वीजदरवाढीविरोधात येथील यंत्रमाग व्यावसायिकांनी बंद आंदोलन पुकारले असून, शनिवारपासून सलग सहा दिवस हा बंद पाळण्यात येणार आहे. पहिल्या दिवशी बंदला शहरात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. शुक्रवारी रात्री येथील मुशावरात चौकात आयोजित बैठकीत बंदचा निर्णय घेण्यात आला. माजी आमदार निहाल अहमद यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या बैठकीस आ. दादा भुसे, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष युनूस इसा, उपमहापौर जमील अन्सारी यांच्यासह विविध पक्षीय नेते व यंत्रमाग व्यावसायिक मोठय़ा प्रमाणावर उपस्थित होते. शहराची आर्थिक नाडी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या यंत्रमाग व्यवसायाला विविध कारणांमुळे कायम आर्थिक संकटांचा सामना करावा लागतो. अशा स्थितीत सप्टेंबर महिन्यापासून सुरू झालेल्या वीज दरवाढीमुळे हा व्यवसाय आणखी अडचणीत सापडला आहे. या अन्यायकारक दरवाढीमुळे हा व्यवसाय बंद पडण्याच्या मार्गावर आहे. या व्यवसायावर आलेले संकट दूर करण्यासाठी ही दरवाढ मागे घ्यावी, असा या व्यावसायिकांचा आग्रह आहे.