News Flash

‘संजय राठोड यांच्या राजीनाम्याची कोणतीही मागणी आम्ही केली नाही’, पूजा चव्हाणच्या आईवडिलांचं मुख्यमंत्र्यांना पत्र

"कुठल्याही माता-पित्यासाठी आपल्या पोटच्या गोळ्याचा मृत्यू हा अत्यंत वेदनादायी असतो, पण मुलीच्या अकाली मृत्यूच्या दु:खापेक्षा अधिक त्रासदायक आणि आक्षेपार्ह..."

(संग्रहित छायाचित्र )

वनमंत्री संजय राठोड यांनी पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणात अखेर वाढत्या दबावामुळे काल(दि.२८) राजीनामा दिला. पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी संजय राठोड (Sanjay Rathod) यांचा राजीनामा घ्यावा यासाठी मुख्यमंत्र्यांवर मोठा दबाव होता. अखेर काल वर्षा या निवासस्थानी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन राठोड यांनी आपला राजीनामा दिला. त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी संध्याकाळी पत्रकार परिषद घेतली. शिवसेना नेते संजय राठोड यांचा राजीनामा ते पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी अशा अनेक विषयांवर ते यावेळी बोलले. या पत्रकार परिषेदपूर्वी पूजाचे आई-वडिल आणि बहिण उद्धव ठाकरेंना भेटले. या  भेटीत त्यांनी उद्धव ठाकरेंना एक पत्र दिलं.  पत्रकार परिषदेत परिवहन मंत्री अनिल परब यांनी पूजाच्या आई-वडिलांनी लिहिलेलं ते पत्र वाचून दाखवलं.

पूजा चव्हाणच्या आई-वडिलांनी दिलेल्या पत्रात नेमकं काय म्हटलंय?

सन्माननीय मुख्यमंत्री महोदय,

आमची मुलगी कु. पूजा चव्हाण हिचा दिनांक 7 फेब्रुवारी रोजी दुर्देवी मृत्यू झाला आहे. कुठल्याही माता-पित्यासाठी आपल्या पोटच्या गोळ्याचा मृत्यू हा अत्यंत वेदनादायी असतो, आमची ही वेदना आता कधीही भरुन येणार नाही. मुलीच्या अकाली मृत्यूच्या दु:खापेक्षा अधिक त्रासदायक आणि आक्षेपार्ह म्हणजे माझ्या मुलीचा मृत्यू संदर्भात जी चर्चा होत आहे. तिच्यावर खूप गलिच्छ आरोप लावून संजय राठोड यांचे नाव घेऊन उलटसुलट बातम्या येत आहेत. जे निराधार आहेत.आपण यासंबंधी पोलीस चौकशीचे आदेश दिले आहेत. आपल्यावर आमचा पूर्ण विश्वास आहे. या घटनेचा तपास वेगाने व्हावा. जे दोषी असतील, त्यांच्यावर आपण निश्चितच कारवाई कराल याची खात्री आहे.

आमच्या मुलीचा बळी गेला, पण फक्त संशयावरुन कोणाचाही बळी जाऊ नये. संजय राठोड यांच्या राजीनाम्याची कोणतीही मागणी आम्ही केली नाही. आमची मुलगी गमावली परंतू या आड राजकारण करुन दररोज होणाऱ्या आरोपाने तिचा रोज बळी जातोय. याचे राजकारण करुन संजय राठोड यांना आरोपी ठरवून राजीनामा घेऊ नये. तपासामध्ये राठोड किंवा अन्य कोणीही दोषी असल्यास कठोर कारवाई करुन न्याय द्यावा. परंतू संशयावरुन मुलीवर किंवा कोणावरही आरोप करु नये. संजय राठोड हे समाजाचे नेते आहेत. ते खूप कष्ट करुन येथपर्यंत पोहोचले आहे. फक्त संशयावरुन त्याचा बळी घेऊ नये. तपास पूर्ण झाल्यावर दोषींवर कारवाई करावी. राजकारणामुळे आणि दबावाने घाईत निर्णय घेऊ नये. आपल्यावर आमचा पूर्ण विश्वास आहे. आपण आम्हाला न्याय द्यालं.

आपले नम्र,

लहू चंदू चव्हाण (पूजाचे वडील)
मंदोधरी लहू चव्हाण (पूजाची आई)
दिव्याणी लहू चव्हाण (पूजाची बहीण)

पूजा चव्हाण प्रकरणात होणारी आमची व आमच्या समाजाची बदनामी थांबवावी, अशी मागणी पूजाच्या आईवडिलांनी मुख्यमंत्र्यांकडे पत्राद्वारे केली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 1, 2021 9:22 am

Web Title: pooja chavan family wrote letter to cm uddhav thackeray sas 89
Next Stories
1 “१२ सदस्यांची यादी राजभवनात कुणाच्या खुर्चीत दडवून ठेवली आहे?”
2 Coronavirus : राज्यात मागील २४ तासांत ८ हजार २९३ नवे करोनाबाधित, ६२ मृत्यू
3 “जे धाडस उद्धव ठाकरे यांनी दाखवलं, तेच शरद पवारांनी धनंजय मुंडेंच्या मुद्द्यावर दाखवलं पाहिजे”
Just Now!
X