|| नीरज राऊत

तारापूर अणुऊर्जा केंद्रातील घटना

पालघर : तारापूर अणुऊर्जा प्रकल्प १ आणि २ या देशातील पहिल्या अणुऊर्जा प्रकल्पातील चिमणी (स्टॅक)मध्ये १७ जानेवारीला स्फोट झाल्यानंतर या दोन्ही केंद्रांतील वीजनिर्मिती बंद आहे.

दरम्यान, या अपघाताची अणुऊर्जा नियामक मंडळ पाहणी करीत असून युनिट २ मधून पुन्हा वीजनिर्मिती सुरू करण्याची तयारी सुरू होत आहे.

देखभाल दुरुस्ती आणि इंधन पुनर्भरणासाठी तारापूर अणुऊर्जा केंद्रातील युनिट क्रमांक १चे शटडाऊन सुरू असताना १७ जानेवारीच्या पहाटे ५.१५ वाजता या केंद्रातील ‘ऑफ गॅस’ वाहून नेणाऱ्या चिमणीमध्ये एलिवेशन १०३ नामक टप्प्यावर जमलेल्या वायूचा स्फोट झाला. या स्फोटामुळे या चिमणीमध्ये असलेला लोखंडी दरवाजा वाकल्याचे आणि चिमणीमधील काही यंत्रणा नादुरुस्त झाल्याचे खात्रीलायक सूत्रांनी सांगितले.

या स्फोटानंतर १६० मेगावॉट वीजनिर्मिती करणारे अणुऊर्जा केंद्र २ मधील विद्युत उत्पादन तातडीने बंद करण्यात आले. या स्फोटाची तीव्रता मध्यम स्वरूपाची असल्याचे सांगण्यात येते. वीजनिर्मितीदरम्यान उच्चदाब वाफेचे

टरबाइनमध्ये विजे’ रूपांतर  झाल्यानंतर निर्माण होणाऱ्या वायूमध्ये हायड्रोजनची मात्रा वाढल्याने हा स्फोट झाल्याचे सांगण्यात येते. या स्फोटाचा अणुऊर्जा उत्पादन करणाऱ्या आणि किरणोत्सर्ग असलेल्या प्रणालीशी थेट संबंध नसल्याची प्राथमिक माहिती आहे. या अपघातामुळे कोणत्याही प्रकारचा किरणोत्सर्गचा विसर्ग वातावरणात झाला नसल्याचे सूत्रांनी सांगितले.

अपघात यंत्रणेची तपासणी अणुऊर्जा नियामक मंडळाच्या पथकाने केली. अपघातामुळे चिमणीच्या बांधकामाला इजा पोहोचली नाही. चिमणीच्या रचनात्मक स्थर्यतेबाबतची (स्ट्रक्चरल स्टॅबिलिटी) तपासणी पूर्ण झाल्यानंतर सर्वकाही सुरळीत असल्यास युनिट २ मधून वीजउत्पादन पुन्हा सुरू करण्यात येईल, अशी माहिती सूत्रांनी दिली.

अपघाताबाबत कमालीची गुप्तता.. अपघातासंदर्भात तारापूर अणुऊर्जा प्रकल्पाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे माहिती घेण्यासाठी प्रयत्न केला असता प्रतिसाद मिळाला नाही. शिवाय ई-मेललाही टॅप्स व्यवस्थापनाने उत्तर दिले नाही. या अपघाताबाबत कमालीची गुप्तता पाळण्यात येत आहे. या अपघाताची तीव्रता आणि त्यामागील कारण अस्पष्ट आहे. भागात बसणाऱ्या भूकंपाच्या धक्क्यांच्या पार्श्वभूमीवर अणुऊर्जा प्रकल्पातील चिमणीची सुरक्षितता हा महत्त्वाचा मुद्दा असल्याचे सांगण्यात येते.