पूजा चव्हाण प्रकरणामध्ये नाव समोर आल्यानंतर राज्याचे वनमंत्री आणि शिवसेनेचे नेते संजय राठोड यांनी मौन धारण करत सार्वजनिक जीवनापासून अलिप्त झाले होते. १५ दिवसांनंतर राठोड अखेर आज जनतेच्या नजरेसमोर आले. संजय राठोड यांनी जोरदार शक्ती प्रदर्शन करत पोहरादेवीचं दर्शन घेतलं. त्यानंतर माध्यमांशी बोलताना राठोड यांनी पूजा चव्हाण प्रकरणावर मौन सोडलं आहे.

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणानंतर वन मंत्री संजय राठोड पहिल्यांदाच सार्वजनिक कार्यक्रमात सहभागी झाले. आज त्यांनी पोहरादेवी येथे सहकुटुंब जगदंबा मातेचं दर्शन घेतलं. त्यानंतर सेवालाल महाराजांचंही दर्शन घेतलं. त्यानंतर राठोड यांनी पोहरादेवीचं दर्शन घेतलं. त्यानंतर राठोड यांनी पत्रकार परिषद घेत माध्यमांशी संवाद साधला.

आणखी वाचा- “माझं राजकीय आयुष्य उद्ध्वस्त करण्याचा प्रकार”; पूजा चव्हाण प्रकरणी संजय राठोड यांनी अखेर मौन सोडलं

संजय राठोड म्हणाले, “पूजा चव्हाण या बंजारा समाजातील तरुणीच्या मृत्यूबद्दल आम्हाला दुःख. तिच्या कुटुंबियांच्या दुःखात मी आणि समाज सहभागी आहे. मी ओबीसी समुदायाचं नेतृत्व करणारा कार्यकर्ता आहे. माझं राजकीय जीवन उद्धध्वस्त करण्याचा प्रयत्न झालेला आहे. माध्यमांनी जे दाखवलं, त्यात कोणतंही तथ्य नाही. मुख्यमंत्र्यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. पोलीस तपास करत आहेत. पण, माझी आणि समाजाबद्दल घाणेरड राजकारण करण्याचा प्रयत्न केला गेला. चौकशीतून जे समोर येईल. ते बघा…,” असं म्हणत संजय राठोड यांनी आपली भूमिका स्पष्ट केलं.

आणखी वाचा- चौकशीतून जे समोर येईल, ते बघा…; संजय राठोडांनी पूजा चव्हाण प्रकरणावर सोडलं मौन

राजीनाम्याच्या चर्चेला पूर्णविराम…

पूजा चव्हाण या तरुणीच्या प्रकरणावरून भाजपाकडून राठोड यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात होती. आज झालेल्या पत्रकार परिषदेत राठोड यांनी राजीनामा देणार नसल्याचंच अप्रत्यक्षपणे स्पष्ट केलं. “गेल्या दहा दिवसांमध्ये बदनामी करण्याचा प्रयत्न करण्यात आला. मी चार वेळा निवडून आलो आहे. अनेक लोक माझ्यासोबत फोटो काढतात. ३० वर्षांपासून काम करतोय. दहा दिवसांपासून अलिप्त होतो. या काळात मी माझे आईवडिल, माझी पत्नी आणि मुलांना सांभाळण्याचं काम करत होतो. तसेच शासकीय काम सुद्धा मुंबईतील फ्लॅटवरून सुरू होतं. माझं काम थांबलेलं नव्हतं. आज इथं दर्शन घेऊन पुन्हा एकदा कामाला सुरूवात करणार आहे,” असं सांगत राठोड यांनी अप्रत्यक्षपणे राजीनामा देणार नसल्याचंच स्पष्ट केलं.