कोकण, मध्य महाराष्ट्रासह मराठवाडा, विदर्भातही पाऊस

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पुणे : कोकण वगळता राज्यात जवळपास सर्वच ठिकाणी गेल्या पाच ते सहा दिवसांपासून पावसाने काहीशी विश्रांती घेतली आहे. मात्र, गुरुवारपासून (१८ जुलै) राज्यात पाऊस पुन्हा जोर धरणार असल्याचा अंदाज हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आला आहे. मराठवाडा आणि विदर्भातही पावसाचा अंदाज आहे. दरम्यान, पावसाच्या विश्रांतीमुळे राज्यात सर्वच ठिकाणी कमाल तापमान सरासरीपार गेल्याने उकाडय़ात वाढ झाली आहे.

जुलैच्या पहिल्या आठवडय़ापासून दुसऱ्या आठवडय़ाच्या सुरुवातीला राज्यात सर्वदूर पावसाने हजेरी लावली होती. कोकण आणि मध्य महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी जोरदार पाऊस झाला. मराठवाडा आणि विदर्भात पावसाचे प्रमाण कमी असले, तरी या भागातही पावसाने हजेरी लावली होती. गेल्या पाच ते सहा दिवसांपासून कोकण वगळता राज्यात पावसाचा जोर कमी झाला आहे.

कोकण विभागात रत्नागिरी जिल्ह्यत बहुतांश ठिकाणी मुसळधार पाऊस हजेरी लावतो आहे. इतर विभागांमध्ये पावसाच्या दीर्घ विश्रांतीमुळे चिंता व्यक्त करण्यात येत आहे. मात्र, पुन्हा पाऊस जोर धरणार असल्याचे संकेत मिळाले आहेत.

सध्या दक्षिणेकडील भागांमध्ये पावसाने जोर धरला आहे. उत्तर आणि पूर्वेकडील राज्यांतही पावसाची हजेरी आहे. महाराष्ट्रातही तीन ते चार दिवस पावसाचे संकेत आहेत. हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार १८ आणि १९ जुलैला कोकणात तुरळक ठिकाणी जोरदार, तर मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. २० आणि २१ जुलैला राज्यात सर्वच ठिकाणी पाऊस पडण्याचा अंदाज आहे. या दोन दिवशी तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस होणार आहे.

उकाडय़ात वाढ

पावसाच्या विश्रांतीमुळे राज्याच्या बहुतांश भागात तापमानाचा पारा वाढला आहे. प्रामुख्याने विदर्भ आणि मराठवाडय़ात कमाल तापमानाचा पारा सरासरीच्या तुलनेत पुढे गेला आहे. विदर्भामध्ये बहुतांश ठिकाणी ३७ ते ३८ अंश सेल्सिअसच्या दरम्यान तापमानाचा पारा असून, तो सरासरीच्या तुलनेत ५ ते ७ अंशांनी अधिक आहे. मराठवाडय़ातही कमाल तापमान वाढून  ते ४ ते ६ अंश पुढे गेले आहे. मध्य महाराष्ट्रात सोलापूर आणि नगरचा पारा वाढला आहे. कोकण विभागातील तापमान सरासरीच्या जवळ आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Possibility of heavy rain in maharashtra from today zws
First published on: 18-07-2019 at 02:19 IST