नीलेश पवार

जिल्ह्य़ातील नवापूर तालुक्यात बर्ड फ्लूचा शिरकाव झाल्यानंतर बाधित कुक्कुटपालन केंद्रातील पक्षी शास्त्रीय पद्धतीने नष्ट करण्याची प्रक्रिया हाती घेण्यात आली आहे. यासाठी पशुसंवर्धन विभागाची शंभरहून अधिक पथके दाखल झाली असून उर्वरित २३ कुक्कुटपालन केंद्रातील कोंबडय़ांचे नमुने तपासणीसाठी भोपाळ प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहे. दीड दशकानंतर बर्ड फ्लूचा प्रादुर्भाव झाल्यामुळे नवापूरमधील कुक्कुटपालन व्यवसाय पुन्हा पूर्ण कोलमडून पडण्याची चिन्हे आहेत.

स्थानिक व्यावसायिकांच्या वर्तुळात बर्ड फ्लू येण्याची नेमके कारण काय आणि प्रशासकीय हलगर्जीपणा यावर मंथन होत आहे. नंदुरबार जिल्ह्य़ातील नवापूर तालुक्यातील चार कुक्कुटपालन केंद्रातील कोंबडय़ांचे नमुने भोपाळ प्रयोगशाळेने बाधित असल्याचा अहवाल दिल्यानंतर जवळपास दीड लाख पक्ष्यांची शास्त्रीय पद्धतीने विल्हेवाट लावण्याची प्रक्रिया युद्धपातळीवर सुरू करण्यात आली. यासाठी विभागातून पशुसंवर्धन विभागाची जवळपास १०० पथके दाखल झाली आहेत. सोमवारपासून पक्षी नष्ट करण्याच्या प्रक्रियेला गती मिळाली. दुसरीकडे प्रशासनाने या केंद्रांच्या १० किलोमीटर परिघातील जवळपास २७ कुक्कुटपालन केंद्रातील पक्ष्यांचे नमुने खबरदारीचा उपाय म्हणून भोपाळच्या प्रयोगशाळेत पाठविले आहेत. त्यांचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर पुढील प्रक्रिया होणार असून प्रशासनाने या केद्रांवर नजर ठेवली आहे. मुळात नवापूरमधील या केंद्रातील ३४ हजारहून अधिक कोंबडय़ांचा नैसर्गिक मृत्यू झाला होता. या आजाराचा मृत्यू दर अधिक आणि प्रादुर्भाव जलद होत असल्याने प्रशासन सतर्कतेने काम करीत आहे.

पंधरा वर्षांनंतर पुन्हा प्रादुर्भाव

१५ वर्षांनंतर पुन्हा दाखल झालेल्या बर्ड फ्लूचा प्रसार स्थलांतरित बगळे, कावळ्यांद्वारे झाल्याचा अंदाज आहे. देशातील आणि राज्यातील काही जिल्ह्य़ात बर्ड फ्लूचा प्रादुर्भाव झाल्यानंतर कुक्कुटपालन व्यावसायिकांना स्थलांतरित पक्ष्यांना केंद्राच्या सभोवताली येण्यापासून रोखण्याचे आवाहन करण्यात आले होते. केंद्राचा परिसर स्वच्छ ठेवून दैनंदिन र्निजतुकीकरणासह विविध सूचनांची नियमावली देण्यात आली होती. त्याचे पालन करण्यात कुठेतरी दुर्लक्ष झाल्याची परिणती या संकटात झाल्याचे सांगितले जाते. बर्ड फ्लूच्या प्रादुर्भावामुळे नवापूरमधील कुक्कुटपालन व्यवसाय रसातळाला जाण्याची भीती व्यक्त होत आहे.

दररोज सात लाख अंडी विक्री

नवापूर तालुक्यात १० लाख कोंबडय़ांचे संगोपन केले जाते. दररोज सात लाखहून अधिक अंडय़ांची विक्री केली जाते. महिन्याला कोटय़वधींची उलाढाल होते.

ज्या केंद्रात आजाराचा प्रादुर्भाव झाला, तेथील दीड लाख पक्षी नष्ट केले जात आहेत. सभोवतालच्या १० किलोमीटरच्या परिघात तब्बल पाच लाख पक्षी असून तेथील अहवाल प्राप्त झालेला नाही. शासनाकडून मिळणारी मदतही तुजपुंजी असल्याचे नवापूर कुक्कुटपालन संघटनेचे म्हणणे आहे. शासनाकडून एका पक्षीला ९० रुपये, तर एका अंडय़ाला तीन रुपये इतकी तुटपुंजी मदत दिली जाते. धान्याला प्रतिकिलो १२ रुपयांचे अनुदान दिले जाते. हे सर्व २००९ च्या शासन निर्णयाद्वारे मदत केली जात असल्याने तेव्हाच्या आणि आताच्या परिस्थितीत मोठा फरक असून याबाबत शासनाने सकारात्मक विचार करावा, अशी मागणी कुक्कुटपालन संघटनेचे संघटनेचे अध्यक्ष आरिफभाई पालावाला यांनी केली. या संकटानंतर नवापूरमधील कुक्कुटपालन व्यवसाय पुन्हा भरारी कसा घेईल, हा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

बर्ड फ्लू हा पक्ष्यांमध्ये वेगाने पसरणारा आजार आहे. माणसांमध्ये त्याचा प्रादुर्भाव होण्याचे प्रमाण अतिशय नगण्य आहे. आतापर्यंत प्राण्यांमधून माणसे बाधित होण्याची जगातील संख्या ही ८६२ असून त्यामुळे ४५५ लोकांचा मृत्यू झालेला आहे. भारतात मात्र पक्ष्यांमधून माणसात हा आजार जडण्याचे प्रमाण तसे नसल्याचे दिसून आले आहे. ७० अंशापेक्षा अधिक तापमानात चिकन, अंडी उकळल्यास ते सुरक्षित होत असल्याने भारतात बाधितांच्या संख्येचे प्रमाण कमी असल्याचे दिसून येते. तरी देखील नवापूरमधील पक्षी नष्ट करण्याच्या प्रक्रियेशी निगडित कर्मचारी आणि कुक्कुटपालन केंद्रातील कामगारांना खबरदारीचा उपाय म्हणून टॅमी फ्लूचा डोस दिला जात आहे. पक्ष्यांची संख्या मोठी असल्याने ते नष्ट करण्याच्या प्रक्रियेला आणखी काही दिवस लागण्याची शक्यता आहे.

– डॉ. राजेंद्र भरूड, जिल्हाधिकारी