पूजा चव्हाण प्रकरणात अखेर वनमंत्री संजय राठोड यांना राजीनामा द्यावा लागला आहे. संजय राठोड यांच्या राजीनाम्यानंतर खासदार आणि भाजपा नेते नारायण राणे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सहजतेने संजय राठोड यांचा राजीनामा घेतलेला नाही. विरोधी पक्षात असलेल्या भाजपाच्या दबावामुळे राजीनामा घ्यावा लागला आहे. भाजपाच्या महिला आघाडीने हा मुद्दा उचलून धरला” असे नारायण राणे म्हणाले.

“आरोप झाल्यानंतर तब्बल १८ दिवसांनी मुख्यमंत्र्यांनी संजय राठोड यांच्याकडून राजीनामा घेतला. या प्रकरणात एफआयआर दाखल करुन, संजय राठोड यांना अटक झाली पाहिजे” अशी मागणी नारायण राणे यांनी केली. “शिवसेना बलात्कार करणाऱ्यांना, खून करणाऱ्यांना पाठिशी घालतेय” असा आरोप त्यांनी केला.

“राज्यात कायदा-सुव्यवस्था राहिलेली नाही. इथे कुंपणच शेत खातय” असा आरोप त्यांनी केला. “विरोधी पक्षाच्या दबावामुळे राजीनामा घ्यावा लागला. संजय राठोड दोषी असून चौकशी झाली पाहिजे. विधानसभेत पूजा चव्हाणचा मुद्दा उचलून धरणार. कारवाई होईपर्यंत शांत बसणार नाही” असा इशारा नारायण राणे यांनी दिला.