गडचिरोलीच्या गोंडवाना विद्यापीठाने प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक आणि सहायक प्राध्यापक पदाच्या ३६ रिक्तपदांसाठी सुरु झालेली भरती प्रक्रिया स्थगित करण्यात आली आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने हे स्थगितीचे आदेश दिले आहेत.

या प्राध्यापक भरतीसाठी २० मार्च २०२० ला जाहिरात प्रकाशित करुन अर्ज मागवण्यात आले होते. परंतू, या जाहिरातीमध्ये ओबीसी प्रवर्गासाठी एकही जागा नसल्यामुळे ओबीसी समजात प्रचंड नाराजी होती. यामुळे गोंडवाना विद्यापीठाचे सिनेट सदस्य व स्थायी समिती सदस्य अॅड. गोविंदराव भेंडारकर, ओबीसी महासंघाचे अध्यक्ष डॉ. बबनराव तायवाडे, प्रवीण घोसेकर, विशाल पानसे व इतर यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली होती.

या याचिकेवर न्या. रवी देशपांडे आणि न्या. विनय जोशी यांच्या खंडपीठाने प्रध्यापकांच्या भरती प्रकियेतील नियुक्तीला आज (दि.१६) स्थगिती दिली. या संदर्भात राष्ट्रीय ओबीसी महासंघाने शासनाकडे पाठपुरावा केला होता. अर्जदाराच्यावतीने अॅड. पुरुषोत्तम पाटील व विद्यापीठाच्यावतीने भानुदास कुलकर्णी आणि अॅड. नीरजा चौबे यांनी काम पाहिले.