शिवसेनेच्या जाहीर सभेनंतर दुसऱ्या दिवशी त्याच ठिकाणी व तीच वेळ साधून राष्ट्रवादीने जाहीर सभा घेऊन तोडीस तोड शक्तिप्रदर्शन केले. त्यामुळे परभणी मतदारसंघातील राजकीय हवा चांगलीच तापली.
महायुतीचे उमेदवार संजय जाधव यांच्या प्रचारार्थ शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची, तर राष्ट्रवादीचे उमेदवार विजय भांबळे यांच्या प्रचारार्थ केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार, मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची सभा झाली. आदल्या दिवशी सेनेने केलेल्या शक्तिप्रदर्शनावर उतारा म्हणून राष्ट्रवादीलाही शक्तिप्रदर्शन करणे क्रमप्राप्त ठरले. ठाकरे यांच्या सभेला गळ्यात भगवा अडकवून आलेल्या कार्यकर्त्यांची संख्या मोठी होती. या सभेतून सेनेने जोरदार वातावरणनिर्मिती केली. सेनेप्रमाणेच शक्तिप्रदर्शन करण्यासाठी राष्ट्रवादीने कंबर कसली. पवारांची सभाही जंगी झाली. तोडीस तोड सभा झाल्याने राजकीय वातावरणही तापले.  
येथील स्टेडियम मदान आजवर बाळासाहेब ठाकरे यांच्या सभांनी गाजले. शिवसेनेचा जोर मराठवाडय़ात नव्याने निर्माण झाला, तेव्हा १९९० मध्ये ठाकरे यांची तडाखेबंद सभा परभणीत पार पडली होती. परभणी जिल्हा शिवसेनेचा बालेकिल्ला असल्याने आतापर्यंत ठाकरे यांच्या प्रचारसभा याच मदानावर झाल्या. मराठवाडा विद्यापीठाचा नामविस्तार झाल्यानंतर ठाकरे यांची सभा येथील वसमत रस्त्यावरील दत्तधाम मदानावर झाली होती. एकदा बाळासाहेबांची सभा झाल्यानंतर सेनेच्या उमेदवाराला विजयाचा मार्ग सहज व सोपा होत असे. मागील निवडणुकीत सेनेचे उमेदवार खासदार दुधगावकर हे होते. दुधगावकरांच्या प्रचारार्थ उद्धव यांची सभा झाली. त्या सभेपेक्षा मोठी सभा या वेळी सेनेने घेऊन दाखवली. सभेद्वारे शक्तिप्रदर्शनातून होणारी वातावरण निर्मिती मतदानापर्यंत टिकवायची, या उद्देशाने सेनेने सभेसाठी जोर लावला.
पूर्वनियोजित आखणीनुसार पवारांची परभणीतील सभा ७ एप्रिलला होती. मात्र, या सभेनंतर सेनेची सभा होणार व झालेली वातावरण निर्मिती अडचणीची ठरणार, असा विचार राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केला. त्यामुळे सेनेच्या सभेनंतर सभा घेऊन तोडीस तोड शक्तिप्रदर्शन करायचे, या जिद्दीने राष्ट्रवादीने पवारांची सभा घेतली. आधीच्या सभेने केलेल्या वातावरण निर्मितीवर उतारा म्हणून राष्ट्रवादीने जाहीर सभेला मोठी गर्दी जमविली. त्यामुळे आता जिल्ह्यात राजकीय हवा चांगलीच तापली आहे.
दोन्ही सभांमध्ये स्थानिक विषयांना बगल देण्यात आली. जिल्ह्याच्या विकासाची चर्चा होण्याऐवजी दोन्ही बाजूंनी परस्परांवर टीका करण्यात आली. सेनेच्या सभेत मोदींचा जयजयकार, तर राष्ट्रवादीच्या सभेत केंद्र व राज्यातील आघाडी सरकारांच्या कामगिरीवर भर होता. दोन्ही सभांमध्ये व्यक्तिगत संदर्भही चच्रेला आले. विरोधक तथ्यहीन आरोप करीत आहेत. आपण मराठा नाही, जमिनी हडपल्या आहेत, आपला मटक्याशी संबंध आहे, यासारखे बिनबुडाचे आरोप राष्ट्रवादीकडून होत असल्याचा उल्लेख जाधव यांनी भाषणात केला. ही लढाई धनशक्तीविरुद्ध जनशक्तीची असल्याचे ते म्हणाले. जाधव यांच्या विधानांना राष्ट्रवादीच्या सभेत छेद देण्याचा प्रयत्न झाला. सेनेचे उमेदवार ही लढाई धनशक्तीविरुद्ध जनशक्तीची असल्याचे सांगून आपण गरीब असल्याचे भासवत आहेत. ते गरीब असतील, तर मग त्यांच्या घरात ‘लिफ्ट’ बसवायचे कारण काय? गरिबाच्या घराला ‘लिफ्ट’ असते काय? असे प्रश्न भांबळे यांनी उपस्थित केले.
पवार नव्हे, पिल्ले!
राष्ट्रवादीच्या सभेत अनेकांनी पक्षप्रवेश केला. भीमराव हत्तीअंबीरे, उपेंद्र दुधगावकर, सोनाली देशमुख आदींसह भाजपचे माजी नगरसेवक मनोज पिल्ले यांचाही यात समावेश होता. आधी प्रसिद्ध झालेल्या वृत्तात अनावधानाने सेनेचे माजी नगरसेवक मनोज पवार यांनी प्रवेश केल्याचे म्हटले होते. प्रत्यक्षात पवार २० वर्षांपासून निष्ठावंत शिवसनिक म्हणून कार्यरत आहेत. महायुतीचे उमेदवार जाधव यांच्या प्रचारातही शहर संघटक म्हणून त्यांनी हिरिरीने सहभाग घेतला आहे.