासेमारीनंतर परतत असतात. अशा मासेमारी बोटींना १२-१५ खलाशांचे मनुष्यबळ व इंधनाचा प्रति फेरी सुमारे सव्वा ते दीड लाख रुपये खर्च येत असून या हंगामात पापलेटच्या मासेमारीवर या बोटींचा उदरनिर्वाह चालतो. सद्यस्थितीत पापलेट उत्पन्न अत्यल्प असल्याने या मोठय़ा मासेमारी बोटींचा खर्च वसूल होत नाही अशी स्थिती असल्याने अनेकांनी काही दिवस मासेमारीला न जाण्याचा निर्णय घेतला आहे. याउलट पाच- सहा खलाशी (भागीदार) घेऊन दैनंदिन मासेमारी करणाऱ्या लहान बोटींना २० ते ४० लिटर डिझेल इंधनाचा खर्च येत असून मिळालेल्या माशांचे समान भाग करण्याच्या (वाटा) पद्धतीमुळे अशा लहान बोटींना (२-३ सिलेंडर) खलाशांचा पगाराचा खर्च होत नसतो, यामुळे अशा लहान बोटींना चार ते पाच लाख रुपयांचे पापलेट सध्या मिळत असल्याने या सर्व लहान बोट मालकांना सुगीचे दिवस आले आहेत. आजवर मोठय़ा मच्छीमारांचा या व्यवसायावर दबदबा असायचा मात्र निसर्गाने समतोल राखण्याच्या दृष्टीने जणू मासेमारी क्षेत्रातील लहान व्यावसायिकांनादेखील चांगले दिवस दाखवले आहेत.

First Published on September 18, 2019 4:09 am

Web Title: pomfret fish found on sea shore in palghar