हर्षद कशाळकर

मुंबई-गोवा महामार्गाची सध्या दुरवस्था झाली आहे. महामार्गावर ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत, हे खड्डे भरण्यासाठी खडी आणि मातीच्या भराव केला जात आहे. त्यामुळे महामार्गावर धूळ आहे. परिणामी प्रवासी आणि वाहन चालकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे.

पावसाळा सुरू झाल्यावर मुंबई-गोवा महामार्गावर खड्डे पडतात. डिसेंबपर्यंत ही स्थिती असते. गणेशोत्सवाच्या सुरुवातीला महामार्गाच्या दुरवस्थेचा विषय चर्चेत येतो. पाहणी दौरे आणि आढावा बैठका होतात. दुरुस्ती केली जाते. मात्र पुन्हा पाऊस झाल्यावर जैसे थे परिस्थिती निर्माण होते. खड्डय़ातून आदळत आपटत, धुळीतून वाट काढत कोकणवासीयांचा प्रवास सुरूच राहतो. गेली नऊ वर्षे थोडय़ाफार फरकाने हीच परिस्थिती कायम आहे.

पळस्पे ते इंदापूर महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम २०११ मध्ये सुरू झाले. हे काम २०१४ मध्ये पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र २०२० चा उत्तरार्ध सुरू झाला तरी हे काम पूर्ण होण्याची चिन्हे दिसत नाही. इंदापूर ते कशेडी दरम्यानच्या दुसऱ्या टप्प्यातील कामाची परिस्थिती फारशी चांगली नाही. ७० किलोमीटरच्या या कामातील जेमतेम १९ किलोमीटरचे कामच मार्गी लागू शकले आहे.

महामार्गाची आजची परिस्थिती दयनीय आहे. पळस्पे ते इंदापूर दरम्यान महामार्गावर मोठय़ा प्रमाणात खड्डे आहेत. त्यामुळे वाहनचालकांना तारेवरची कसरत करावी लागते. खड्डे दुरुस्तीसाठी खडी आणि मातीचा वापर केला जात आहे. या खडय़ामुळे अपघातांचे प्रमाणही मोठय़ा प्रमाणात वाढले आहे. महामार्गाची तातडीने दुरुस्ती करा आणि रखडलेली कामे मार्गी लावा अशी मागणी केली जात आहे.

पळस्पे ते इंदापूर पहिला टप्पा

पहिल्या टप्प्यातील रुंदीकरणाचे काम यापूर्वीच सुरू झाले आहे. ८४ किलोमीटरच्या या मार्गासाठी एकूण २१७ हेक्टर क्षेत्र संपादित केले जाणार आहे. पहिल्या टप्प्यातील भूसंपादनासाठी ४७६ कोटी रुपये प्राप्त झाले होते. २०११ साली या कामाला सुरुवात झाली. पळस्पे ते वडखळपर्यंतचे काम जवळपास पूर्ण झाले आहे. मात्र वडखळ ते इंदापूर दरम्यानच्या कामाला अद्याप अपेक्षित गती मिळू शकलेली नाही.

दुसरा टप्पा : दुसऱ्या टप्प्यात इंदापूर ते कशेडी या ७१ किलोमीटर मार्गाचे रुंदीकरण केले जाणार आहे. यासाठी ४७ गावांतील २३० हेक्टर जमीन संपादित केली जाणार आहे. जमीन संपादनाचे काम जवळपास पूर्ण झाले आहे. मात्र ७१ किलोमीटरपैकी फक्त १९ किलोमीटर रस्त्याचे काम पूर्ण होऊ शकले आहे. उर्वरित काम अतिशय धिम्या गतीने सुरू आहे.

मुंबई-गोवा महामार्गाचे पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील चौपदरीकरणाचे काम संथ गतीने सुरू आहे. महामार्गाची परिस्थिती अतिशय बिकट आहे. केंद्रीय भूपृष्ठवाहतूकमंत्री नितीन गडकरी यांच्याशी मी नुकताच पत्रव्यवहार केला आहे. महामार्ग प्राधिकरणाला रस्ता दुरुस्तीच्या कामाला तातडीने सुरू करण्याच्या सूचना द्याव्यात अशी विनंती केली आहे.

– सुनील तटकरे, खासदार

रोज मरे त्याला कोण रडे अशी गत कोकणवासीयांची झाली आहे. विलंबामुळे रस्त्याच्या कामाचा खर्च जवळपास दुपटीवर गेला आहे. दहा वर्षे होत आली तरी रस्त्याचे काम पूर्ण झालेले नाही. लोकांचे हाल होत आहेत. झालेली कामेही निकृष्ट दर्जाची आहेत. त्यामुळे वाहनचालक आणि प्रवाशांना त्रास सहन करावा लागतो आहे. हे देशातील सर्वाधिक काळ रखडलेले राष्ट्रीय महामार्गाचे काम असावे.

– संतोष ठाकूर, सामाजिक कार्यकर्ते.