मीरा-भाईंदर शहरातील मुख्य रस्त्यांवर लाखो रुपये खर्चून  महिन्याभरापूर्वी खड्डे बुजवण्याचे काम करण्यात आले होते. परंतु, आता पुन्हा या रस्त्यावर खड्डय़ांचे साम्राज्य निर्माण झाले आहे. तर काम निष्कृष्ट झाल्याने  ही परिस्थिती निर्माण झाल्याचे आरोप प्रवासी वर्गाकडून करण्यात येत आहेत.

मीरा-भाईंदर शहरातील मुख्य मार्गासह अनेक भागात खड्डे निर्माण झाले असल्याची तक्रार प्रशासनाकडे  करण्यात येत  होती. त्यामुळे  महिन्याभरापूर्वी पालिकेकडून लाखो रुपये खर्चून रस्त्याची दुरुस्ती आणि डांबरीकरण्याचे काम करण्यात आले होते. परंतु, त्यानंतर झालेल्या पावसामुळे तसेच निकृष्ट कामामुळे महिन्याभरातच खड्डे पडले आहेत.

शहरातील मुख्य मार्गावर सध्या मेट्रोचे काम करण्यात येत आहे. त्यामुळे या मार्गावरील रस्ता अरुंद झाला असून वाहनांची मोठय़ा प्रमाणात वर्दळ सुरू आहे. तसेच रस्त्यावरील खड्डय़ांमुळे नागरिकांचा प्रवास खडतर झाला आहे.