कासा-उधवा दरम्यान अपघातांची शक्यता

नितीन बोंबाडे, डहाणू

कासा-उधवा राज्यमार्गाची दुर्दशा झाली आहे. रस्त्यात पडलेल्या खड्डय़ांची लांबी आणि खोली वाढून राज्यमार्गावर पाण्याची तळी साचली आहेत. रस्त्यात खड्डय़ांत वाहने आदळून अपघाताचे प्रमाण वाढले आहे. सार्वजनिक बांधकाम खाते याकडे डोळेझाक करीत आहे. सायवन आश्रमशाळा, महाविद्यलय, बँका, नोकरी तसेच कामानिमित्त डहाणूकडे जाणारा हा एकमेव राज्यमार्ग असल्याने रस्त्यातील खड्डे त्वरित बुजवण्याची रहिवाशांची मागणी आहे.

डहाणू पूर्वेकडील दुर्गम भागातील निंबापूर, धरमपूर, सायवन, चळणी, दिवशी, दाभाडी, किन्हवली, आष्टा रापूर, कळमदेवी उधवा या भागांतून कासा-उधवा हा प्रमुख राज्यमार्ग जातो. राज्य मार्ग परिवहनच्या बसगाडय़ा आणि खासगी वाहनांशिवाय येथील जनतेला दळणवळणाची सोय नाही. परिणामी रात्री-अपरात्री याच प्रमुख राज्य मार्गाने वाहतूक सुरू असते. तसेच उधवा येथून चारोटी महामार्ग तसेच नाशिक राज्यमार्गाकडे जाण्यासाठी याच मार्गाचा वापर करावा लागतो.  रात्री या राज्यमार्गावर अपघातांची शक्यता असल्याचे मत डहाणू पंचायत समितीचे उपसभापती शैलेश करमोडा यांनी व्यक्त केले. यावर राज्यमार्गावरील खड्डे बुजवण्याचे काम सुरू आहे. संबंधित ठेकेदाराला सूचना देण्यात आल्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता धनंजय जाधव यांनी सांगितले.