News Flash

संजय राठोड राजीनामा देणार?; शिवसेना नेते संजय राऊतांचं सूचक ट्विट

राजीनामा देण्याच्या चर्चेनं पुन्हा धरला जोर

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणामुळे चर्चेत असलेले राज्याचे वनमंत्री संजय राठोड यांना मुख्यमंत्र्यांनी राजीनामा देण्याचे आदेश दिल्याची चर्चेनं राजकीय वर्तुळात जोर धरला आहे. विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात पूजा चव्हाण प्रकरणाचे तीव्र पडसाद उमटण्याची चिन्हं असल्यानं मुख्यमंत्र्यांनी आदेश दिल्याचं बोललं जात असून, शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी एक सूचक ट्विट केलं आहे.

पूजा चव्हाण या तरुणीनं पुण्यात आत्महत्या केली होती. तिच्या आत्महत्येनंतर व्हायरल झालेल्या ऑडिओ क्लिपमुळे हे प्रकरण चर्चेत आलं होतं. त्यानंतर भाजपाच्या प्रदेश उपाध्यक्ष चित्रा वाघ यांनी थेट राज्याचे वनमंत्री संजय राठोड यांचं नाव घेत कारवाई करण्याची मागणी केली होती. भाजपानं मागणी लावून धरली असून, विधिमंडळाचं कामकाज चालवू देणार नाही, असा इशाराही दिला आहे.

दरम्यान, अधिवेशानाच्या पूर्वीचं निर्णय घेण्याचे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संजय राठोड यांना दिल्याचं वृत्त आहे. मागील दोन दिवसांपासून संजय राठोड यांना राजीनामा देण्यास सांगण्यात आल्याच्या चर्चा सुरू असून, शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी सूचक ट्विट करत संजय राठोड राजीनामा देणार असल्याच्या मुद्द्याककडे अप्रत्यक्षपणे अंगुली निर्देश केले आहेत. संजय राऊत यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचं छायाचित्र असलेला फोटो ट्विट केलेला आहे. त्यावर “सिंहासनाधिष्ठीत छत्रपती शिवरायांच्या हातातील हा राजदंड काय सांगतो?, महाराष्ट्र धर्म म्हणजेच राजधर्माचे पालन!”, असा मजकूर असलेलं ट्विट केलं आहे.

मुख्यमंत्री मिस्टर सत्यवादी…

औरंगाबाद दौऱ्यावर असताना संजय राऊतांनी याबद्दल भूमिका मांडली होती. “मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे न्यायप्रिय नेते आहेत. ते मिस्टर सत्यवादी आहेत. त्यामुळे पूजा चव्हाण प्रकरणात ते संपूर्ण सत्य जाणून घेऊन योग्य तो निर्णय घेतील. ते कुणावरही अन्याय करणार नाहीत आणि कुणाला पाठीशीही घालणार नाहीत. उद्धव ठाकरे आणि संजय राठोड यांच्यात बोलणं झालेलं असलं तरी त्याविषयी मी बोलणं संकेताला धरून नाही,” असं राऊत म्हणाले होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 28, 2021 11:21 am

Web Title: pooja chavan suicide case sanjay raut tweet over sanjay rathod resignation bmh 90
Next Stories
1 “सुशांतच्या हत्येची ‘पटकथा’ तयार करणाऱ्यांना डेलकरांच्या आत्महत्येत काहीच काळंबेरं दिसू नये?”
2 ‘भाजपच्या कृतीला सांगलीतून प्रत्युत्तर’
3 Coronavirus : हिंगोलीत सोमवारपासून सात दिवसांची पूर्णवेळ संचारबंदी
Just Now!
X