टपाल खातेही आता हायटेक होत आहे. कोअर बँकिंग सेवा उपलब्ध करून देणाऱ्या टपाल कार्यालयात ग्राहकांना अधिकाधिक चांगली सेवा देण्याच्या उद्देशाने एटीएम व ऑनलाइन खरेदीची सेवा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न सुरू करण्यात आला आहे. ऑनलाइन खरेदी सेवा थेट ग्रामीण भागापर्यंत टपालाद्वारे पोहोचली. लवकरच एटीएम सेवेला बीडपासून सुरुवात करण्यात येणार आहे. यानंतर टप्प्या-टप्प्याने तालुक्याच्या ठिकाणी ही सेवा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
जिल्ह्यात ग्रामीण व शहरी अशा ३३० टपाल कार्यालयांतून ऑनलाइन खरेदी सेवेला सुरुवात झाली. ग्रामीण भागापर्यंतही ही सेवा अधिक जलद देण्याचा प्रयत्न केला जात आहे. इंटरनेट युगातही सामान्य लोकांचे पहिले प्रेम व विश्वास अजूनही टपाल खात्यावर आहे. ऑनलाइन खरेदीची सुविधा उपलब्ध नसल्याने टपालाचा ग्राहक खासगी कुरिअर कंपन्यांकडे आकर्षति झाला. व्यवहारात रुजलेली इंटरनेट सेवा, वाढत्या खासगी कुरिअर कंपन्या व बँकिंग स्पर्धा यांच्यातील चढाओढीत आता टपाल खात्यानेही उडी घेतली आहे.
ऑनलाइन खरेदीसंदर्भात टपाल खात्याकडून वरिष्ठ पातळीवर मोठय़ा कंपन्यांशी करार झाला. त्यानुसार ऑनलाइन खरेदी केलेली वस्तू आता जिल्ह्यातील कोणत्याही टपाल कार्यालयामार्फत ग्राहकापर्यंत पोहोचणार आहे. बीडच्या मुख्य शाखेत कोअर बँकिंग सेवा सुरू करण्यात आली. त्यानंतर परळी, अंबाजोगाई, आष्टी या ठिकाणीही ही सुविधा उपलब्ध करण्यात आली. गेवराई, माजलगाव व केज या ठिकाणी ही सेवा प्रस्तावित आहे. कोअर बँकिंगच्या माध्यमातून टपाल ग्राहकांना व्यवहार करणे अधिक सुलभ झाले. टपाल विभागाने आता एटीएम सेवाही सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. बीडच्या मुख्य शाखेत ३० जूनपर्यंत ही सेवा कार्यान्वित करण्याचा मानस आहे. त्यानंतर अंबाजोगाई, परळी व आष्टी येथे टप्प्या-टप्प्याने ही सेवा उपलब्ध करण्यात येणार आहे. टपाल खात्याच्या या निर्णयामुळे कोअर बँकिंग सेवेला अधिक प्रतिसाद मिळणार असून ग्राहकांनाही आपले व्यवहार अधिक गतीने करता येणार आहेत.