शहरातील अंतर्गत रस्त्यांवर खड्डय़ांमुळे अडथळ्यांची शर्यत

पालघर: बोईसर-पालघर रस्त्याची दुरवस्था झाली असतानाच पालघर शहरातील मुख्य रस्त्यांवर खड्डय़ांचे साम्राज्य पसरले आहे. त्यामुळे दुचाकी-चारचाकी प्रवासीसह नोकरदार व या रस्त्यावरून प्रवास करणाऱ्या नागरिकांचा या रस्त्यावरील प्रवास धोकादायक होत चालला आहे. नगर परिषद प्रशासनासह ठेकेदार व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या नावाने नागरिक बोटे मोडत आहेत.

पालघर शहरातील गोठणपूर परिसरापासून शिवाजी चौक, शिवाजी चौक ते वळण नाक्याकडे जाणारा रस्ता, देवीसहाय रस्ता, पुढे हुतात्मा स्तंभ परिसर व पालघर जिल्हा न्यायालय तसेच जिल्हा परिषद प्रशासकीय कार्यालय परिसराच्या रस्त्यांवर मोठी भगदाडे पडलेली आहेत. हे सर्व रस्ते अलीकडेच तयार करण्यात आले असले तरी अल्पावधीतच या रस्त्यांवर लहान मोठे खड्डे पडल्याने ते चुकवण्यासाठी वाहनांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. विशेष म्हणजे इतके मोठे खड्डे पडल्यानंतरही संबंधित प्रशासन याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करीत आहे.

या खड्डय़ांमुळे या सर्व रस्त्यांवर गेल्या काही दिवसांमध्ये लहान—मोठे अपघात घडले आहेत. यामध्ये नागरिक जखमी झाल्याच्या घटनाही घडल्या आहेत. दररोज या रस्त्यांवरून प्रवास करणाऱ्या नागरिकांना या खड्डय़ांमुळे हाल सहन करावे लागत आहेत. याचबरोबरीने रात्रीच्या सुमारास नवख्या वाहनचालकाला हे रस्ते व त्यावर असले खड्डे ज्ञात नसल्याने एखादा मोठा अपघात घडण्याची शक्यता आहे.

गेल्या महिन्याभरापासून पालघर शहरातील गोठणपूर नाका येथे रस्त्याला मोठे भगदाड पडले असून ते रस्त्यावर अडथळे टाकून अडवण्यात आले आहे. याच रस्त्यावर आनंद आश्रम शाळा व परिसरातही  मोठे खड्डे पडलेले आहेत. छत्रपती शिवाजी चौकात तर या खड्डय़ांमुळे मोठी वाहतूक कोंडी होत आहे. तेथून पुढे वळण नाका-माहीम दिशेच्या मार्गावर ट्विंकल स्टार शाळेसमोर मोठे खड्डे पडलेले आहेत. या मार्गावरून भरधाव वेगाने वाहने ये-जा करत असतात. मात्र अचानक या मोठय़ा खड्डय़ांमध्ये वाहने गेली तर  मोठा अपघात घडू शकतो. टेंभोडे पेट्रोल पंप, डॉ. आंबेडकर चौक येथेही मोठे खड्डे पडल्याचे दिसून येतात. तेथून पुढे पालघर शहराकडे जाणाऱ्या टेंभोडे रस्त्यावर धडा रुग्णालयासमोरचा संपूर्ण रस्ता खड्डेमय आहे. त्याची मलमपट्टी केली असली तरी त्या ठिकाणीही खड्डे पडलेले आहेत. जगदंबा उपाहारगृहानजीकच्या शहरी रस्त्यावरही मोठे खड्डे पडल्याने येथेही वाहतूक कोंडीचा प्रश्न निर्माण होतो.

शहरातील मुख्य रस्त्यांवरून जाणारे नोकरदार, शेतकरीवर्ग, दुग्ध व्यावसायिकांसह शासकीय कर्मचारी दररोज प्रवास करीत असतात. मात्र सर्व रस्त्यांवर खड्डय़ांचे साम्राज्य पसरल्याने या सर्वाचा प्रवास खडतर बनला आहे. या रस्त्यांवरून प्रवास करणाऱ्या अनेकांना कंबरदुखी, पाठदुखी असे आजार जडले असल्याचे नागरिक सांगत आहेत. रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडल्याचे दिसल्यानंतरही संबंधित विभाग गप्प का आहे, असा प्रश्न नागरिकांमार्फत विचारला जात आहे. हे खड्डे तात्काळ बुजवून नागरिकांचा या रस्त्यांवरील प्रवास सुखकर करावा अशी मागणी या निमित्ताने होत आहे.

प्रशासकीय अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष

विशेष म्हणजे जिल्हाधिकारी कार्यालय व जिल्हा परिषद प्रशासकीय कार्यालयाकडे जाणारा कचेरी रस्ता संपूर्ण खड्डेमय झाला असून न्यायालय परिसरापासून ते जिल्हा परिषद कार्यालयापर्यंतच्या रस्त्याची चाळण झाल्याचे पाहावयास मिळते. या रस्त्यावरून अधिकारी स्वत: जिल्हाधिकारी, जिल्हा परिषद कार्यालयाकडे जात असले तरी खड्डेमय झालेल्या रस्त्याची त्यांच्याकडून नोंद घेतली जात नाही. याउलट त्याची दुरुस्ती का होत नाही असा आरोप येथील नागरिक करीत आहेत.

> पालघर न्यायालयस्थित कचेरी रस्त्यासंदर्भात अभियंता यांच्याकडून माहिती घेऊन कळवते असे नगराध्यक्षा डॉ.उज्ज्वला काळे यांनी म्हटले आहे.

 

 

गोठणपूर ते शिवाजी चौक पुढे रेल्वे स्थानकाकडे जाणारा व शिवाजी चौक ते वळण नाक्याकडे जाणारा रस्ता आमच्या अखत्यारीत आहे. पावसामुळे रस्त्यावरील हे खड्डे डांबरीकरण करता येत नसले तरी तात्काळ ते तात्पुरत्या स्वरूपात बुजवून घेत आहोत.

– महेंद्र किणी, उपविभागीय अभियंता, सा.बां. विभाग पालघर

 

ल्ल पालघर न्यायालयस्थित कचेरी रस्त्यासंदर्भात अभियंता यांच्याकडून माहिती घेऊन कळवते असे नगराध्यक्षा डॉ.उज्ज्वला काळे यांनी म्हटले आहे.