लोहखनिजाचे प्रचंड साठे असलेल्या गडचिरोली जिल्हय़ात नक्षलवाद्यांनी लॉयड स्टीलच्या दोन अधिकाऱ्यांची गेल्या आठवडय़ात हत्या केल्याने या जिल्हय़ात खाण उद्योग सुरू होण्याची शक्यता आता पूर्णपणे मावळली आहे. देशभरातील उद्योगांनी या भागात खाणीची परवानगी मिळण्यासाठी सरकारदरबारी खर्च केलेले कोटय़वधी रुपयेसुद्धा आता पाण्यात गेले आहेत.
नक्षलवाद्यांचा सर्वाधिक प्रभाव असलेल्या देशातील २९ जिल्हय़ांमध्ये गडचिरोलीचा समावेश आहे. त्यामुळे या जिल्हय़ात सातत्याने हिंसाचाराच्या घटना घडत असतात. भरपूर जंगल व खनिज संपत्तीने नटलेल्या या जिल्हय़ात लोहखनिजाचे प्रचंड साठे आहेत. त्यामुळे देशभरातील लोखंड उत्पादकांचे या साठय़ाकडे गेल्या अनेक वर्षांपासून लक्ष आहे. देशातील लोखंड उत्पादकांना आता लोहखनिजासाठी प्रचंड धावपळ करावी लागत आहे. या पाश्र्वभूमीवर शेजारच्या गडचिरोलीत लोहखनिजाच्या खाणी सुरू करण्यासाठी उद्योगांची एक लॉबी गेल्या अनेक वर्षांपासून प्रयत्नशील होती. या जिल्हय़ातील लोहखनिज काढण्यासाठी सर्वात आधी परवानगी मिळवणाऱ्या लॉयड स्टीलच्या दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांना नक्षलवाद्यांनी गेल्या आठवडय़ात ठार केल्याने या लॉबीच्या प्रयत्नांना मोठा धक्का बसला आहे.
लॉयड स्टीलने २००७ साली केंद्राकडे ३७ कोटी रुपये जमा करून सूरजागड पहाडावरील खनिज बाहेर काढण्याची ही परवानगी मिळवली होती. गेली ६ वर्षे नक्षलवाद्यांच्या विरोधामुळे या उद्योगाला खाण सुरू करता आली नाही. आता दोघांची हत्या झाल्यामुळे या उद्योगाने खाण सुरू करण्यासंबंधीचे सर्व प्रयत्न थांबवण्याचा निर्णय घेतल्याची माहिती समोर आली आहे. या संदर्भात लॉयडच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता सध्याच्या स्थितीत कोणतेही वक्तव्य करणे योग्य नाही असे उत्तर मिळाले. लॉयड शिवाय याच जिल्हय़ात सनफ्लॅग, गोपानी, विरागंणा या उद्योगांनासुद्धा याच भागात खाण विकसित करण्यासाठी लोहखनिजाचे साठे केंद्र सरकारकडून मिळालेले आहेत. याशिवाय जिंदाल स्टीलची या संदर्भातील प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. यापैकी सनफ्लॅग कंपनीने राज्य शासनाच्या अखत्यारीत येणाऱ्या खनिकर्म महामंडळाशी करार करून या भागातील साठे मिळवले आहेत.
या करारानुसार महामंडळ व या उद्योगाने गडचिरोली मिनरल्स या नावाची एक कंपनीसुद्धा काही वर्षांपूर्वी स्थापन केली होती. अजूनही कागदावर असलेल्या या कंपनीलासुद्धा आता गाशा गुंडाळावा लागणार आहे. या भागातील जल, जंगल व खनिज संपत्तीवर आदिवासींचा हक्क आहे, असे कारण समोर करून नक्षलवाद्यांनी आरंभापासून खाण उद्योगाला विरोध केला आहे. या भागात साठे मिळवणाऱ्या उद्योगांनी नक्षलवाद्यांच्या मन वळते करण्यासाठी आजवर अनेक प्रयत्न करून बघितले. नक्षलवाद्यांशी संबंध ठेवून असलेल्या कंत्राटदारांना त्यासाठी पुढे करण्यात आले. या प्रयत्नांना नक्षलवाद्यांनी दाद दिलेली नाही.

नक्षलवाद्यांनी आता दोघांची हत्या करून चर्चेचे सर्व मार्ग बंद करून टाकल्याने आता साठे मिळवणाऱ्या या उद्योगांना गाशा गुंडाळण्याशिवाय अन्य कोणताही पर्याय राहिला नाही, असे मत खनिकर्म विभागातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने आज ‘लोकसत्ता’शी बोलताना व्यक्त केले. या घडामोडींमुळे साठय़ाची परवानगी मिळवण्यासाठी उद्योगांनी सरकारदरबारी केलेला कोटय़वधीचा खर्चसुद्धा आता वाया गेला आहे. जाणकारांच्या म्हणण्यानुसार अशा परवानगीसाठी उद्योगांना किमान ३ ते ४ कोटी रुपये खर्च करावे लागतात. सध्याच्या स्थितीमुळे या खर्चावर पाणी फेरले जाण्याची शक्यता अधिक आहे.