जिल्हा सहकारी बँक निवडणुकीत ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांच्या नेतृत्वाखालील पॅनेलने १९ पकी १६ जागांवर विजय मिळवत राष्ट्रवादीचे विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, आमदार अमरसिंह पंडित व माजी मंत्री प्रकाश सोळंके या दिग्गज नेत्यांच्या पॅनेलला पराभवाची धूळ चारली. राष्ट्रवादीला केवळ ३ जागांवर समाधान मानावे लागले. मोठय़ा मताधिक्याने उमेदवारांनी विजय मिळवल्याने मुंडे यांचे बँकेवर एकतर्फी वर्चस्व सिद्ध झाले. अॅड. सर्जेराव तांदळे यांनी सर्वाधिक सव्वासहाशेच्या मताधिक्याने विजय मिळवला, तर काँग्रेसचे संजय दौंड यांना केवळ दोन मते मिळाली.
बँकेच्या १९ जागांसाठी झालेल्या मतदानाची गुरुवारी जिल्हा मजूर संघात मतमोजणी झाली. पालकमंत्री मुंडे यांच्या नेतृत्वाखालील वैद्यनाथ लोकविकास पॅनेलच्या उमेदवारांनी मोठय़ा फरकाने राष्ट्रवादी पुरस्कृत दिग्गज नेत्यांच्या बँक बचाव पॅनेलला पराभवाची धूळ चारत विजय मिळवला. मतदान झालेल्या १४ जागांपकी पंकजा मुंडे यांच्या पॅनेलने ११ जागा जिंकल्या, तर धनंजय मुंडे, अमरसिंह पंडित, माजी मंत्री प्रकाश सोळंके या दिग्गज नेत्यांच्या बँक बचाव पॅनेलला केवळ तीन जागांवर समाधान मानावे लागले. यातही गेवराई तालुक्यातील सेवा सहकारी संस्था मतदारसंघातून कैलास नलावडे आणि प्रक्रिया मतदारसंघातून भाऊसाहेब नाटकर या दोघांना विजय मिळाल्याने आमदार पंडित यांनी आपला गड कायम राखला. माजलगाव तालुक्यातील चंद्रकांत शेजूळ निवडून आल्याने माजी मंत्री सोळंके यांचा एक समर्थक बँकेत संचालक राहिला. उर्वरित जागांवर पंकजा मुंडे यांच्या पॅनेलचे उमेदवार विजयी झाले. यात राष्ट्रवादीचे माजी मंत्री सुरेश धस यांची पत्नी संगीता धस व माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर समर्थक दिनेश परदेशी यांचा समावेश आहे.
सर्वाधिक मतांनी भाजपचे जिल्हा सरचिटणीस अॅड. सर्जेराव तांदळे यांनी आपले प्रतिस्पर्धी चंद्रकांत चाटे यांचा तब्बल ६१६ मतांनी पराभव करून मतांचा विक्रम नोंदवला. प्रक्रिया मतदारसंघातून भाजपअंतर्गत वादातून मतांचे बहुमत असतानाही उमेदवार वसंतराव सानप यांचा ८ मतांनी पराभव झाल्याचे मानले जात आहे. मतदानापूर्वीच ५ जागा बिनविरोध निवडल्या गेल्या होत्या. त्यात सत्यभामा बांगर, संध्या वनवे, हृषीकेश आडसकर, शीतल कदम, साहेबराव थोरवे यांचा, तर विजयी झालेल्या संचालकांत गोरख धुमाळ, नितीन ढाकणे, फुलचंद मुंडे, आदित्य सारडा, दत्ता पाटील, मीनाताई राडकर, परमेश्वर उजगरे व महादेव तोंडे यांचा समावेश आहे.