News Flash

‘गावाकडे चला’ मोहिमेला सकारात्मक प्रतिसाद

रायगड जिल्ह्यातील १७२ जणांचे यशस्वी पुनर्वसन

संजीव धसाडे

रायगड जिल्ह्यातील १७२ जणांचे यशस्वी पुनर्वसन

हर्षद कशाळकर, अलिबाग

रायगड जिल्ह्यातून मुंबईला स्थलांतरित होणाऱ्या कुटुंबांना गावाकडे परत आणण्यासाठी जिल्हा प्रशासन आणि स्वदेश फाऊंडेशनच्या वतीने एक मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेअंतर्गत १७२ जणांचे गावातच यशस्वी पुनर्वसन करण्यात आले. त्यामुळे या घरवापसी मोहिमेला सकारात्मक प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून येत आहे.

कोकणातील बहुतांश तरुण नोकरीनिमित्त मुंबई, ठाणे, सुरत, पुणे यासारख्या महानगरामंध्ये स्थलांतरित होतात. मिळेल ते काम करून आपला चरितार्थ चालवतात. रोजगाराच्या शोधात होणाऱ्या स्थलांतरामुळे गावेच्या गावे ओस पडतात. या स्थलांतराला प्रामुख्याने दोन गोष्टी कारणीभूत असतात. एक म्हणजे शेतीतून मिळणारे अत्यल्प उत्पन्न, दुसरे म्हणजे गावात पर्यायी रोजगाराच्या संधीची वानवा. यामुळे शहरांकडे स्थलांतराचे प्रमाण वाढते.

ही परिस्थिती बदलण्यासाठी जिल्हा प्रशासन आणि स्वदेश फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने एक या स्थलांतरितांच्या ‘घरवापसी’साठी मोहीम राबविण्यात आली. त्याचे सकारात्मक परिणाम दिसून येत आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत १७२ जणांचे त्यांच्याच गावात यशस्वी पुनर्वसन करण्यात आले. यात पोलादपूर तालुक्यातील ४५, तळा तालुक्यातील २८, म्हसळा तालुक्यातील १७,  श्रीवर्धन तालुक्यातील १५, माणगाव तालुक्यातील ४० आणि महाड तालुक्यातील २७ जणांचा समावेश आहे. या मोहिमेअंतर्गत जवळपास ४०० जणांनी आतापर्यंत ‘घरवापसी’साठी नोंदणी केली आहे. म्हणजेच अजूनही पावणेतीनशे जण घरवापसीच्या प्रतीक्षेत आहेत.

या उपक्रमांतर्गत सरकारच्या विविध योजनांचा लाभ मिळवून देणे, त्यांना स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे, त्यासाठी आवश्यक आर्थिक साहाय्य आणि प्रशिक्षण देणे, त्यांचा आर्थिक आणि सामाजिक स्तर उंचावण्याचा प्रयत्न करणे या पातळ्यांवर काम केले जाते. ग्रामीण विकासाला चालना देणे हादेखील या उपक्रमाचा हेतू आहे. त्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात ‘रिव्हर्स मायग्रेशन सेल’ची स्थापना करण्यात आली आहे. त्यावर थेट जिल्हाधिकारी लक्ष ठेवून असतात. देशात अशा प्रकारचा विभाग कार्यान्वयित करणारा रायगड हा पहिला जिल्हा ठरला आहे.

स्वदेश चित्रपटातून प्रेरणा घेऊन हा प्रकल्प सुरू करण्यात आला. सुरुवातीला सामाजिक संस्थेपुरताच हा प्रकल्प मर्यादित होता. नंतर मात्र जिल्हा प्रशासनाने त्यात सहभागी होण्याचा निर्णय घेतला.

उपक्रमात होते काय?

घरवापसी करू इच्छिणाऱ्यांचे सुरुवातीला मुंबईत प्रबोधन केले जाते. नंतर ते जो व्यवसाय करू इच्छितात त्याचे प्रशिक्षण दिले जाते. तिसऱ्या टप्प्यात प्रत्यक्ष व्यवसाय सुरू करण्यासाठी अर्थसाहाय्य उपलब्ध करून दिले जाते किंवा त्यासाठी आवश्यक असणाऱ्या सुविधा उपलब्ध करून दिल्या जातात. यामुळे त्यांना आर्थिक स्थैर्य प्राप्त होते आणि उत्पन्नाचे साधनही मिळते. आजवर गावाकडे स्थलांतरित झालेल्या व्यक्तींनी हॉटेल, काजू प्रक्रिया उद्योग, पोल्ट्री, डेअरी व्यवसाय, शेळी पालन, दुचाकी रिपेअिरग आणि ठिबक सिंचन पद्धतीच्या माध्यमातून शेती व्यवसाय सुरू केले आहेत. घरवापसी करणाऱ्यांपैकी दोन जण गावाकडे येऊन सरपंच  झाले आहेत.

पाचाड गावचे मूळ रहिवासी असलेले संजय येलंगेकर पूर्वी मुंबईत छायाचित्रकार म्हणून व्यवसाय करत होते. घरवापसी उपक्रमांतर्गत त्यांनी गावाकडे परतण्याचा निर्णय घेतला. आज संजय यांनी गावातच स्वत:चा व्यवसाय सुरू केला आहे. यातून चांगले उत्पन्नही मिळत असल्याचे संजय सांगतात.

मुंबईतून गावाकडे येऊ  इच्छिणाऱ्या तरुणांना प्रोत्साहन देणे, त्यांचे पुनर्वसन करणे, त्यांना आर्थिकदृष्टय़ा सक्षम करणे हा या उपक्रमाचा मूळ उद्देश आहे. महत्त्वाची बाब म्हणजे त्याला आता सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे.

– डॉ. विजय सूर्यवंशी, जिल्हाधिकारी, रायगड

कोकणातून होणारे स्थलांतर रोखणे आणि ग्रामीण अर्थकारणाला चालना देणे या दोन पातळ्यांवर या उपक्रमात काम सुरू होते. त्यासाठी लागणारे प्रबोधन आणि प्रशिक्षण आम्ही देतोच. घरवापसी करणाऱ्या व्यक्तीला अर्थसाहाय्य करून देण्याची जबाबदारीही पार पाडली जाते, हे या उपक्रमाच्या यशाचे गमक आहे.

– मंगेश वानगे, प्रकल्प संचालक, स्वदेश फाऊंडेशन 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 5, 2019 12:11 am

Web Title: positive response to back to village campaign in raigad district zws 70
Next Stories
1 गावोगावी बियाणेमाफिया सक्रिय
2 ‘हे वागणं बरं नव्हं’, नारायण राणेंनी पिळले नितेशचे कान
3 वंचित आघाडीत बिघाडी; लक्ष्मण मानेंनी मागितला प्रकाश आंबेडकरांचा राजीनामा
Just Now!
X