निर्यातदारांकडून खरेदीस विलंब होत असल्याने अजूनही दर अनिश्चित; जुन्या दरानेच पापलेटची उचल

नीरज राऊत, लोकसत्ता

पालघर : १ ऑगस्टपासून मासेमारी हंगाम सुरू झाले असून मांसाहार खवय्यांना आवडत्या अशा पापलेट (सरंगा) माशाची आवक सुरू झाली आहे. मात्र टाळेबंदीमुळे माशांचा निर्यातीचा व्यवसाय अजूनही अपेक्षित प्रमाणात सुरू न झाल्याने निर्यातदारांनी पापलेट माशांची खरेदी सुरू केली नाही. परिणामी पापलेटचे घाऊक खरेदी दर अजूनही निश्चित झाले नाहीत.

सातपाटी व मुरबे या भागांतील मच्छीमारांकडून डालदा पद्धतीने पापलेटची मासेमारी केली जाते. ऑगस्ट ते डिसेंबर यादरम्यान पापलेटची आवक अधिक प्रमाणात असते. पश्चिम किनारपट्टीवर मिळणाऱ्या पापलेटपैकी अधिक तर पापलेटची सातपाटी भागातील मच्छीमार मासेमारी करीत असून येथील अधिक तर पापलेट निर्यात होत असते. सातपाटी येथील सहकारी मच्छीमार संस्थांच्या माध्यमातून निर्यातदारांसाठी पापलेटचे घाऊक खरेदी दर निश्चित केले जातात व त्या अनुषंगाने नायगाव, वसई व इतर भागांतील पापलेटचे दर सातपाटीच्या दरांच्या अनुषंगाने निश्चित होत असतात. मुंबई येथून मासाची निर्यात कमी प्रमाणात होत असल्याने गेल्या काही वर्षांपासून सातपाटीच्या मच्छीमार संस्था गुजरात राज्यातील वेरावळ- पोरबंदर भागातील निर्यातदारांमार्फत पापलेटची निर्यात करतात. गुजरातमधून होणाऱ्या ३७०० कोटी रुपयांच्या मासेनिर्यातीपैकी २५०० कोटी रुपयांचे मासे चीनमध्ये निर्यात केले जातात. करोनामुळे चीनमध्ये निर्यात होणाऱ्या माशांचे प्रमाण घटले आहे. तसेच बांगलादेशमधून येणाऱ्या मालावर चीनने आयात शुल्क आकारणी बंद केल्याने भारताच्या निर्यातीवर त्याचा परिणाम झाला आहे. त्यामुळे निर्यातदारांनी पापलेट माशांची उचल करण्यासाठी उत्सुकता दाखवली नाही. एकीकडे मासेमारीला प्रारंभ झाला असून पापलेट व इतर माशांची आवक सुरू आहे. मासेमारी हंगाम सुरू होण्यापूर्वी पापलेटचे दर निश्चित केले जातात. मात्र निर्यातदारांनी दर निश्चित केले नाही. निर्यातदारांचे प्रतिनिधी १ सप्टेंबरच्या सुमारास पापलेटचे दर निश्चित करण्याबाबत सांगत असून नवीन दर निश्चित होईपर्यंत जुन्या दराच्या अनुषंगाने उचल करावी अशा प्रयत्नात मच्छीमार संस्था आहेत.

हमीभावासाठी सरकारने हस्तक्षेप करावा

एकीकडे कृषिमालासाठी हमीभाव देण्यासाठी सरकार तत्पर असताना मत्स्यसंपदेबाबत शासन उदासीन असल्याकडे मच्छीमारांच्या राष्ट्रीय संघटनेचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी लक्ष वेधले. मत्स्य व्यवसाय विभागाने मच्छीमारांच्या होणाऱ्या नुकसानीकडे शासनाला अवगत करावे तसेच माशांचे दर निश्चित करण्यासाठी व त्यांना हमीभाव मिळण्यासाठी सरकारने हस्तक्षेप करायला लावणे आवश्यक आहे, असे त्यांचे म्हणणे आहे. माशांच्या निर्यातीसाठी राज्य व केंद्र शासनाने निर्यातदारांच्या समस्या सोडवल्या तर मच्छीमारांना चांगले दर मिळू शकतील, असे त्यांचे म्हणणे आहे. पापलेट दराची निश्चिती वजनावर असून ५०० ग्रामपेक्षा अधिक वजनाच्या पापलेटला ‘सुपर’ असे संबोधले जाते. ४०० ते ५०० ग्रॅमच्या पापलेटला ‘एक नंबर’, तीनशे ते चारशे ग्राम वजनाच्या माशाला ‘दोन नंबर’, २०० ते ३०० ग्रॅम वजनाच्या माशाला ‘तीन नंबर’, तर शंभर ते दोनशे ग्रॅम वजनाच्या पापलेटला ‘चार नंबर’ असे संबोधले जात असून त्याच्या किलोनिहाय दर निश्चित केले जातात.