पहिल्याच फेरीत निम्म्यापेक्षा कमी मिळकत; कव पद्धतीचा मच्छीमारांना फटका

नीरज राऊत, पालघर

पालघर जिल्ह्यातील सातपाटी परिसर पापलेटसाठी प्रसिद्ध असला तरी, गेल्या काही वर्षांत येथील पापलेटची आवक कमी होत आहे. यंदा तर मासेमारी बंदी उठवण्यात आल्यानंतरच्या पहिल्या फेरीत मच्छीमारांना दरवर्षीच्या तुलनेत निम्म्याहून कमी, २००-३०० किलो पापलेटच हाती लागले आहेत. कव पद्धतीने मासेमारी करण्याची पद्धत, पापलेटची घटती संख्या या गोष्टींमुळे ही परिस्थिती ओढवल्याचे मच्छीमारांचे म्हणणे आहे.

राज्य सरकारने १ ऑगस्टपासून मासेमारीवरील बंदी उठवली होती, तरीदेखील खराब हवामानामुळे प्रत्यक्षात १२ व १३ ऑगस्टनंतर मासेमारी बोटी समुद्रात गेल्या होत्या. मासेमारीच्या पहिल्या फेरीमध्ये सातपाटी-मुरबा भागातील मच्छीमार गिलनेट पद्धतीच्या जाळ्याद्वारे पापलेटची मासेमारी करत असून सातपाटी येथील अधिकतर बोटींना पहिल्या फेरीत जेमतेम २०० ते ३०० किलो पापलेट हाती लागले आहे. यापूर्वीच्या मासेमारी हंगामात पहिल्या काही फेऱ्यांमध्ये किमान एक टन पापलेटची मासेमारी करत असत. यंदा अतिशय कमी पापलेट जाळय़ात सापडल्याने मच्छीमारांची निराशा झाली आहे.

एकीकडे मच्छीमार १५ मे ते १५ ऑगस्ट अशा ९० दिवसांकरिता माशांच्या प्रजननकाळातील मासेमारी बंदीची मागणी करत असताना ६० दिवसांच्या शासकीय बंदीचेच पालन केले जाते. त्यामुळे पापलेटच्या प्रजननास पुरेसा वेळ मिळत नसल्याचे मच्छीमारांचे म्हणणे आहे. त्याचप्रमाणे कव पद्धतीने मासेमारी करणाऱ्यांनी पापलेटचे क्षेत्र व्यापून टाकल्याने पापलेट मासेमारीसाठी मच्छीमारांना समुद्रात अधिक खोलवर जावे लागत आहे. त्यामुळे पापलेटच्या मिळकतीवर परिणाम होत असल्याचे ‘दी सातपाटी सवरेदय फिशरमेन’ सहकारी मच्छीमार संस्थेचे अध्यक्ष पंकज पाटील यांनी सांगितले.

मिळकतीपेक्षा खर्च जास्त

प्रत्येक मासेमारी बोटीवर १० ते १५ खलाशी कार्यरत असून या कामगारांना ७०० ते ८०० रुपये प्रतिदिन इतके वेतन तसेच खलाशांच्या जेवणासाठी लागणारी सामग्री, माशाच्या साठवणुकीसाठी लागणारा बर्फ तसेच बोटीसाठी डिझेल असे सुमारे एक ते दीड लाख रुपये खर्च मासेमारीच्या प्रत्येक फेरीसाठी होत असतो. मात्र यंदा पापलेटची मिळकत मर्यादित असल्याने मच्छीमारांना होणारा खर्च भरून निघणार नाही, अशी भीती व्यक्त होऊ  लागली आहे.

पापलेटच्या दरात घट

बहुतांश भागात पापलेटचे दर हे सातपाटी सर्वोदय फिशरमेन्स सहकारी सोसायटी या संस्थेने टेंडर पद्धतीने निश्चित केलेल्या पापलेटच्या दरांवर अवलंबून असतात. या संस्थेने यंदाच्या वर्षी निर्यातदारांना भरलेल्या निविदेत सर्व प्रकारच्या पापलेटच्या दरामध्ये ३० ते ४० रुपये घट झाली असल्याचे दिसून आले आहे. तीन ते चार वर्षांपासून पापलेटच्या दरांमध्ये प्रति किलो शंभर ते सव्वाशे रुपये इतकी घसरण झाल्याने मच्छीमारांचे नुकसान होत आहे.पापलेट हा मासा वजनाप्रमाणे वर्गवारी करून विकला जात असला तरी मच्छीमारांना दोनशे ते चारशे किलो वजनाचे मासे उपलब्ध होत असतात. पूर्वी या क्रमांक दोन व क्रमांक तीन दर्जाच्या माशाला सरासरी ६०० ते ७०० रुपये प्रति किलो इतके दर मिळत असताना यंदा सरासरी दर साडेपाचशे रुपये प्रतिकिलो इतके झाले आहेत. त्यामुळे मच्छीमारांना टनामागे ४० ते ४५ हजार रुपयांचा तोटा होत असल्याचे सांगण्यात येत आहे.