करोनाबाबत समाजमाध्यमांवर खोटे संदेश; व्यावसायिकांची पोलिसांकडे तक्रार

अशोक तुपे, लोकसत्ता

श्रीरामपूर : कोंबडीचे मांस खाल्याने करोना विषाणूचा संसर्ग होतो, अशा समाजमाध्यमावरील संदेशांमुळे कुक्कुटपालन उद्योगाबरोबरच शेतकऱ्यांचे कोटय़वधी रुपयांचे नुकसान होत आहे. कुक्कुटपालन व्यावसायिकांनी खोटय़ा संदेशाला आळा घालण्यासाठी पोलिसांच्या सायबर गुन्हे शाखेकडे तक्रार करूनही तपासात प्रगती झालेली नाही. मात्र यामुळे राज्यातील कुक्कुटपालन उद्योगाचे सुमारे शंभर कोटींचे तर देशातील उद्योगाचे अकराशे कोटींचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे.

ब्रॉयलर कोंबडीच्या मांसापासून करोना विषाणूचा प्रसार होत असल्याचे संदेश समाजमाध्यमांवर दोन तारखेपासून फिरू लागले. अशा अपप्रचार करणाऱ्या खोटय़ा संदेशात करोना विषाणूचा संसर्ग हा कोंबडीचे मांस खाल्ल्याने होत असल्याशी संबंध जोडला गेला अन् उद्योगाला मोठा तडाखा बसला. देशातील पोल्ट्री उद्योगाला दिवसाला दीडशे कोटी तर राज्यात सुमारे चौदा ते पंधरा कोटी रुपयांचे नुकसान सुरू झाले.

राज्यात आठ हजारांहून अधिक पोल्ट्रीफार्म आहेत. दररोज दोन हजार टन चिकनची विक्री होते. मात्र खोटय़ा संदेशामुळे ही विक्री तेराशे टनापर्यंत्त आली. अजूनही लोकांच्या मनातील भीती खोटय़ा संदेशामुळे दूर झालेली नाही. त्यामुळे चिकनची मागणी वाढलेली नाही. पूर्वी पिसासह कोंबडी ७५ रुपये किलोने विकली जात होती. आता हे दर ३५ ते ४० रुपयांवर आले आहेत. बाजारात २०० रुपये किलोने विकले जाणारे कोंबडीचे मांस १२५ ते १५० रुपये किलोवर आले आहेत. राज्यात मांस विक्री करणारे २५ ते २६ हजार दुकाने आहेत. त्यांचेही नुकसान होत आहे. कोंबडी उद्योगात २००६ मध्ये आलेल्या बर्ड फ्ल्यूनंतर ही दुसरी आपत्ती आली आहे.

कुक्कुटपालन व्यवसायाच्या विरोधात असणाऱ्या काही लोकांनी हा उद्योग केल्याचा संशय आहे. पुणे येथील कुक्कुटपालन व्यवसायातील यशदा फुडस् व के.वाय.अ‍ॅग्रोव्हेट यांचे संचालक व या उद्योगातील तज्ज्ञ डॉ. दत्तात्रय कदम यांनी पुणे येथील सायबर गुन्हे शाखेकडे तक्रार नोंदविली आहे. त्यांनी काही संदेश त्यांना तपासासाठी दिले आहेत. मात्र तपासात अद्याप कुठलीही प्रगती झालेली नाही. या संदेशांत आजारी कोंबडय़ा दाखविण्यात आल्या आहेत. मात्र त्या राणीखेत या रोगाने बाधित असलेल्या कोंबडय़ा आहेत. ही चुकीची छायाचित्रे त्या संदेशात टाकण्यात आली आहेत. आता राज्य सरकारने उशिरा का होईना दखल घेत अपप्रचाराच्या विरोधात मोहीम उघडली आहे. करोना विषाणूचा चिकनशी कोणताही संबंध नाही. असे ते सांगत आहेत.

मक्याचे दर कोसळल्याने शेतकऱ्यांचे नुकसान

बाजारात जानेवारी महिन्यात मक्याचे दर क्विंटलला १८०० ते २००० रुपये होते. पण करोना विषाणूचा संसर्ग हा कोंबडय़ांमुळे होतो, असा अपप्रचार सुरु झाल्यानंतर कोंबडी खाद्याची मागणी घसरली. कोंबडी खाद्यात मक्याचा वापर मोठय़ा प्रमाणावर होतो. त्यामुळे बाजार ०क्वटलला १५०० ते १६०० रुपयांवर आले आहेत. अनेक शेतकड्ढयांनी दरवाढ होईल म्हणून मक्याची विक्री केली नव्हती. आता त्यांना मोठा फटका सहन करावा लागत आहे. बाजारातील मका खरेदी विक्रीवरही त्याचा परिणाम झाला आहे.

खोटय़ा अफवा पसरविल्यामुळे कुक्कुटपालन उद्योगाचे मोठे नुकसान झाले आहे. खोटे व अशास्त्रीय संदेश पसरविण्यामुळे लोकांच्या मनात चिकन खाण्याबद्दल संभ्रम निर्माण झाला आहे. हा प्रकार पद्धतशीरपणे व खोडसाळपणे करण्यात आला आहे. त्याला आळा घालण्यासाठी असे संदेश पसरविणाऱ्यांविरुद्ध फौजदारी गुन्हे दाखल करून त्यांना शिक्षा झाली पाहिजे. तरच असे उद्योग करणाऱ्यांना शिक्षा होऊ शकेल. अन्यथा कोटय़ावधी रुपयांचा हा उद्योग काही लोक उद्ध्वस्त करतील.

-दीपक चव्हाण, पोल्ट्री उद्योगाचे सल्लागार, पुणे.

करोना विषाणूचा चिकन खाण्याशी कोणताही संबंध नाही. कोंबडय़ांमध्ये करोना विषाणू आढळल्याची जगभरात एकही घटना घडलेली नाही. समाजमाध्यमांवरील छायाचित्रे व संदेश खोटे आहेत. देशात मांसाहाराची पद्धत सुरक्षित आहे. मटन व चिकन शिजवून घेतले जाते. १०० डिग्री तापमानाला ते उकळते. त्यात कोणताही विषाणू जिवंत राहू शकत नाही. आजपर्यंत चिकन खाल्लय़ाने कुणालाही विषाणूची बाधा झालेली नाही.

-डॉ. अजित रानडे, अधिष्ठाता, पशुवैद्यकीय महाविद्यालय, मुंबई.