हर्षद कशाळकर, अलिबाग

रस्त्यावरून जाताना एखादा अपघात झाला असेल तर कोणी मदतीसाठी सहसा पुढे येत नाही. नसता व्याप नको म्हणून तिथून काढता पाय घेतात. तर काही जण मदत करायची सोडून अपघातग्रस्तांचे फोटो समाजमाध्यमांवर टाकण्यात धन्यता मानतात, पण खालापूर तालुक्यातील पूजा साठेलकर याला अपवाद ठरते, मुंबई पुणे महामार्ग आणि मुंबई पुणे दृतगती मार्गावरील अपघातग्रस्तांसाठी ती देवदूत ठरते आहे. अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी दिवसरात्र धावून जाते आहे.

सिव्हिल इंजिनीअरिंगचे शिक्षण पूर्ण केलेल्या पुजाने काही काळ खासगी कंपनीत काम केले पण तिथे तिचे मन कधी रमले नाही. त्यामुळे नोकरी सोडून वडिलांप्रमाणे समाजसेवेचे व्रत हाती घेण्याचा निर्णय तिने घेतला. चांगल्या पगाराची नोकरी सोडून अपघातग्रस्तांच्या सेवेसाठी स्वत:ला झोकून दिले. आज महामार्गावरील अनेक अपघातग्रस्तांसाठी पूजा खऱ्या अर्थाने देवदूत ठरली आहे.

पूजा हिला आपल्या वडिलांकडून समाजसेवेचे बाळकडू लाभले आहे. खालापूर आणि खोपोली परिसरात होणारया अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी तिचे वडील गुरुनाथ साठेलकर आणि त्यांच्या मित्रांनी एक सामाजिक संस्था स्थापन केली. महामार्गावर होणाऱ्या अपघातांसाठी एक वॉट्स अप गृप तयार केला. यात महामार्गावर कार्यरत अधिकारी, कर्मचारी, पोलीस, पत्रकार यांच्या समावेश होता. महामार्गावर होणाऱ्या अपघातांची तातडीने माहिती मिळावी, आणि तात्काळ मदत उपलब्ध करून देता यावी हा यामागचा उद्देश होता. वडिलांच्या या सामाजिक कामात पूजानेही सहभाग घेण्यास सुरुवात केली. अपघातात जखमी झालेल्या रुग्णांना अपघातग्रस्त वाहनातून बाहेर काढणे, त्यांना तातडीने रुग्णवाहिकेतून जवळच्या रुग्णालयात नेणे तिने सुरू केले. सुरुवातीला रक्तबंबाळ झालेल्या रुग्णांना मदत करणे कठीण जात होते, पण हळूहळू या सगळ्याची सवय होत गेली. मनातील भीती आणि संकोच नाहीसा होत गेला. आज तीन रुग्णवाहिकांच्या मदतीने पूजा आणि तिचे सहकारी अपघातग्रस्तांच्या मदतीचे काम करतात. दिवस असो वा रात्र मदतीला धावून जातात. या मदतीमुळे आजवर अनेकांचे जीव त्यांनी वाचविले आहेत.

गेल्या वर्षी महड येथे अन्नातून विषबाधेचे एक प्रकरण समोर आले होते. ज्यात दुर्दैवाने पाच लहान मुलांचा मृत्यू झाला होता. अन्य ८० जणांनाही विषबाधा झाली होती. रात्रभर धावपळ करून पूजा आणि तीच्या सहकाऱ्यांनी गावातील लोकांना रुग्णालयात हलवले. यामुळे त्या सर्वाचे जीव वाचले. वडील आणि पूजाच्या या समाजिक कामात आता तिच्या लहान बहिणीनेही हातभार लावण्यास सुरुवात केली आहे. खोपोली परिसरातील तरुण पिढीसाठी पूजा आज खऱ्या अर्थाने रोल मॉडेल ठरत आहे. तिच्या या कार्याची प्रेरणा घेऊन अनेक जण या सेवाभावी कामात सहभागी होत आहेत.

देशात दर वर्षी जवळपास पाच लाख रस्ते अपघात होतात. यात दीड ते पावणे दोन लाख लोक दगावतात. वेळेवर उपचार न मिळाल्याने अपघातात मृतांची संख्या वाढते. त्यामुळे अपघातग्रस्तांना तातडीने उपचार मिळणे आवश्यक असते. पण अपघातग्रस्तांना मदत करण्यासाठी सहसा कोणी पुढे येत नाही. त्यामुळे अपघातग्रस्तांचे जीव धोक्यात येतात.

त्यामुळे अपघातग्रस्तांना मदत करणे ही सामाजिक जबाबदारी असल्याचेही पूजा आवर्जून सागंते.

‘दुसऱ्यांना मदत करण्यात कमालीचे समाधान मिळते. एखाद्याचा जीव आपल्या मदतीमुळे वाचला ही भावना सुखावणारी असते. त्यामुळे लोकांनी अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी पुढे आले पाहिजे. पोलीस चौकशी करतील का, ते जबाब लिहून घेतील का याचा विचार करण्याची गरज नसते.’

– पूजा साठेलकर