कराड : लोकसभेच्या गत निवडणुकीत विरोधकांच्या मतविभागणीचा भाजपला फायदा होऊन नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले, पण आता भाजप विरोधकांनी मतविभागणी टाळल्यास आगामी सार्वत्रिक निवडणुकांत निधर्मवादी आघाडीची सत्ता निश्चित येईल, असा दावा माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला. काँग्रेस विचाराचे सर्व जण एकत्र आल्यास केंद्र व राज्य सरकारला सळो की पळो करू असा इशारा त्यांनी दिला.

काँग्रेसचे युवानेते विश्वजित कदम यांची विधानसभेवर अविरोध निवड झाल्याबद्दल त्यांचा पृथ्वीराज चव्हाण, जयकुमार गोरे, आनंदराव पाटील व बाळासाहेब पाटील या चार आमदारांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच, विकासकामांच्या उद्घाटनप्रसंगी चव्हाण वडगाव हवेली (ता. कराड) येथे बोलत होते.

पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, आगामी निवडणुकात एकत्र येऊन लढण्याची जबाबदारी काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांची आहे. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपला देशातील केवळ ३१ टक्के लोकांनी स्वीकारले. उर्वरित ६९ टक्के मतांचे विभाजन झाल्याने नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले. आता, आगामी निवडणुका आघाडीच्या माध्यमातून लढण्याची जनतेतून पुकार असल्याचे चव्हाण यांनी सांगितले. काँग्रेस नेते पतंगराव कदम यांच्या अपेक्षांचे ओझे विश्वजितवर आहे. विश्वजित हेही मोठे नेतृत्व आहे. सामान्यांना सन्मानाची वागणूक देणारी पतंगरावांची शिकवण घेऊन विश्वजित काम करतील. त्यांना संघर्ष कमी नाही, याचीही मला जाणीव आहे. ते निश्चितच चांगले काम करतील, याची खात्री असल्याचा विश्वास पृथ्वीराज यांनी दिला.

आमदार जयकुमार गोरे म्हणाले, मोदी सरकारने गेल्या तीन वर्षांत काँग्रेसने राबवलेल्या योजनांचे बारसे घालून जुन्या योजनांची केवळ नावे बदलण्याचे काम केले. आघाडी सरकारच्या काळातील गॅस सिलिंडरचा दर भाजप सरकारने दुप्पट के ला. शेतकऱ्यांचे तर जिणे मुश्कील झाल्याने हे जुलमी सरकार घालवण्यासाठी सर्वानी एकत्र आले पाहिजे.

पृथ्वीराजबाबांसारखे महान नेतृत्व खूप कमी लोकांच्या नशिबी येते. असे नेतृत्व माण-खटावच्या मातीत जन्मले असते तर दुष्काळी मातीचा आमच्यावरील कलंक २५ ते ३० वर्षांपूर्वी पुसला गेला असता. गेल्या साडेतीन वर्षांत युती सरकारला पृथ्वीराजबाबांच्या कार्यपद्धतीवर कोणताही आक्षेप नोंदवता आलेला नाही. इतकी निष्कलंक कामगिरी त्यांची राहिली असून, हे नेतृत्व जपण्याची व वाढवण्याची आपणा सर्वाची जबाबदारी असल्याचे गोरे यांनी स्पष्ट केले. विश्वजित कदम म्हणाले, की डॉ. पतंगराव कदम यांनी ४५ वर्षे केलेल्या सेवेची पुण्याई मला बिनविरोध होण्यामध्ये कामी आली. आमदार आनंदराव पाटील, बाळासाहेब पाटील, डॉ. इंद्रजित मोहिते, अजितराव पाटील, डॉ. सुधीर जगताप यांची भाषणे झाली. प्रास्ताविक बंडानाना जगताप यांनी केले. भारती विद्यापीठाचे उपाध्यक्ष डॉ. इंद्रजित मोहिते, पहिलवान नानासाहेब पाटील, शिवराज मोरे, मनोहर शिंदे आदी उपस्थित होते.