अजित पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही आमदारांसह शनिवारी सकाळी राजभवनात उप-मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. राज्यात महाविकास आघाडीचं सरकार येणार असं जवळपास निश्चीत झालेलं असताना देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांच्या शपथविधीने राज्यातल्या राजकारणाची हवा पूर्णपणे बदलली. अजित पवारांनी घेतलेल्या निर्णयाचे राज्यभरात पडसाद उमटायला लागले. बारामतीमध्येही नागरिकांनी शहरात मोठी पोस्टर्स लावत आम्ही, ८० वर्षाच्या योद्ध्यासोबत असं म्हणत शरद पवारांना पाठींबा दिला.

मात्र अवघ्या काही तासांमध्ये बारामतीतलं हे पोस्टर आता हटवण्यात आलेलं आहे. बारामती हा शरद पवारांचा गड मानला जातो. गेली अनेक वर्ष महाराष्ट्र आणि देशाच्या राजकारणात शरद पवारांनी बारामतीमधल्या विकासकार्याच्या माध्यमातून स्वतःचं दबदबा निर्माण केला आहे. मात्र त्याच शहरात आता शरद पवारांच्या समर्थनार्थ लावण्यात आलेले पोस्टर्स उतरवण्यात आल्यामुळे चर्चांना उधाण आलेलं आहे. दरम्यान पवार घराण्यात कोणताही वाद नको, यासाठी हे पोस्टर हटवण्यात आल्याचं उपस्थित नागरिकांनी सांगितलं. मात्र यावेळी स्थानिक उपस्थित नागरिकांनी अजित पवारांना आपला पाठींबा दर्शवला.

या सर्व प्रकारानंतर राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवारांनी अजित पवारांची विधीमंडळ नेते पदावरुन हकालपट्टी केली आहे. मुख्यमंत्रीपदी शपथ घेतल्यानंतर राज्यपाल कोश्यारी यांनी फडणवीस यांना बहुमत सिद्ध करण्यासाठी एक आठवड्याच्या कालावधी दिला आहे. त्यामुळे या काळात राज्याच्या राजकारणात नेमक्या काय घडामोडी घडतायत हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.