17 January 2021

News Flash

नवापूरच्या कुक्कुटपालन व्यवसायाला फटका

आज नंदुरबार जिल्ह्य़ात जवळपास ७० हून अधिक कुक्कुटपालन केंद्रे आहेत

नीलेश पवार लोकसत्ता

नंदुरबार : उत्तर महाराष्ट्रातील कुक्कुटपालनाचे माहेरघर समजल्या जाणाऱ्या नंदुरबार जिल्ह्य़ातील नवापूरमध्ये सध्या तरी बर्ड फ्लूचा शिरकाव झाला नसल्याने व्यावसायिकांनी सुटकेचा नि:श्वास टाकला आहे. २००६ मधील बर्ड फ्लूच्या फेऱ्यात नवापूरमध्ये कुक्कुटपालन व्यावसायिकांचे ३५ कोटींचे नुकसान झाले होते. बर्ड फ्लूच्या धास्तीने सध्या अंडे, कोंबडी विक्री मंदावली असून आधीच अडचणीत आलेल्या या व्यवसायाला दुहेरी फटका बसला आहे.

गुजरात आणि महाराष्ट्र राज्याचा सीमावर्ती भाग असलेल्या नंदुरबार जिल्ह्य़ातील नवापूरमध्ये दोन दशकांपासून कुक्कुटपालनाच्या व्यवसायाने जोर धरला. नवापूर बाजार हे कोंबडय़ांच्या अंडे विक्रीचे महाराष्ट्रातील सर्वात मोठय़ा केंद्रांपैकी एक मानले जाते. आज नंदुरबार जिल्ह्य़ात जवळपास ७० हून अधिक कुक्कुटपालन केंद्रे आहेत. यातील १९ केंद्रांत एक लाखहून अधिक कोंबडय़ांचे पालन करून व्यवसाय केला जातो.

यातील १५ मोठी कुक्कुटपालन केंद्रे ही एकटय़ा नवापूर तालुक्यात असून आज तिथे सुमारे २० लाखहून अधिक कोंबडय़ांचे संगोपन केले जाते. करोनाकाळात प्रारंभी निर्माण झालेल्या अफवा आणि नंतर आता देश आणि राज्यात बर्ड फ्लूचा झालेला शिरकाव याचा फटका नंदुरबारच्या कोंबडी, अंडी बाजाराला बसला आहे. २००६ च्या बर्ड फ्लूचा प्रादुर्भाव होण्याआधी नवापूर तालुक्यात ३४ कुक्कुटपालन केंद्रे होती. त्या वेळी या ठिकाणी आलेल्या मोठय़ा बर्ड फ्लूच्या तडाख्याने ३५ कोटींचे नुकसान झाले होते. शासन स्तरावरून जवळपास २० कोटींचीच मदत झाल्याने कुक्कुटपालन केंद्रांची संख्या ३४ वरून आज १५ केंद्रांवर आली.

मुळात जिल्ह्य़ात आणि नवापूरमध्ये अद्याप तरी बर्ड फ्लूचा शिरकाव झालेला नाही. २००६ मधील बर्ड फ्लूचा विषाणू आणि आता देशात आढळलेला विषाणू याच्या तीव्रतेत फरक आहे. आधीच्या विषाणूच्या तुलनेत सध्याच्या विषाणूची तीव्रता कमी आहे. त्यामुळे कुक्कुटपालन करणाऱ्या व्यावसायिकांनी घाबरण्याची गरज नसल्याचे मत नवापूर पोल्ट्री संघटनेचे अध्यक्ष आरिफ बलेसरिया यांनी व्यक्त केले.

विषाणूचे नमुने भोपाळ प्रयोगशाळेतून तपासणी झाले असून नागरिकांनी भीती न बाळगता अंडी, चिकन योग्य तापमानात शिजवून खाल्ल्यास ते धोकादायक नसल्याचे नमूद केले.

कोंबडय़ा, अंडय़ांवर निर्बंध

राज्यातील काही भागात बर्ड फ्लूचा प्रादुर्भाव झाल्याचे लक्षात घेऊन प्रशासन सतर्क झाले आहे. मध्यप्रदेश आणि गुजरातच्या सीमांवर पशुसंवर्धन विभागाचे खास तपासणी नाके तयार केले आहेत. या राज्यामधून कोंबडय़ा अथवा अंडी आणण्यास निर्बंध घालण्यात आले आहेत. गतवेळी आलेल्या बर्ड फ्लूच्या संकटानंतर जिल्’ाातील कुक्कुटपालन व्यवसाय अडचणीत आला होता. करोना काळात व्यवसायाला अडचणीला तोंड द्यावे लागले. आता दाखल झालेल्या बर्ड फ्लूची नागरिकांमध्ये भीती आहे. याचा परिणाम विक्रीवर झाला असून त्यामुळे हा व्यवसाय पुन्हा रसातळाला जाण्याची भीती व्यक्त होत आहे. शासन आता अंडय़ासाठी काय उपक्रम आखते, यावर कुकुटपालन व्यवसायाचे भवितव्य अवलंबून राहणार असल्याचे व्यावसायिक सांगतात.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 13, 2021 4:01 am

Web Title: poultry business in navapur hit by bird flu zws 70
Next Stories
1 सांगली महापालिकेवर राज्यातील सत्ताधाऱ्यांचे लक्ष
2 निवडणुकीच्या तोंडावर पक्षांतराला गती
3 रायगडमध्ये भातशेती संकटात
Just Now!
X