आघाडी सरकारने गेल्या १५ वर्षांत राज्यातील जनतेचा भ्रमनिरास केला. जनतेला न्याय देण्यासाठी शिवसेना सत्तेत सहभागी झाल्याचा दावा करतानाच सरकारने जनमताचा अनादर केल्यास शिवसेना कडाडून विरोध करेल, असा इशारा शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिला.
आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या पुढाकारातून माळाकोळी येथे भव्य पाणी परिषद व जलसंधारणाच्या कामाचा प्रारंभ उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शनिवारी झाला. त्या वेळी ते बोलत होते. पालकमंत्री दिवाकर रावते, जलतज्ज्ञ या. रा. जाधव, खासदार संजय जाधव, आमदार हेमंत पाटील, नागेश पाटील, सुभाष साबणे, ज्ञानराज चौगुले, विवेक पाटील, जयप्रकाश मुंदडा, तसेच जिल्हाधिकारी धीरजकुमार, मनपा आयुक्त खोडवेकर, सुरेश राठोड यांची उपस्थिती होती.
ठाकरे म्हणाले, की राज्यातील शेतकरी, शेतमजूर सामान्य माणसांच्या हितासाठीच आम्ही सत्तेत सहभागी झालो. याचा अर्थ आम्ही सरकारजमा झालो असे नाही. सरकारचे धोरण शेतकरी, सामान्य माणसांच्या विरोधात असेल, तर तेथे निश्चितच शिवसेना विरोध करेल. जनता व सरकारमधील दुवा म्हणून शिवसेना काम करेल. आघाडी सरकारने १५ वर्षांच्या काळात भ्रमनिरास केला. जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठीच आम्ही सत्तेत सहभागी होण्याचा निर्णय घेतला. सरकारने जे चांगले केले त्याचे कौतुक करूच. मात्र, चुकीचे असेल त्याला विरोध करू, असेही त्यांनी स्पष्ट केले. पाणी परिषदेला मुस्लिमांची संख्या पाहून त्यांनी समाधान व्यक्त केले. मातृभूमीवर प्रेम करणाऱ्या सर्वाचाच आम्हाला आदर आहे. पण धार्मिक भावना भडकावणाऱ्या खासदार ओवेसी यांच्या समर्थकांना मात्र आम्ही कदापि आपले म्हणणार नाही. आमचा त्यांना नेहमी विरोधच राहील, असेही त्यांनी स्पष्ट केले.
महाराष्ट्रातील, विशेषत: मराठवाडय़ातील जनता दुष्काळाचा मोठय़ा प्रमाणावर सामना करीत आहे. या संकटातून सामान्य माणूस बाहेर पडला पाहिजे, यासाठी शिवसेना प्रयत्नरत आहे. सरकारने मदत दिली; परंतु ती लाभार्थ्यांपर्यंत पोहोचलीच नाही, अशा तक्रारी आहेत. मराठवाडय़ात पाण्याची भीषण टंचाई आहे. पाणी परिषदेच्या माध्यमातून पाणीबचतीचा संदेश सगळीकडे गेला पाहिजे. पाण्यासंदर्भात मराठवाडय़ातील शिवसेना आमदारांची लवकरच मुंबईला बठक घेण्यात येईल. या. रा. जाधव यांच्यासारख्या जलतज्ज्ञांचे मार्गदर्शन घेण्यात येईल आणि मराठवाडय़ातील प्रत्येक जिल्ह्यात शिवसेनेच्या वतीने पाणी परिषदा घेण्यात येतील, असे त्यांनी जाहीर केले.
पालकमंत्री रावते यांचेही भाषण झाले. आमदार चिखलीकर यांनी पाणी परिषद घेण्यामागील भूमिका सांगून निवडणुकीदरम्यान दिलेल्या आश्वासनाची पूर्तता करू, अशी ग्वाही दिली.
प्रारंभी उद्धव ठाकरे यांच्या हस्ते कदमाचीवाडी व वागदरवाडी येथील साठवण तलाव, तसेच चोंडी येथील कोल्हापुरी बंधाऱ्याचा प्रारंभ करण्यात आला. स्वत:ची अर्धा एकर जमीन विकून जमिनीत गाळ टाकणारे शेतकरी हणमंत कदम यांचा सत्कार करण्यात आला. मनसेचे तालुकाध्यक्ष भास्कर पवार यांनी या वेळी शिवसेनेत प्रवेश केला.
ठाकरे यांचे सकाळी साडेअकरा वाजता विमानाने आगमन झाले. विमानतळावर त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले. ठाकरे यांच्या दौऱ्याच्या पाश्र्वभूमीवर शहरात ठिकठिकाणी कमानी, बॅनर्स, पोस्टर्स व भगवे झेंडे लावले होते. संपूर्ण शहर भगवेमय झाले होते.